''जलमित्र'' नियुक्ती प्रक्रिया अधांतरी

''जलमित्र'' नियुक्ती प्रक्रिया अधांतरी

Published on

‘जलमित्र’ नियुक्ती प्रक्रिया अधांतरी
३५०७ नामनिर्देशन ः पाणी योजनांच्या देखभालीचा प्रश्न कायम
नंदकुमार आयरे ः सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १२ ः जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनाची देखभाल दुरुस्ती व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नेमण्यात येणाऱ्या ‘नल जलमित्र’ नियुक्तीची प्रक्रिया अद्यापही कागदावरच राहिली आहे. या पदासाठी जिल्ह्यातून ३ हजार ५०७ उमेदवारांची नामनिर्देशन प्राप्त झाली असली तरी शासनाकडून या प्रक्रियेला अद्याप गती मिळत नसल्याने जिल्ह्यातील नळ पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना कार्यान्वित घरगुती नळ जोडणीद्वारे प्रतिमाणसी प्रतिदिन ५५ लिटर विहित गुणवत्तेसह दैनंदिन वापरासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी व योजना शाश्वत टिकवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता असणे आवश्यक आहे. यासाठी लोकसहभागाला अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेले आहे. पाणीपुरवठा योजना पूर्व नियोजन टप्प्यापासून ते देखभाल व दुरुस्ती टप्प्यापर्यंत योजनेच्या भागधारकांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय योजना टिकू शकत नाही. याचा विचार करून जल जीवन मिशन अंतर्गत राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती योग्य रीतीने व्हावी या उद्देशाने प्रति ग्रामपंचायत ३ अनुभवी नल जलमित्र निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.
याकरिता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये गवंडी, मेकॅनिकल फिटर, इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर याप्रमाणे प्रत्येक ट्रेडसाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत ९ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड व फोटोसह ग्रामपंचायतीमार्फत मागविण्यात आली होती. जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीसाठी एकूण १ हजार २९३ नल जलमित्र नेमणूक करण्यात येणार होते. प्रत्येक ग्रामपंचायतीकडून तीन पदांसाठी नऊ नामनिर्देशन पत्र असे एकूण ३ हजार ८७९ नामनिर्देशन येणे अपेक्षित होते. त्यानुसार ४३१ पैकी ३०४ ग्रामपंचायतींकडून प्रतिसाद मिळाला असून ३५०७ नामनिर्देशन पत्र जिल्हास्तरावर प्राप्त झाली आहेत. मात्र, या नियुक्ती प्रक्रियेला अद्यापही गती न आल्याने ती कागदावरच राहिली आहे. यामुळे जिल्ह्यातील नळ पाणी योजनेच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे.

नामनिर्देशन पत्र
* गवंडी-१२३९
* मेकॅनिकल फिटर-११२८
* इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर-११४०

कोट
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नल जलमित्र नेमणुकीसाठी ग्रामपंचायतमार्फत विहित नमुन्यात सादर केलेल्या शिफारस पत्रातील नऊ नामनिर्देशित व्यक्तिमधून राज्यस्तरावर प्री स्क्रीनिंग करून ट्रेडनुसार तीन नामनिर्देशन अंतिम होणार आहेत. त्यानंतर त्या संबंधित उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आणि नंतर त्यांची नियुक्ती केली जाईल.
- विशाल तनपुरे, प्रकल्प संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, सिंधुदुर्ग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com