नवोदय विद्यालयाची यशाची परंपरा कायम
नवोदय विद्यालयाची
यशाची परंपरा कायम
ओटवणेः केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जवाहर नवोदय विद्यालय, सिंधुदुर्गचा दोन्ही वर्गांचा निकाल १०० टक्के लागला. नवोदय विद्यालयाने निकालाची परंपरा कायम राखली आहे.. बारावीची ३२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात आयुष संजय गावडे याने ८४.८० टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात अव्वल क्रमांक पटकाविला. अनुष्का लवू सातार्डेकर हिने ८४.७० टक्के गुण घेऊन द्वितीय, तर दिव्या दिलीप तिरोडकर हिने ८४.३० टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला. दहावीसाठी ७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यात स्वधा संदीप लकांबळे हिने ९६.५७ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयात अव्वल क्रमांक पटकाविला. श्रेया संतोष गवस हिने ९५.८६ टक्के गुण घेऊन द्वितीय, तर कोमल सीताराम लांबर हिने ९५ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकाविला.
.........
गणित प्रज्ञा परीक्षेत
यशश्री ताम्हणकरचे यश
मालवणः महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत अॅड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगावची आठवीतील विद्यार्थिनी यशश्री ताम्हणकर हिने सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र प्राप्त यादीत स्थान मिळविले. जिल्ह्यातील निवडक शाळांमधील २३ विद्यार्थी या परीक्षेत पात्रताधारक ठरले. गणित प्राविण्य परीक्षेत यशश्री ताम्हणकर ही जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवून प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरली होती. याच शाळेतील भार्गवी नारायण कदमही प्रज्ञा परीक्षेसाठी पात्र ठरली होती. त्यांना शिक्षक सागर मिसाळ, निकिता माळगावकर, बेनके, जाधव आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले.
...................
सावंतवाडी शाळा
क्रमांक ४ चे यश
सावंतवाडीः महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, सावंतवाडी नं. ४ च्या तिन्ही मुलांनी ‘सिल्व्हर’ कॅटेगिरीत स्थान मिळविले. अतिशय अवघड समजल्या जाणार्या या परीक्षेत मुलांनी गुणवत्ता यादीत मिळविलेले स्थान निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळाच्यावतीने एप्रिल २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ. ५ वी राज्यस्तरीय गणित प्रज्ञाशोध परीक्षेत सावंतवाडी नं. ४ शाळेतील पार्थ अशोक बोलके, हार्दिक अनिल वरक व वीरा राजीव घाडी यांनी राज्याच्या ’सिल्व्हर’ कॅटेगिरीत स्थान मिळविले आहे. तीनही मुलांनी प्रचंड मेहनत करून हे यश मिळविले आहे. या मुलांचे, तसंच मार्गदर्शक शिक्षक महेश पालव व त्यांचे पालक या सर्वांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
...................
आरपीडी हायस्कूलच्या
सोहम, तन्वीला रौप्य
सावंतवाडीः महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळाच्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा शोध परीक्षेत येथील आरपीडी हायस्कूलच्या आठवीच्या सोहम कोरगावकर आणि तन्वी दळवी या दोन्ही विद्यार्थ्यांनी रौप्यपदकाची कमाई केली त्यांनी राज्य प्रज्ञावान विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान पटकाविले. या दोन्ही विद्यार्थ्यांसह पालक व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विकास सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर आदींनी अभिनंदन केले आहे.
-------------------
टक्के कुटुंबियातर्फे
शैक्षणिक साहित्य
तळेरेः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिडवणे क्रमांक १ शाळेला स्थानिक देणगीदार रामदास टक्के आणि त्यांच्या मातोश्री ललिता टक्के यांच्या देणगीतून शाळेतील सर्व मुलांना वह्या आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. टक्के कुटुंब गेली कित्येक वर्षे शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि निस्वार्थ सेवेमुळे शिरवणे गावातील मुला-मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत आहे. रामदास टक्के आणि ललिता टक्के या कुटुंबाच्या या परोपकारी वृत्तीबद्दल शिडवणे गाव, शिडवणे ग्रामपंचायत, शिडवणे शाळा व्यवस्थापन समिती आणि समस्त शिक्षक वृंदांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.
---------------
कणकवलीत पाणीपुरवठा
दोन दिवस राहणार बंद
कणकवलीः येथे शहराला पाणीपुरवठा करणार्या नळयोजनेतील कलमठ येथील पाण्याच्या टाकीचा पंप नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे शहरातील बिजलीनगर, किनई रोड, गांगोवाड़ी या परिसरात होणारा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीच्यावतीने केले आहे.
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.