पाणी मातीच घेऊन जात नाही ना बघायलाच हवं

पाणी मातीच घेऊन जात नाही ना बघायलाच हवं

Published on

बोल बळीराजाचे------------लोगो
(१४ जून टुडे ३)
गाळ काढायचं एक नवीन काम आता सरकार दरबारी चांगलाच भाव खाऊन आहे. शेतातून जाणारी लाल माती त्या मानाने अगदीच नगण्य म्हणायला हवी. नेमकी चिखलणीच्या वेळेलाच सणसणीत सर आली तर लाललाल पाणी बांध ओलांडून जातं, हे खरंच; पण ते थेट खाडीत समुद्रात जात नाही. ते लहान हर्ले, वहाळ, पऱ्ये, नदी, खाडी अशा क्रमानं थांबत थांबत जातं. शेतीच्या कडेच्या छोट्या हर्ल्यात मुद्दामचं छोटे खड्डे थोड्या थोड्या अंतरावर असतात त्यामुळेच मातीची झालेली धूप या खड्ड्यात साठते. बेसुमार वृक्षतोड, अमानवीय यंत्रांचा वारेमाप आणि अनावश्यक वापर यांनीही मातीची धूप प्रचंड होतेय. जमिनीच्या पृष्ठभागावरची जीवंत माती तयार व्हायला अनेक वर्ष लागतात; पण अविचारानं हा वरचा थरच नद्या नाल्यात, खाड्यात गाळाच्या रूपानं जातोय...

- rat२०p२.jpg-
25N71864
- जयंत फडके, जांभूळआड, पूर्णगड रत्नागिरी
---
पाणी मातीच घेऊन जात नाहीना,
हे आता बघायलाच हवं

यंदा तसा थोडा अपेक्षित असलेला पावसाचा मुहूर्त मृग नक्षत्र चुकवत रोहिणीच्या आधीच बरसला. कोकम आणि फणस सोडल्यास सारी फळं वेळेआधीच निरोपाची भाषा करू लागली, तेव्हाच खरंतर शंकेची चाहूल लागली होती. मॉन्सूनपूर्व, वादळ, कमी दाबाचा पट्टा म्हणता म्हणता हा पंधरा-वीस जून तर नाही ना? असं म्हणायची वेळ मे महिन्यातच आली. पऱ्यानाल्यांना नुसता हौर आला. कुऱ्याठ, बावळी, खऱ्या नुसत्या उमलल्या नाही तर फुगल्या. लालेलाल पाण्याने कोकणातल्या खाड्या अगदी चहासारख्या झाल्या. हा माझ्या कोकणच्या मातीचा रंग आसमंतात- पाण्याच्या थेंबाथेंबात भरून गेला..!
कोकणची माती लाल, काही ठिकाणी करडी; पण लालकडेच झुकलेली..अगदी बिनखड्याची म्हणावी इतकी मऊ नाही; पण पाण्याचा निचरा होणारी ..माझा बळीराजा जसं मनात काही ठेवत नाहीना तशीच..शास्त्रीय भाषेत हलकी, मध्यम, भारी असं वर्गीकरण करतात म्हणे..; पण ही लाल माती यातल्या कशात बसते देव जाणे? माझ्या बळीराजाचं; मात्र नितांत प्रेम या मातीवर..म्हणून तर कितीही अशास्त्रीय म्हणून चेष्टा झाली तरी मस्त भाजावळ करून ही माती तो भाजून भाजून काळी करतो; पण कृष्णाकाठच्या घाटावरच्या काळ्या आईशी माझ्या लाल मातीची तुलना करायची गरजच नाही. माझ्या लाल आईची सारी वैशिष्ट्ये जाणूनच बळीराजाच तिची योग्य ती मशागत करून बरोबर आपल्या पिकांचं नियोजन करतो. जिथे लाल मातीत जांभा दगड असतो तिथे हापूस छान होतो तर करड्या मातीत जेव्हा काळा दगड असतो तेव्हा काजू छान होतो. समुद्रापासून सह्याद्रीकडे जावे तसा मातीत फरक पडत जातो. हा काही किलोमीटरवर पडणारा फरक राहूद्या. अगदी मळे जमीन महान भात, कडधान्य.. कुऱ्याठात भात, कंदपिकं, भाटल्यात नाचणी, वरी अशी तृणधान्य, खरीत हळवी भातं अशी वेगवेगळी पिकं घेण्याची बळीराजाची कला अनुभवावर आधारित आहे.
गेल्या काही वर्षांत मात्र विकासाच्या मोठमोठ्या प्रकल्पांनी कोकणच्या मातीची अतोनात धूप केली आहे. काही वर्षापूर्वीचे मृदसंधारण खातेही आता कृषी या एकाच खात्यात विलीन झालंय म्हणे; पण प्रथम कोकण रेल्वेने आणि आता मुंबई-गोवा महामार्गाने कोकणच्या मातीची जी काही धूप झालीयं ती भरून येणं केवळ अशक्य आहे. लहान ओढे, नाले, नद्या आणि खाड्याही मातीने भरल्यात. वेगवेगळ्या संस्था आणि शासकीय योजना हा गाळ काढायचा प्रयत्न करतायत कारण, पुराचं पाणी नदीचा काठ सोडून शेतीत, गावात, शहरात घुसायला लागलंय; पण यात नेहमीप्रमाणेच दूरदृष्टीचा अभाव दिसतोय. हा काढलेला गाळ एकतर काढावर टाकून ‘ठेकेदार कल्याण योजना’ तरी होतेय किंवा सखल भागात अविवेकाने भर करून नैसर्गिक छोटे पाणी जिरवण्याचे मार्ग बंद केले जातायंत. या गाळाने कुठे खाणीचे पाडलेले मोठे खड्डे भरले जातायंत, कुठे छान गाळाची माती माझ्या बळीराजाच्या शेतात पडतेय किंवा रस्तेबांधकामात वापरली जातेय, बागेत टाकली जातेय असं मात्र दिसत नाही. कोकणात मोठ्या प्रमाणात असलेल्या उघड्याबोडक्या कातळावर जरी पडली तरी दोन-चार वर्षांतच तिथे छान शेतीयोग्य जमीन तयार होईल.
रासायनिक खते फवारण्या यांनीही खूप मोठ्या प्रमाणात मातीचं प्रदूषण होतंय. त्यात आता अतिविषारी तणनाशकांची भर पडलीय. सोप्पं करायच्या नादात आपण खूप नुकसान करून घेतोय. सेंद्रिय कर्बाची भरपूर उपलब्धता माझ्या बळीराजानं वापरून माती जीवंत ठेवायला हवी. एकदाच वापरलेल्या प्लास्टिकचा वारेमाप वापर मातीची वाट लावतोय. वणव्यांनी तर नाकी दम आणलाय. या साऱ्यावर कोणाचंच नियंत्रण नाही म्हणून माझ्या बळीराजानं आपल्या या अन्नदात्रीला जपायला, संपन्न करायला हवं. या मातीत पाणी जिरत नसलं, मुरून राहात नसलं तरी पाणी मातीच घेऊन जात नाहीना इतकं तरी बघायलाच हवं.

(लेखक प्रगतीशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com