मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचवा

मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचवा

Published on

swt166.jpg
70947
वराड : मराठा पाल्य सत्कार प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका देवयानी गावडे व इतर मान्यवर.

मराठा समाजाचा आर्थिक स्तर उंचवा
देवयानी गावडेः वराड हायस्कूलमध्ये गुणवंत सत्कार सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ ः मी एका हायस्कूलमध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे; परंतु मुलामुलींमध्ये मी जातपात पाहत नाही, किंबहुना तसे लक्षात सुध्दा येत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिक्षकांना एसईबीसी माहिती संकलनासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागले. त्यावेळी मराठा समाजाची अत्यंत हलाखीची परिस्थिती प्रत्यक्ष जवळून पाहायला मिळाली. आपला मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहे. हा आर्थिक स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे, असे प्रतिपादन वराडकर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कट्टाच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे यांनी केले.
मालवण-कसाल हमरस्त्यावरील वराड येथील नम्रता मंगल कार्यालयात सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशी मंडळाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेत आणि अन्य स्पर्धा परीक्षांत उज्वल यश मिळविलेल्या मराठा पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मुख्याध्यापिका गावडे बोलत होत्या. व्यासपीठावर मंडळाचे अध्यक्ष डॉ. जी. आर. सावंत, उपाध्यक्ष विष्णू लाड, वराड उपसरपंच गोपाळ परब, तिरवडे सरपंच रेश्मा गावडे, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, गोळवण सरपंच सुभाष लाड, धामापूर सरपंच मानसी परब, आंबडोस सरपंच सुबोधिनी परब, पेंडूर उपसरपंच सुमित सावंत, डॉ. सोमनाथ परब, शिक्षक श्री. हडलगेकर, श्री. बेनके, वायंगवडे माजी सरपंच जयवंत गावडे, संतोष गावडे, जयंद्रथ परब, वैष्णवी लाड आदी उपस्थित होते.
सौ. गावडे म्हणाल्या, "शिक्षक म्हणून सर्वेक्षण करताना एका मराठा घरातील आजी म्हणाल्या की, उद्या मुंबईहून मुलाने पैसे नाही पाठविले तर वीज मीटर कापला जाईल आणि अंधारात राहावे लागेल. दुसऱ्या घरात तर अशी परिस्थिती होती की, दोन वेळची चूल पेटणे कठीण होते. अशाप्रकारे मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे. या सर्वांचा विचार करून आपल्या समाजाची प्रगती कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करा. आज या ठिकाणी झालेल्या सत्कारानिमित्त मिळालेल्या भेटवस्तूला पैशांमध्ये न तोलता त्याचे मोल समजून घ्या. समाजासाठी माझ्याकडून जे काही समाजासाठी करता येईल ते मी करीत राहीन."
यावेळी सुभाष लाड, संतोष गावडे, सुबोधि‌नी परब, डॉ. सोमनाथ परब यांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन जयंद्रथ परब आणि वैष्णवी लाड यांनी केले. आभार जयवंत गावडे यांनी मानले.

चौकट
समाज हिताची भावना रुजवा
सकल मराठा समाज कट्टा दशक्रोशीच्या वतीने दहावी परीक्षेत ८० टक्केपेक्षा जास्त आणि बारावीत ७५ टक्के पेक्षा जास्त तसेच विशेष प्राविण्य मिळविलेल्या समाजातील मुलांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना वैष्णवी लाड यांनी, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे. त्यांचे कौतुक करण्यासाठी व नवीन उर्जा प्राप्त होण्यासाठी या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या यशात आई-वडील, गुरुजन यांचा मोठा वाटा आहे, हे लक्षात ठेवा. आपणही समाजाचे देणे लागतो, ही भावना मनात रुजवा, असे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com