सत्यसाईबाबांच्या पादुका दर्शन सोहळा
सत्यसाईबाबांच्या
पादुका दर्शन सोहळा
रत्नागिरी ः श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून जगभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुट्टपर्ती आंध्रप्रदेश येथून निघालेल्या रथाचे रत्नागिरीत स्वागत करण्यात आले. हा साईरथ शहरातील पॉवरहाऊस येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सर्व साईभक्तांनी उत्स्फूर्तपणे श्री पादुकांचे स्वागत केले व दर्शनाचा लाभ घेतला. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. सिद्धार्थ कस्तुरीरंगन (प्राध्यापक मुंबई विद्यापीठ) यांचे व्याख्यान, भक्तिगीत कार्यक्रम, भजन, महाप्रसादाचा अनेक भक्तांनी याचा लाभ घेतला. श्री सत्यसाईबाबांच्या सत्य, धर्म, शांती आणि प्रेमाचा संदेश घेऊन पुट्टपर्ती, आंध्रप्रदेश येथून बाबांच्या दिव्य पादुका असलेले सहा रथ सर्व भारतभर दर्शनासाठी निघालेला आहे.
अजगराला जीवनदान
संगमेश्वर ः पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की, घरात साप येणे ही कोकणवासियांना काही नवीन गोष्ट नाही; परंतु अजगर पाहिल्यावर कोणाचीही घाबरगुंडी उडते. असाच एक अजगर चिखली बौद्धवाडी येथील विकास मोहिते यांच्या घरी घुसला असता तेथील सर्पमित्र अक्षय मोहिते यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. हा अजगर आठ फुटांचा होता. अजगराने सर्वप्रथम एका कोंबडीचा फडशा पाडला. दुसऱ्या कोंबडीकडे त्याचा मोर्चा वळलेला असताना विकास मोहिते यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित अक्षय मोहिते यांना संपर्क साधला. अक्षय मोहिते व त्यांचे सहकारी सम्यक पवार यांनी अजगराला पकडण्याचे धाडस केले. या वेळी परिसरातील नागरिकांची गर्दी जमा झाली होती. सर्वांनी सर्पमित्रांचे कौतुक केले.
सूर्यकांत खेतलेंची
शैक्षणिक संस्थेत निवड
चिपळूण ः तळसर मुंढे शिक्षणसंस्थेच्या अध्यक्षपदी तळसर मुंढे गावचे सुपुत्र सूर्यकांत खेतले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खेतले मागील अनेक वर्षापासून या शैक्षणिक संस्थेवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तळसर मुंडे गावचे सरपंच म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले आहे. चिपळूण पंचायत समितीचे ते सदस्य होते. गावातील शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची कान्हे ग्रामपंचायत सदस्य खालिद पटाईत, सूरज खेतले, वेहेळे माजी सरपंच रोहित गमरे, वेहेळे गावाचे माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबू होडे, सामाजिक कार्यकर्ता रवी कदम, समीर काजी, यतिराज होडे, दीपक वीरकर व आशफाक खान यांनी त्यांचा सत्कार केला.
गोळपमध्ये सीआरए
तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक
पावस ः फळबाग लागवडीसाठी उपयुक्त ठरेल असे सीआरए’ तंत्रज्ञान कमी पाण्यात तयार होईल. सशक्त व निरोगी फळझाड होईल त्यासाठी या तंत्रज्ञाचा वापर करणे काळाची गरज आहे, असे उपक्रम कृषी अधिकारी कोकणी यांनी प्रात्यक्षिकावेळी सांगितले. रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे शेतकरी हरिश्चंद्र चौघुले यांच्या प्रक्षेत्रावर सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून फळबाग लागवड प्रात्यक्षिक घेण्यात आले. या तंत्रज्ञानामध्ये फळबाग लागवड करण्याआधी शेतामध्ये तीन फूट लांब, तीन फूट रूंद तसेच तीन फूट खोल खड्डा केला जातो. या खड्ड्याच्या चार कोपऱ्यांवर चार इंच व्यासाचे तीन फूट लांब असलेले पाईप उभे केले जातात. नंतर मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत मिसळून हा खड्डा शेणखत तसेच पाचशे ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व मातीचे मिश्रण आणि दीड फूटपर्यंत भरला जातो.
‘अभिनय कौशल्य’वर
रंगशाळेत कार्यशाळा
रत्नागिरी ः रत्नागिरी हे सांस्कृतिक क्षेत्राचे माहेरघर, अनेक कलाकारांनी मनोरंजनातून रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. येथील कलाकर विद्यार्थ्यांना इथे मनासारखं व्यक्त होता यावे यासाठी रंगशाळा सिनेनाट्य विद्यालयाची निर्मिती झाली. अनेक उपक्रम राबवत असताना येत्या शनिवारी (ता. २१) आणि रविवारी (ता. २२) या दोन दिवसांच्या कालावधीत विद्यालयातर्फे सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात खास रत्नागिरीकरांसाठी विद्यालयाकडून मोफत ‘अभिनय कौशल्य कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले असून, अनुभवी नाट्यप्रशिक्षक, दिग्दर्शक प्रदीप शिवगण हे कार्यशाळेचे मार्गदर्शक आहेत. दोन दिवस चालणाऱ्या कार्यशाळेला कोणतेही प्रवेशशुल्क नाही; मात्र फोनवरून किंवा प्रत्यक्ष भेटून नावनोंदणी करणे गरजेचे आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.