बस्तान
-rat१९p३.jpg-
२५N७१६७९
चिपळूण : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर पालिकेने गटार खोदले आहे. त्या गटाराबाहेर खोके उभारण्यात आले आहेत.
-----
गटाराच्या बाहेर फेरीवाल्यांचे आता बस्तान
पालिकेच्या कारवाईचा परिणाम; रस्ते मोकळे झाल्याने दिलासा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २० : शहरातील बाजारपेठेत फेरीवाले आणि खोकेधारकांनी सुरक्षित अंतर ठेवून पुन्हा व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. मुख्य रस्त्यापासून काही अंतर लांब या व्यावसायिकांनी आपला व्यवसाय मांडला आहे. त्यामुळे खोकेधारकांचा आणि फेरीवाल्यांचा वाहतुकीला होणारा त्रासही कमी झाला असून, वाहनचालक, पादचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, भाजीमंडई परिसर, जुने बसस्थानक परिसर, भोगाळे, मार्कंडी, काविळतळी, बहादूरशेख नाका, चिंचनाका या भागात खोकेधारक आणि फेरीवाल्यांनी आपले बस्तान बसवले होते. रस्त्याच्या कडेला भाजी, चप्पल, लहान मुलांचे कपडे, छत्र्या, रेनकोट, सुकी मच्छी, थंडगार पेय यांसह फळविक्री आणि इतर घरगुती लागणाऱ्या साहित्याची विक्री केली जात होती. रस्त्याला लागूनच टपऱ्या बसवण्यात आल्या होत्या. त्याचा त्रास शहरातील वाहतुकीला होत होता. दुचाकीस्वार रस्त्यावरच दुचाकी लावून या किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदीचे व्यवहार करत होते. त्यामुळे अनेकवेळा लहान-मोठे अपघात व्हायचे. पायी चालणाऱ्यांना खूप त्रास व्हायचा. वाहनचालक, पादचारी आणि किरकोळ विक्रेते यांच्यामध्ये वाद व्हायचे. बुरूमतळी येथील मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसरही खोकेधारकांनी व्यापला होता. तीन महिन्यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकातून बस बाहेर काढताना चालकाला बसवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे ही बस समोरच्या नाल्यात जाऊन धडकली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन शहरातील अनधिकृत फेरीवाले, खोकेधारक यांच्यावर कारवाई करण्याची सूचना पालिकेला केली. पालिकेने कडक पाऊल उचलावे यासाठी कारवाईचे व्हिडिओ तयार करून ते पाठवण्याची सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केली होती. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर पालिकेने खोकेधारक आणि फेरीवाले यांच्यावर कारवाई केली. शहरात रस्त्याच्या कडेला २७० लहान-मोठे व्यावसायिक आपला व्यवसाय करून पोट भरतात. पालिकेने त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. या व्यावसायिकांची लोकप्रतिनिधींनी दखल घेतली आणि पालिकेला कारवाई थांबवण्याची विनंती ही केली होती; मात्र पालिकेने कोणाचेही ऐकले नाही. त्यामुळे काही काळ शहरातील रस्ते फेरीवाले मुक्त झाले होते; मात्र तीन महिन्यानंतर या फेरीवाल्यांनी पुन्हा आपल्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. हे व्यावसायिक रस्त्यापासून दहा फूट लांब अंतर ठेवून आपला व्यवसाय करत आहेत. त्यामुळे त्यांचा वाहतुकीला कोणताही अडथळा होत नाही.
----
दृष्टिक्षेपात
* भाजीमंडई परिसरात विक्रेत्यांच्या जागी पार्किंगची सुविधा
* भोगाळेतील मोकळ्या जागेवर पार्किंगची सुविधा
* रस्त्याच्या कडेला गटाराची खोदाई
* वाहतूककोंडी अपघात टाळण्यास मदत
---
कोट
स्थानिकांना व्यवसाय करण्यास आमचा विरोध नाही; परंतु शहरामध्ये रस्त्यावर अपघात झाला किंवा इतर कोणती घटना घडली तर पालिकेलाच धारेवर धरले जाते. त्यामुळेच पालिकेला खोकेधारक आणि फेरीवाल्यांवर कारवाई करावी लागते. त्यांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवसाय करावा.
- मंगेश पेढामकर, प्रशासकीय अधिकारी, चिपळूण पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.