मोर्डेत सहा एकरवर सदाहरित वृक्षांची लागवड

मोर्डेत सहा एकरवर सदाहरित वृक्षांची लागवड

Published on

- rat१८p१६.jpg-
२५N७१५०४
संगमेश्वर ः तालुक्यातील मोर्डे येथे सदाहरित वृक्षांची लागवड करणारे सह्याद्रीसह सृष्टीज्ञान, देवरूखचे एएसपी कॉलेज, सीड स्टोरी लायब्ररी आणि एनसीएफचे सदस्य.
----
मोर्डे येथील सहा एकरवर सदाहरित वृक्षांची लागवड
सह्याद्री संकल्पचा पुढाकार ; ७० प्रजातींच्या १ हजार रोपांची लागवड
राजेश कळंबटे ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ ः कोकणात सातत्याने होणारी जंगलतोड, देवरायांमधील जैवविविधता कमी होणे आणि सदाहरीत वृक्षांची घटणारी संख्या ही मागील पाच ते सहा वर्षातील चिंतेचा विषय ठरला आहे. सदाहरीत वृक्षांच्या लागवडीसाठी सह्याद्री संकल्प सोसायटीने पुढाकार घेतला असून संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे येथे ६ एकरवर जंगल तयार केले जाणार आहे. त्याची सुरुवात झाली असून ७० प्रजातींची १ हजार रोपं अडीच एकरवर लावण्यात आली आहेत. याद्वारे धनेश संवर्धनालाही हातभार लागणार असून सत्तर वर्षांपूर्वी कोकणात दिसणारे भले मोठे वृक्ष पुन्हा दिसणार आहेत, असे सोसायटीचे संचालक प्रतीक मोरे यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम घाटातील जंगलांमध्ये सदाहरीत वृक्षांची तोड होत आहे. मुंबई-गोवा, रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली गेली. त्यात शंभरहून अधिक वर्षांची झाडे तोडण्यात आली आहेत. देवरायांमधील काही वृक्षांच्या प्रजातीही नष्ट होताना दिसतात. त्यामुळे पर्यावरण समतोलही बिघडत आहे. तसेच धनेश संवर्धनावरही परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांचा मित्र अशी ओळख असलेल्या धनेशच्या प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी सह्याद्री संकल्प सोसायटीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भल्यामोठ्या वृक्षांची नर्सरीही तयार केली जात आहे. त्याच सदाहरित वृक्षांचे जंगल तयार करण्यात येत आहे. याबाबत प्रतीक मोरे म्हणाले, सदाहरीत वृक्ष लागवडीसाठी सर्वात मोठा प्रश्न जमिनीचा होता. तो सुदैवाने सहज सुटला. अभिजित पाटील आणि केतकी फाटक यांनी मोर्डे गावातील त्यांची स्वःमालकीची जमीन वृक्ष लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. त्या जागेचा सर्वे करून कोणत्या प्रजाती अधिक आहेत, त्याची माहिती संकलित केली. त्यानंतर तिथे नसलेल्या ७० प्रजाती लागवडीसाठी निवडल्या गेल्या. त्यामध्ये धर्तीवर चांदफळ, काळा धूप, काजरा, सुरंगी, जंगली जायफळ, रान बिब्बा, काळा उंबर, पायर, पिंपरील, नांदरूप या झाडांचा समावेश आहे. उपलब्ध असलेल्या ६ एकरपैकी अडीच एकरवर १ हजार रोपांची नुकतीच लागवड करण्यात आली आहे. ही झाडे संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. पूर्वी कोकणात आढळणारे वृक्ष पुन्हा या जंगलात तयार होतील, असे त्यांनी सांगितले.

अशी केली लागवड
मोर्डे येथे लागवडीसाठी आवश्यक रोपं कुडाळ येथील मिलिंद पाटील यांच्या वेस्टर्न घाट नर्सरी आणि सह्याद्री संकल्प सोसायटीच्या नर्सरीतून उपलब्ध झाली आहेत. प्रत्यक्ष लागवड करताना खड्डे मारणे आणि रोपं लावणे या कामासाठी सह्याद्रीसह सृष्टीज्ञान, देवरूखचे एएसपी कॉलेज, सीड स्टोरी लायब्ररी आणि एनसीएफ यांची मदत झाली आहे. त्यातून अधिवास पुनर्निर्मिती आणि इकोलॉजिकल रीस्टोरेशनचा रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच पाया रोवला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com