आचरावासीयांकडून ‘महावितरण’ धारेवर
71058
आचरावासीयांकडून ‘महावितरण’ धारेवर
कार्यालयातच ठिय्या; समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १६ ः येथील बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याच्या पत्र्याच्या शेडवर विद्युत वाहिनी तुटून पडली होती. याबाबत वीज कर्मचाऱ्यांना संपर्क साधूनही कोणतीच दखल न घेतल्याने संतप्त नागरिकांनी सरपंच जेरॉन फर्नांडीस यांच्या नेतृत्त्वाखाली येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. तासाभरानंतर कार्यालयात दाखल झालेल्या उपकार्यकारी अभियंत्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी सुमारे चार तास कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
आचरा बाजारपेठ येथील व्यापारी अभिजित सावंत यांच्या पत्र्याच्या शेडवर रविवारी (ता.१५) सायंकाळी विद्युत वाहिनी तुटून पडली. वीज प्रवाह सुरू असल्याने धोका निर्माण झाला होता. याबाबत कर्मचाऱ्यांना संपर्क साधला. मात्र, कुणीही वेळेवर उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आज सकाळी सरपंच फर्नांडिस यांच्या उपस्थितीत येथील विज वितरण कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच संतोष मिराशी, आचरा व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष मंदार सांबारी, परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंद्रकांत कदम, महेंद्र घाडी, राजन पांगे, वामन आचरेकर, सुनील दुखंडे, विजय कदम, मंदार सरजोशी, अभिजीत सावंत, सिद्धार्थ कोळगे, जगदिश पांगे, श्रीपाद सावंत, संजय आचरेकर, देवेंद्र नलावडे, निखिल ढेकणे, अरुण आपकर, मंगेश मेस्त्री यांस ग्रामस्थ उपस्थित होते. तासभर होऊनही कोणी जबाबदार अधिकारीच नसल्याने सरपंच फर्नांडिस यांनी उपकार्यकारी अभियंता लिमकर यांना फोन करुन जोपर्यंत आपण येथे येणार नाहीत, तोपर्यत आम्ही येथून हालणार नसल्याचे स्पष्ट केले. काही वेळाने सहाय्यक अभियंता ओम शिंदे कार्यालयात दाखल झाले. त्यांनाही ग्रामस्थांनी धारेवर धरले. त्यानंतर श्री. लिमकर दाखल झाले. त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. उपस्थितांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंतही कार्यालयात दाखल झाले. त्यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येथील गरीब शेतकरी राधाकृष्ण आंबेरकर यांच्या म्हैशीचा विज वाहिन्यांचा स्पर्श झाल्याने तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मात्र, एकाही अधिकाऱ्याने जात पाहणी केली नाही. याबाबत त्यांनी अधिक्षक अभियंत्यांना फोन करुन जाब विचारला. आचरे गावासाठी आजच्या आज विज कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. श्री. सामंत यांच्या मागणीनुसार अधिक्षक अभियंता यांनी आज लाईनमन तर दोन दिवसांत सहाय्यक अभियंता उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्यानंतर श्री. सामंत यांनी हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देत आचरावासियांनी चार तास सुरू केलेले आंदोलन मागे घेतले.
-----------
आमदार राणेंकडून शेतकऱ्यास मदत
दरम्यान, शिवसेना जिल्हाप्रमुख सामंत यांनी विज अधिकाऱ्यांसह मृत म्हैशीची पहाणी करत तातडीने पंचनामा करण्याची सुचना केली. तसेच ऐन शेती हंगामात दुभते जनावर मृत होऊन नुकसानग्रस्त झालेले शेतकरी राधाकृष्ण आंबेरकर यांना आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून रोख दहा हजार तातडीची मदत देत आर्थिक सहाय्य केले. यावेळी सरपंच फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, दिपक पाटकर, मनोज हडकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.