‘फ्लाय-९१’ तर्फे जवानांना तिकिट दरात सवलत

‘फ्लाय-९१’ तर्फे जवानांना तिकिट दरात सवलत

Published on

‘फ्लाय-९१’ तर्फे
जवानांना तिकिट
दरात सवलत
कुडाळ ः भारतीय लष्कराच्या शौर्याला मानवंदना म्हणून ‘फ्लाय ९१’ या प्रादेशिक विमानसेवेतर्फे त्यांच्या तिकिटांच्या मूळ दरावर भारतीय लष्करातील जवान तसेच त्यांचे जवळचे कुटुंबीय यांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. त्यांना विशेष आसन राखीव ठेवण्यासह अतिरिक्त सामान वाहतूक सवलतही देण्यात येणार असल्याचे पत्रक ‘फ्लाय-९१’ने दिले आहे. ही सवलत सर्व उड्डाणांसाठी लागू असून, ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उपलब्ध आहे. प्रवासादरम्यान लष्करी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ किलो अतिरिक्त चेक-इन साहित्याची सवलतही दिली जाईल, असे ‘फ्लाय-९१’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चाको यांनी सांगितले. ही सुविधा घेण्यासाठी पात्र जवानांनी support@fly91.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
....................
कुडाळात आज
‘कोमसाप’ची सभा
कुडाळ ः कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची २०२३-२४ ची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. १५) सायंकाळी ३.३० वाजता येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या सभागृहात कुडाळ शाखाध्यक्ष वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. दिवंगत सभासद, मान्यवरांना श्रद्धांजली वाहणे, मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, गतवर्षीच्या कामकाजाचा अहवाल, २०२३-२४ या कालावधीतील लेखापरीक्षण अहवालाचे वाचन करणे व जमाखर्च मंजुरी, २०२४-२५ करिता लेखापाल नियुक्ती, मृत आजीव सभासदांची नावे निर्लेखित करणे, २०२५ ते २०२८ करिता नवीन कार्यकारिणीची निवड करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. गणसंख्येअभावी सभा तहकुब राहिल्यास त्याच दिवशी त्याच ठिकाणी अर्ध्या तासाने म्हणजे ४.०० वाजता घेण्यात येईल. सभासदांना सूचना अगर ठराव मांडावयाचे असतील तर लेखी स्वरुपात अध्यक्ष किंवा कार्यवाह यांच्याकडे पोहोच करावेत, असे आवाहन कार्यकारी मंडळातर्फे कार्यवाह सुरेश पवार यांनी केले आहे.
......................
मालवण येथे आज
सुतार समाज मेळावा
आचरा ः मालवण तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि सुतार समाज बांधव मेळावा उद्या (ता. १५) सकाळी १० वाजता जानकी मंगल कार्यालय मालवण येथे आयोजित केला आहे. या मेळाव्यास महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर पुणे, राज्य समन्वयक दिलीपराव आकोटकर, महाराष्ट्र राज्य विश्वकर्मा क्रांतीदल अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ नांदेड, जगप्रसिद्ध शिल्पकार बाळकृष्ण (दाजी) पांचाळ, कोकण विभागीय समन्वयक आनंद मेस्त्री सिंधुदुर्ग हे उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात संत भोजलींगकाका सुतार आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समस्त मालवण तालुका सुतार समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती जिल्हा समन्वयक प्रकाश मेस्त्री यांनी केले आहे.
---
सावंतवाडी नगरपालिकेचा
नातू यांच्याकडे कार्यभार
सावंतवाडी ः सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नातू यांच्याकडे सोपविला आहे. त्यांनी शुक्रवारी (ता. १३) पालिकेला भेट देत अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. सावंतवाडी पालिकेच्या याआधीच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com