सावंतवाडीतील रस्ते पुन्हा उखडले
swt1915.jpg
71761
सावंतवाडीः शहरातील नारायण मंदिरासमोर पडलेला भला मोठा खड्डा.
swt1916.jpg
71762
सावंतवाडीः पालिकेजवळील पेट्रोल पंप ते सारस्वत बँकेपर्यंत रस्त्यावर अशाप्रकारे छोटे मोठे खड्डे पडले आहेत.
सावंतवाडीतील रस्ते पुन्हा उखडले
पहिल्याच पावसात खड्डे निकृष्ट कामामुळे याआधीही ओढावला होता रोष
रूपेश हिरापः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ः निकृष्ट डांबरीकरणामुळे शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि जनतेच्या रोषानंतर त्यावर ठेकेदाराने पुन्हा केलेली मलमपट्टी यावर्षी पहिल्याच पावसात उखडली. शहरातील मुख्य रस्त्यात ठिकठिकाणी पुन्हा एकदा खड्डे पाहायला मिळत आहेत. ठेकेदाराला या कामाचे बिल अदा केल्याने पालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांसमोर डागडुजी कशी करून घ्यायची? असा प्रश्न पडला आहे.
शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्याचे काम गतवर्षी पावसाळ्यापूर्वी नव्याने केले होते. परंतु, तीन महिन्यातच पहिल्याच पावसात या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या निकृष्ट कामाची पोलखोल झाली होती. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पालिका प्रशासनाला जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. कोरोना काळापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. अधिकारी वर्गावर कोणाचाच धाक नसल्याने मनमानी पद्धतीने या ठिकाणी कारभार पाहायला मिळत आहे. याच मनमानी कारभाराचा फटका शहरातील विविध विकासकामांच्या बाबतीत नेहमी अनुभवायला मिळत आहे. गतवर्षी रस्त्याच्या कामासंदर्भात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी कडक भूमिका घेत प्रशासनाला थेट पालिकेमध्ये जाऊन जाब विचारला होता. यावेळी हादरलेल्या प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून या रस्त्याचे काम पुनश्च करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ठेकेदाराने पुनश्च नव्याने रस्ते न करता पडलेल्या खड्ड्यावर केवळ मलमपट्टी करण्याचे सोपस्कार पूर्ण केले होते. कामाची गुणवत्ता न तपासता खड्डे बुजवण्याचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ठेकेदाराच्या कामाचे बिलही पालिका प्रशासनाने अदा केले होते. परिणामी यावर्षी झालेल्या आत्तापर्यंतच्या पावसातच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पाहायला मिळत आहेत. सद्यःस्थितीत हे खड्डे लहान असले तरी पुढील तीन-चार महिन्यांमध्ये शहरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पाहायला मिळणार आहे. सद्यःस्थितीत शहरातील नारायण मंदिरासमोर भला मोठा खड्डा पडला असून पेट्रोल पंप ते सारस्वत बँकेपर्यंत रस्त्यावर छोट्या मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हे खड्डे येणाऱ्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पसरणार आहेत. त्यामुळे शहरातील प्रवास निश्चितच वाहन चालकांसाठी खड्डेमय बनणार आहे.
पालिकेवर अलीकडेच नव्याने महिला मुख्याधिकारी नियुक्त झाल्या होत्या. त्यांनी महिन्यातून महिन्यात चांगले काम शहरात केले होते. परंतु, त्यांची बदली अन्यत्र झाल्याने या ठिकाणी मुख्याधिकारी हे पद रिकामी आहे. एकीकडे प्रशासकीय राजवट असताना दुसरीकडे मुख्याधिकारी हे सुद्धा पालिकेवर नसल्याने अधिकारी वर्ग पूर्णपणे मुजोर बनल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. त्याच त्याच ठेकेदाराला शहरातील रस्त्याची कामे पुन्हा पुन्हा देत असल्याने अधिकाऱ्यांचीच यामध्ये मिलीभगत असल्याचा आरोपही होत आहे. अशा अधिकाऱ्यांना चाप बसणे गरजेचे असून संबंधित ठेकेदारालाही काळा यादी टाकण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. एकीकडे आमदार दीपक केसरकर हे सावंतवाडी शहरातील विकास कामाच्या बाबतीत नावीन्यपूर्ण योजना आखत असताना दुसरीकडे मात्र शहरातील विविध समस्यांकडे त्यांचा पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे.
---------------
चौकट
किरकोळ पावसातच दुर्दैशा
यावर्षी पावसाळा म्हणावा तशा सुरू झाला नाही, किरकोळ स्वरूपाच्या पावसातच शहरात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गतवर्षी केलेल्याच रस्त्यावर खड्डे निर्माण होत असल्याने पुढे कोसळणाऱ्या या पावसात हे खड्डे मोठ्या प्रमाणात पसरणार आहेत. याबाबत आत्ताच काळजी घेणे गरजेचे आहे.
----------------
कोट
शहरातील रस्त्यांची पाहणी करून ज्या ठिकाणी खड्डे पडले आहे ते बुजवण्याचे काम हाती घेतले जाईल. नव्याने केलेल्या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. परंतु, बाकीचे रस्ते चांगले स्थितीत आहेत. मात्र, तरीसुद्धा ज्या ठिकाणी खड्डे पडले अशा खड्ड्यांबाबत काळजी घेतली जाईल.
- तुषार सरडे, बांधकाम अभियंता, सावंतवाडी नगरपालिका
---------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.