वडिलांच्या पक्षाशी प्रामाणिक राहत वारसा जपला
71953
सावंतवाडी ः नातू कबीर याच्यासोबत वाढदिनाच्या शुभेच्छा स्विकारताना विकासभाई सावंत. (छायाचित्र ः रुपेश हिराप)
वडिलांच्या पक्षाशी प्रामाणिक राहत वारसा जपला
विकासभाई सावंत ः सावंतवाडीत वाढदिवस विविध उपक्रमांनी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २०ः ‘चांगलं काम करत राहा’ हा वसा घेऊन आयुष्यभर वाटचाल करत राहिलो. तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी विधान परिषदेची ऑफर दिली. पण, नियमांना झुगारून ती स्वीकारली नाही. वडिलांच्या पक्षाशी प्रामाणिक राहत त्यांचा वारसा जपला, अशी भावना येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकासभाई सावंत यांनी व्यक्त केल्या. ६२ व्या वाढदिवसानिमित्त राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. सावंत यांचा वाढदिवस शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. याप्रसंगी त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, ‘‘खरं तर, मला वाढदिवस साजरे करायला विशेष आवडत नाहीत. आयुष्यात मला लाभलेली माणसं आणि त्यांचे अनुभव, यातूनच स्वतःला घडवत गेलो. कितीही कौतुक झालं तरी, माझ्यावर झालेले संस्कार हे माझ्या अनेक गुरूंनी रुजवले आहेत. कधीही शॉर्टकटचा वापर केला नाही. ज्या व्यक्तींनी तत्वनिष्ठ जीवन जगले, त्यांचा माझ्यावर खूप प्रभाव होता. म्हणूनच, मी देखील जीवनात तत्वाशी कधीही तडजोड केली नाही.’’
वडिलांच्या निधनानंतर मिळालेल्या संधींबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस श्रेष्ठींनी विधान परिषदेची ऑफर दिली होती. पण, मी त्यावेळी तीस वर्षांचा नसल्याने, नियमांना झुगारून ती स्वीकारली नाही. त्यानंतरही अनेक संधी आल्या. पण, मी कधीही तत्वाशी तडजोड केली नाही. ज्या पक्षाने माझ्या वडिलांना नावलौकिक मिळवून दिला, त्या पक्षाशी प्रामाणिक राहिलो आहे आणि आजन्म राहीन.’’
शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीबद्दल ते म्हणाले, ‘‘अभ्यास करूनच, माझ्या वडिलांच्या सहकाऱ्यांच्या इच्छेखातर शैक्षणिक क्षेत्रात उतरलो. या वाटचालीत मला अनेक जणांची साथ मिळाली. सर्वांनी मला मान-सन्मान दिला, सोबत केली आणि साथ दिली. त्या सर्वांचा आभारी आहे. माझ्या सर्व संस्थांच्या वाटचालीत माझ्या सर्व सहकाऱ्यांची मेहनत आहे; मी केवळ निमित्तमात्र आहे.’’
आपल्या जीवनातील मूल्यांवर भर देताना त्यांनी सांगितले, ‘‘मला आयुष्यात सर्व काही आयतं मिळालं. पण, ते टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. आयुष्यात अनेक थोरामोठ्यांच्या सोबत राहता आले हे माझं भाग्य. मी आज जो काही आहे, तो या सर्वांमुळेच. त्यामुळे, माझ्याकडून आयुष्यात जे काही सर्वाधिक चांगलं देता येईल, ते देण्याचा माझा प्रयत्न आहे. आयुष्यात कोणतेही व्यसन केले नसतानाही आजारांनी साथ दिली. पण, मी डगमगलो नाही.’’
याप्रसंगी विक्रांत सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, सचिव व्ही. बी. नाईक, माजी नगराध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर, संप्रवी कशाळीकर, वसुधा मुळीक, अॅड. नकुल पार्सेकर आदींनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी गुरु नाईक, वसुधा मुळीक, सोनाली सावंत, छाया सावंत, बाळासाहेब नंदीहळ्ळी, नारायण देवरकर, अॅड. सुभाष पणदूरकर, अॅड. शामराव सावंत, राजेंद्र म्हापसेकर, संजय कानसे, चंद्रकांत सावंत, जगदीश धोंड, के. टी. परब, विभावरी सुकी, कबीर सावंत, धिरेंद्र होळीकर, प्रल्हाद सावंत, काका मांजरेकर, श्री. बोडके, अस्मिता ठाकूर, सौ. दळवी, सिद्धेश परब, बाळासाहेब पाटील, संजय गवस, प्रा. एल. पी. पाटील, एस. पी. नाईक, डॉ. दीपक तुपकर आदी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.