माजगावचा जलस्रोत खुला, धोका टळला
माजगावचा जलस्रोत
खुला, धोका टळला
सावंतवाडी ः सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी स्थळाजवळ बंद झालेला पूर्वापार जलस्रोत अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने खुला केल्याने धोका टळला आहे. तेथील शेतकरी दत्तगुरु भोगणे यांनी हा प्रकार अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देताच बांधकाम विभागाला जाग आली. पूर्वापार असलेल्या जलस्त्रोताच्या ठिकाणी मातीचा भराव आल्याने पाण्याचा प्रवाह बंद झाला होता. त्यामुळे चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी साचून तलाव बनला होता. पाणी जाण्यास अन्य मार्ग नसल्याने पाणी रस्तेमार्गावरून वाहत जात होते. काही पाणी लगतच्या शेतकऱ्यांच्या शेती, बागेत जाऊन नुकसान होत होते. साचलेल्या पाण्यामुळे रस्ताही पाण्याखाली जाऊन वाहून जाण्याची शक्यता होती. या प्रकाराबाबत भोगणे यांनी बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तेथे जाऊन पाहणी केली. त्यानंतर तत्काळ उपाययोजना हाती घेऊन बंद जलस्त्रोत खुला केल्याने पाणी जाण्याचा मार्ग मोकळा होऊन धोका टाळला.
-----
म्हापण पंचक्रोशीत
बीएसएनलचे तीनतेरा
म्हापण ः म्हापण पंचक्रोशीत बीएसएनल सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. परिसरात वारंवार व दीर्घकाळ सेवा खंडित होत असल्याने पंचक्रोशीतील ग्राहकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करून देखील बीएसएनल अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. बीएसएनलचे नेटवर्क जुने असल्याने संपूर्ण पंचक्रोशीत पसरले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बीएसएनलचे नेटवर्क तांत्रिक कारणामुळे ठप्प होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अचानक सेवा गायब होत असल्याने याचा बॅंका, कार्यालयीन ऑनलाईन काम करणाऱ्यांची गैरसोय होत आहे. ग्रामस्थांना संपर्क साधताना मोठ्या अडचणी येत आहेत. महिन्याभरापासून हा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वेळोवेळी ठप्प होत असलेली सेवा तत्काळ सुरळीत करावी, अशी मागणी होत आहे.
..................
नांदगावातील खड्डे
बुजविण्याची मागणी
कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिठा येथे महामार्गाच्या सेवारस्त्याला खड्डेच खड्डे पडले असून, याचा फटका वाहनधारकांना बसत आहे. दोन दिवसांत संबंधित विभागाने खड्डे बुजविण्याची कार्यवाही न केल्यास २१ जूनला सकाळी १० वाजता याच खड्ड्यात वृक्षारोपण करण्याचा इशारा नांदगाव सन्मित्र रिक्षा संघटनेने दिला आहे. नांदगाव तिठा येथील सेवारस्त्याच्या खड्ड्यांमध्ये आदळून अनेकदा अपघात होत आहेत. यात कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. नांदगाव तिठा येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. देवगड-निपाणी राज्य महामार्ग याच ठिकाणी मध्य भागातून गेला आहे. अशातच गेले काही महिने रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.
-------
‘बीएसएनएल टॉवर
तातडीने दुरुस्त करा’
म्हापण ः कोचरा येथील बीएसएनएलचा मोबाईल टॉवर गेले चार दिवस बंद असल्याने कोचरा, निवती व श्रीरामवाडी परिसरातील मोबाईल सेवा बंद आहे. यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात बीएसएनएल व्यतिरिक्त कोणतीही मोबाईल सेवा नसल्याने ऑनलाईन काम करणारे कर्मचारी, शालेय विद्यार्थी, पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने यात लक्ष घालून कोचरा मोबाईल टॉवर तातडीने दुरुस्त करण्याची मागणी ग्राहकांकडून करण्यात येत आहे.
......................
विजेच्या लपंडावामुळे
सिंधुदुर्गवासीय हैराण
वेंगुर्ले ः जिल्ह्यात मंगळवारी (ता. १८) दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. यामुळे जिल्हावासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी पावसाने उघडीप घेतली होती. पाऊस, वादळी वारे नसतानाही विजेचा लपंडाव सुरूच होता. महावितरण कंपनीने मॉन्सूनपूर्व कामे वेळीच पूर्ण केली नसल्याने जिल्हावासीयांना खंडित वीजपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. वीज समस्यांबाबत ग्रामस्थांनी आंदोलने करूनही महावितरणच्या कारभारात सुधारणा होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.