तुटपुंज्या भरपाईने बागायतदार नैराश्यात
swt1918.jpg
71763
रुपेश राऊळ
तुटपुंज्या भरपाईने बागायतदार नैराश्यात
रुपेश राऊळः वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ६ः दोडामार्ग तालुक्यात वन्यप्राण्यांमुळे बागायती, शेतीत होणाऱ्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. हत्ती, गवा रेडा, रानडुक्कर, वानर, माकड, शेकरू आणि मोरांसारख्या वन्यजीवांनी शेती व बागायतींमध्ये धुडगूस घालून लाखो रुपयांचे नुकसान केले आहे. या नुकसानीच्या तुलनेत मिळणारी भरपाई अत्यंत तुटपुंजी असून, ती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशासनाच्या दारात हेलपाटे घालावे लागत आहेत. यामुळे बागायतदार आत्महत्येचा विचार करतील, अशी भीती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी वन, कृषी आणि ग्रामविकास खात्याने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दोडामार्ग तालुका घनदाट जंगलाने वेढलेला असून, तो वन्यजीवांचा मोठा अधिवास आहे. भात, नाचणी, नागली, केळी, नारळ, सुपारी तसेच विविध फळझाडे ही येथील मुख्य पिके आहेत. याशिवाय, बांबू आणि नागलीच्या पिकांपासूनही शेतकऱ्यांना वार्षिक उत्पन्न मिळते. मात्र, सध्या वन्यप्राण्यांमुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. माकड आणि शेकरूपासून होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेऊन दहा वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरी, त्याची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल राऊळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी २ ते ४ लाख रुपयांचे नुकसान होत असल्याने त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. उत्पन्नात घट झाल्याने भविष्याची चिंता वाढली आहे. अनेकदा शेकडो वानर आणि माकड थेट शेतकऱ्यांच्या बागायतीत घुसूनही नुकसान करत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असली तरी, प्रशासनाकडे तक्रार करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. यामुळे काही शेतकऱ्यांनी तर शेती करणेच सोडून दिले आहे, असे राऊळ यांनी सांगितले. उपजिविकेचे साधन शेती व बागायती असलेल्या शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत असे त्यांनी सांगितले.
वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान केवळ पिकांपुरते मर्यादित नसून, ते थेट शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर परिणाम करत आहे. शासकीय स्तरावर या समस्येकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. घाटामाथ्यावरील शेतकरी आत्महत्येसारखे प्रकार करतात. मात्र, दोडामार्ग तालुक्यात तसे घडत नसल्याने प्रशासन या नुकसानीची दखल घेत नाही, अशीही शेतकऱ्यांची तक्रार आहे.
शेतकरी आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. शेती व बागायती पिकांच्या कायमस्वरूपी संरक्षणाची उपाययोजना करणे गरजेचे आहे; अन्यथा शेतकरी आत्महत्या करतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि भरपाईसाठी योग्य धोरणे आखणे ही काळाची गरज आहे, असे राऊळ यांनी म्हटले आहे.
चौकट
प्रमुख मागण्या
* शेती व बागायतींच्या कायमस्वरूपी संरक्षणाची उपाययोजना करावी.
* वन्य प्राणी जंगलातच कसे राहतील? यासाठी संशोधन करून त्याची अंमलबजावणी करावी.
* नुकसानीचा पंचनामा करूनतातडीने भरपाई मिळवून द्यावी.
* तुटपुंज्या भरपाईचा फेरविचार करावा.
* प्रचंड नुकसानग्रस्तांना महागाईचा निर्देशांक लावून भरपाई मिळेल, अशी तरतूद करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.