खतांमध्ये बळीराजाची होणारी फसवणूक चिंतेचा विषय

खतांमध्ये बळीराजाची होणारी फसवणूक चिंतेचा विषय

Published on

बोल बळीराजाचे ------लोगो
(७ जून टुडे ४)

rat१३p१५.jpg-
२५N७०३६५
जयंत फडके

----
खतांमध्ये बळीराजाची होणारी
फसवणूक चिंतेचा विषय
जून महिन्यातील हा दुसरा शनिवार..आता कोकणात शेतकऱ्याची गडबड असते ती खत व्यवस्थापनाची! मोठ्या प्रमाणात खताचा वापर होतो तो आंबा, काजू आणि नारळ-सुपारीसाठी आणि मग भात, नाचणी, तीळ अशा पावसाळ्यात होणाऱ्या शेतीसाठी. इतर प्रदेशांच्या तुलनेत खत कमी वापरलं जातं आणि त्यातही रासायनिक खत तर अजून कमी प्रमाणात वापरलं जातं; पण गेल्या पंचवीस-तीस वर्षांत आंबा-काजूकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं जायला लागलं आणि खताचा वापर वाढला. पहिले काही वर्षे रासायनिक खतांचा जरा जोरकस वापर झाल्यावर बळीराजा तसा लवकर जागा झाला आणि सेंद्रिय खतांकडेही ओढा वाढला. वेगवेगळ्या पेंडींची खतं, शेणखत, गांडुळखत, मासळीचं खत, प्राणिज मिल, कंपोस्ट खत असे अनेक प्रकार आजमावून पाहात शेतकरी आत्ता कुठे रासायनिक-सेंद्रिय अशा मिश्रखतावर येऊन स्थिरावलाय; पण या विषयात बळीराजाची होणारी फसवणूक हा खरेतर चिंतनीय विषय आहे.
शेणखत, हिरवळीचं खत, ओझोला, माशांच खत, लेंडी, कंपोस्ट हे खरेतर पारंपरिक मार्ग..पण काळानुसार बदल होत गेले. खूप लहानपणापासून गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असल्याचं शाळेत शिकवलं जायचं; पण जेव्हा प्रत्यक्ष खत वापरायचा योग आला तेव्हा त्यातली गुंतागुंत लक्षात आली. सेंद्रिय खत म्हणून जे काही घालतात त्यातली फसवणूक लक्षात आली. कोणत्याही रासायनिक खताचा बेस म्हणून जे काही वापरलं जातं त्याचं मातीत काय होतं? सर्व घटक, सूक्ष्म अन्नद्रव्य रासायनिक प्रकारात आहेत मग मातीत काय आहे? या प्रश्नापासून स्वतःचं खत स्वतः तयार करायला हवं यावर शिक्कामोर्तब झालं. जमिनीत पुरेसं सेंद्रिय कर्ब असलं तर गांडूळ आपोआप वाढतात. फक्त थोडा ओलावा हवा. झाडाची जेवढी छाया तेवढा भाग गवत, पालापाचोळा अशा कुजणाऱ्या घटकांनी आच्छादित केला की, जमिनीत आद्रता निर्माण होते. यात जीवामृत, शेण, गोमूत्र यांची अधिकची जोड मिळाली की, गांडुळांना अनुकूल स्थिती निर्माण होते. रासायनिक खतांनी जमिनी कडक होतात कारण, त्यांनी जमिनीतील सूक्ष्म जीवजंतू मारले जातात. आताशा होणाऱ्या वारेमाप फवारण्यांनी झाडावरून पडणारे अधिकचे विषारी पाणीही जमीन रासायनिक करायला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते. आता झाडाला जे हवं ते खरंतर त्या झाडानेच गाळलेल्या पान, फुलं, फळ, लाकूड यातून मिळत असतं. गांडूळ या पडून कुजलेल्या घटकांना खाऊन टाकतात. त्याची विष्ठा म्हणजेच गांडूळखत..! या साऱ्या चक्रात गांडूळ खूप महत्त्वाचे यासाठी की, त्याची लाळ, त्याच्या अंगावरून पडणारे पाणी हे झाडाला संजीवक म्हणून काम करते म्हणून तर ते बळीराजाचे मित्र..; पण आपल्याला खूप घाई आणि ‘हाव’ ही. त्यामुळेच फळ खाऊन त्याची सालही आपण त्याच्या बुंध्यात टाकायला तयार नाही. कोणत्याही फळाचा बीजाभोवतीचा गर हा आपल्याला छान गोड लागतो; पण खरेतर, ते बीज रुजून मूळ जमिनीत जाई तो लागणारे प्राथमिक, पौष्टिक, अत्यावश्यक अन्नच असते. आपण तेच खाऊन टाकतो. पालापाचोळा झाडून बागा साफ करतो. त्याचे जळवण करतो. मेलेल्या फांद्याही कुजू देत नाही. मग त्या झाडांना आपल्याला योग्य वाटणारे खत आणून घालतो.
गांडूळ जीवंत राहून कार्यरत राहण्यासाठी थोडा ओलावा आवश्यक असतो. अशी परिस्थिती वर्षभर झाडाच्या सावलीच्या परिघात राहिली तर बाहेरून खताची गरज नगण्य होईल; पण पाण्याच्या ताणाने मोहोर येणाऱ्या आंब्यासारख्या फळझाडात आपण अशी सिंचनाची सोय केली तर नैसर्गिक मोहोरच येणार नाही. चार महिन्यांच्या पावसाळ्यानंतर जमीन कोरडी होते तेव्हाच आंब्याला मोहोर येतो. म्हणूनच गांडूळखत बाहेरून तयार करून द्यावे लागते. हे कंपोस्टपेक्षा नक्कीच दर्जेदार असतं. हे थोडे नैसर्गिक शेतीच्या तत्त्वात बसत नसेलही; पण एकतर आईचे दूध पुरेसे नसते तेव्हा अन्य पर्याय शोधावेच लागतात आणि आता शेतीतरी पूर्णतः नैसर्गिक कुठे आहे? मग दुधाची तहान अगदी ताकावर नाहीतर पावडरच्या दुधावर..असेच काहीसे !
तयार केलेले गांडूळखत झाडाच्याच अवशेषापासून तयार होते. ते अधिक उपयोगी होण्यासाठी काही पेंडी, शेण, विशिष्ट वनस्पतींचा पालापाचोळा गांडूळखताच्या बेडमध्ये वापरता येतात. गेल्या तीस वर्षाहून अधिक काळ स्वतः तयार केलेले गांडूळखत वापरून विश्वासाने म्हणता येईल की, रंग, वास, चव, टिकाऊपणा आणि झाडाचा तजेलदारपणा यात आमूलाग्र बदल घडतो. मृत जमिनीला सजीवता येते. सकस, रसायनविरहित फळे, धान्य, भाजीपाला आहारात असल्याचे फायदे किती मांडणार..?
बळीराजाला स्वतःचे शेतीसाठी खत स्वतः बनवायला प्रोत्साहित करायला हवं. विषमुक्त फळे, धान्य, भाजीपाला योग्य दराने विकला जायला हवा. त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी राहायला हवी. चांगलं अन्न..आहारमूल्य जाणून घ्यायला हवं. माझा बळीराजा रासायनिक फवारण्या, खतं हौसेनं वापरत नाही. त्यालाही त्याचं जीवनचक्र चालवायचं असतं. चांगलं मार्गदर्शन, परवडणारी किंमत, कष्टाचं चीज करणारी समाजव्यवस्था असेल तर तोही समाधानाचे चार घास नक्कीच जेवेल. त्याला लाखोचे पगार नव्हे तर श्रमाचं मोल हवंय..अगदी नैसर्गिक हक्काचं..!!

(लेखक प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com