

70956
पावसाचा दापोली तालुक्याला दणका
दोन पूल पाण्याखाली ; वाहतुकीवर परिणाम, चार गावांचा संपर्क तुटलेला
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १६ः मुसळधार पावसाने दापोली तालुक्यात दोन मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. चार गावांचा संपर्क तुटला होता तर चार ठिकाणी झाडे कोसळून मार्गावरील वाहतूक काहीकाळ खंडित झालेली होती. तालुक्यात ही परिस्थिती उद्भवलेली असतानाच आपत्ती व्यवस्थापन पथकाचा कुठेच पत्ता नव्हता.
कालपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली. या पावसाने दापोली आणि मंडणगड तालुक्यांना शनिवारी सायंकाळी व रविवारी दिवसभर झोडपून काढले. धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला होता. त्यामध्ये दापोली आणि मंडणगड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या चिंचघर तसेच दापोली तालुक्यातील मांदिवलीदरम्यानच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या भारजा नदीवरील मांदिवली पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने मंडणगड-दापोलीतील वाहतूक थांबली. त्यामुळे वाहनाच्या रांगाच रांगा लागलेल्या होत्या. दापोली तालुक्यातील आडे, उटंबर, आतगाव, केळशी, उंबरशेत, रावतोली व कवडोली मांदिवलीमार्गे मंडणगड तालुक्यातील चिंचघर, देव्हारे, मंडणगडकडे जाणारा मार्ग ठप्प झाला होता. या मार्गावरून आडे-उटंबर-केळशी परिसरातून पूणे-मुंबई-मंडणगड-महाडकडे प्रवासी वाहतूक सुरू असते. हा मार्ग पाण्याखाली गेल्याने मोठा फटका बसला. पुलाजवळ असलेल्या माजी सरपंच अक्षरा भानत यांच्या घराच्या पडवीत पुराचे पाणी शिरले होते.
दापोली-हर्णै मुख्य रस्त्यावरील ज्वाला बॅटरी, श्रेयस हॉटेल व फर्निचर यांच्या पत्र्यावरती रस्त्याच्या लगत असलेल्या गुलमोहोर वृक्षाच्या मोठ्या फांद्या कोसळल्या होत्या. त्याच झाडाला लागूनच विद्यूतवाहिनी गेली आहे. या फांद्या पडल्याने विद्युतप्रवाह खंडित झाला होता. या वेळी तातडीने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी भरपावसात येऊन त्या फांद्या मशिनद्वारे कापून बाजूला करून रस्ता मोकळा केला. सकाळी ७ वाजता जालगाव बाजारपेठत ग्रामपंचायतीसमोरील भलेमोठे झाड पडून वाहतूक ठप्प झाली. स्थानिक ग्रामस्थांनी पावसातच ते झाड कापून बाजूला केले. नारगोली येथील मेडिकल कॉलेजकडे गेलेल्या रस्त्यावर पडलेले झाडही स्थानिकांनी बाजूला केले. येथील कोडजाई नदीला आलेल्या पुरामुळे कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरलेले आहे. त्यामुळे कोळबांद्रेसह आजुबाजूच्या गावांचा संपर्क तुटला.
चौकट
३२ गावातील वीजप्रवाह खंडित
वादळसदृश परिस्थितीमुळे देगाव येथील उपकेंद्राच्या बाजूला असलेल्या कुणबी भवनच्या मागे ३३ केव्ही विद्युतवाहिनीचे ३ खांब पडल्याने ३२ गावचा वीजपुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला आहे. हा विद्युतप्रवाह सुरळीत करण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून सुरू आहे. सध्या खेड-दस्तुरी येथूनच होणारा वीजप्रवाह खंडित झाला असल्याचे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.