चिपळूण-आरक्षण सोडतीनंतरच निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग

चिपळूण-आरक्षण सोडतीनंतरच निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला वेग

Published on

आरक्षण सोडतीनंतरच निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला वेग
रणधुमाळी सप्टेंबरनंतर; प्रशासकीय राजवटीने राजकीय पक्ष थंडावलेले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १६ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. हे आता निश्चित झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता साऱ्यांनाच प्रभाग, गट, गण, वॉर्डांच्या आरक्षणाचे वेध लागले आहेत. सप्टेंबरपर्यंत ही रचना पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग येईल.
मावळत्या जिल्हा परिषदेत ५५ गट होते, तर ११०च्या आसपास पंचायत समित्यांचे गण होते. तेच गट आणि गण पुढील निवडणुकीत कायम राहणार आहेत; मात्र मतदारसंघाची रचना बदलणार आहे. वाढलेले मतदार यांची संख्या लक्षात घेत नवीन रचना झाल्यास सर्वांना धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाची सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत इच्छुकांची धाकधूक वाढण्याची शक्यता आहे. जे हुकमी आहेत अशा इच्छुकांनी मात्र आरक्षण काहीही पडले तरीही निवडणूक लढवून जिंकायचीच, असा पण केला आहे. असाच प्रकार नगरपालिकांमध्येही पाहायला मिळतो. नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेमधून होणार असल्याने नगराध्यक्षपदाचे आरक्षणाशिवाय प्रभागांचे आरक्षण यावरही राजकीय घडामोडी ठरणार आहेत. चिपळूण तालुक्यात ८ जिल्हा परिषद गट, ४ पंचायत समिती गण, पालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे. सर्व संस्थांच्या निवडणुका एकत्र होतील की, वेगवेगळ्या हे अजूनही निश्चित नाही. मागील चार वर्षांत प्रशासकीय राजवटीने राजकीय पक्ष थंडावलेले होते; पण आता सर्वोच्च न्यायालयानेच चार महिन्यांत निवडणुका घ्या, असे फर्मान सोडल्याने प्रशासन तयारीला लागले आहे.
---------
चौकट
सण, उत्सवांना महत्त्व
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणे अपेक्षित आहेत. यामुळे या काळात होणाऱ्या सण, उत्सवांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे. विशेषकरून गोकुळाष्टमी, दहीहंडी, नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा आदी सणांना राजकीय पक्ष विशेष महत्त्व देऊन युवा मंडळांना आपल्याकडे खेचण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.
------
कोट
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी करत असलेल्या सर्वच इच्छुकांना त्यांच्या प्रभागांचा अंदाज आहे. मतदारसंघाची रचना कशी होते, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. प्राथमिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. आरक्षण सोडत झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणी सुरू होईल.
-लियाकत शहा, तालुकाध्यक्ष, काँग्रेस, चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com