जागतिक योग दिन ः लेख
जागतिक योग दिन-----------लोगो
‘एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’
योग हा एक जीवनशैलीचा भाग आहे, जो आपल्याला अधिक निरोगी, आनंदी आणि शांत जीवन जगण्यास मदत करतो. मनात चांगले विचार ठेवणे, आपले आचरण चांगले ठेवणे, श्वासावर नियंत्रण, शरीराची लवचिकता व लयबद्ध हालचाल ही योगाची चतुःसूत्री आहे. आपल्या गरज आणि क्षमतेनुसार योग्य योगासनांची निवड करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा नियमित सराव करणे गरजेचे आहे. सर्व शासकीय आरोग्यसंस्थांमध्ये वर्षभर योगासत्र आयोजित केले जातात. त्यामुळे तेथील जनतेला शारीरिक व मानसिक आरोग्यदृष्टीने याचा फायदा होतो. म्हणून सर्वांनी आपल्या जीवनात योगसाधनेचा अवलंब करणे काळाची गरज आहे...!
- डॉ. मिताली मोडक,
जिल्हा आयुष अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी
----
जगभरात दरवर्षी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस केवळ शारीरिक व्यायामाचा उत्सव नसून, मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील सुसंवादाचे प्रतीक आहे. २०२५च्या जागतिक योगदिनाची संकल्पना ‘योग फॉर वन अर्थ, वन हेल्थ’ अशी आहे, जी ''एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित असून, भारताच्या ''वसुधैव कुटुंबकम्'' या प्राचीन तत्त्वज्ञानाचा वैश्विक संदेश देते. योग केवळ वैयक्तिक आरोग्यासाठी नाही तर संपूर्ण पृथ्वी आणि पर्यावरणाच्या समतोलासाठी किती महत्त्वाची आहे, हे अधोरेखित करते. जेव्हा प्रत्येक व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तेव्हाच एक निरोगी समाज आणि पर्यायाने निरोगी सृष्टीची निर्मिती होऊ शकते.
योग एक प्राचीन वरदान : योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. हजारो वर्षांपासून योग शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी एक प्रभावी साधना म्हणून ओळखला जातो. आजच्या धावपळीच्या जीवनात वाढलेला ताण, चिंता आणि अनेक शारीरिक व मानसिक व्याधींवर योग हा एक प्रभावी उपाय ठरला आहे.
योगाचे काही प्रमुख फायदे :
शारीरिक आरोग्य ः योगासने शारीरिक लवचिकता, स्नायूंची ताकद आणि शरीराची सहनशक्ती वाढते. रक्ताभिसरण सुधारते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
मानसिक शांती ः प्राणायाम आणि ध्यानामुळे श्वसनसंस्था सुधारते, ताणतणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते.
भावनिक संतुलन ः योग आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत करतो.
आध्यात्मिक महत्त्व : योग मन, शरीर आणि आत्मा यांच्यात सुसंवाद साधून आत्मजागरूकता वाढवतो.
योगाचे प्रकार ः
हठयोग ः हा योगाचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे, ज्यात शारीरिक आसने आणि श्वासोच्छवासाचे व्यायाम यांचा समावेश असतो. हे शरीर आणि मनाला ध्यान (meditation) करण्यासाठी तयार करते.
राजयोग ः याला ‘राजाचा योग’ असेही म्हणतात. यात पतंजलींच्या अष्टांग योगाचा समावेश आहे, ज्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी यांचा समावेश होतो.
कर्मयोग ः हा निःस्वार्थ सेवा आणि फळाची अपेक्षा न करता कर्म करण्यावर भर देतो.
भक्तीयोग ः हा प्रेम आणि भक्तीवर आधारित आहे, ज्यात ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण असते.
ज्ञानयोग : हा ज्ञान आणि आत्मशोधावर लक्ष केंद्रित करतो.
सूर्यनमस्कार : हे ७ आसनांचे एक संयोजन आहे, जे शरीराला ऊर्जा व कांती देते आणि लवचिकता वाढवते.
काही सामान्य योगासने ः
* पद्मासन : ध्यान आणि एकाग्रतेसाठी उत्तम आसन
* ताडासन : शरीर स्थिर आणि संतुलित ठेवण्यास मदत करते
* वृक्षासन : शरीराचे संतुलन सुधारते आणि एकाग्रता वाढवते
* भूजंगासन : पाठीच्या कण्याला लवचिकता देते आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करते
* पश्चिमोत्तानासन : शरीराची ठेवण सुधारते, मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी होतो, पचन सुधारते आणि मनाला शांत करते.
* धनुरासन : पोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंना बळकट करते.
* सर्वांगासन : थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते आणि रक्ताभिसरण सुधारते.
* वज्रासन : पचन सुधारते आणि पायांना बळकट करते.
* शवासन : शरीर आणि मनाला पूर्णपणे आराम देते.
- योगाचे फायदे ः
* शारीरिक लवचिकता : योग शरीरातील सांधे आणि स्नायूंना लवचिक बनवतो.
* शारीरिक ताकद : योगासने स्नायूंना बळकटी देतात आणि शरीराची ठेवण सुधारतात.
* तणाव कमी करणे : योग मन शांत करण्यास मदत करतो, ज्यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते.
* मानसिक स्पष्टता आणि एकाग्रता : योगामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि मानसिक स्पष्टता येते.
* श्वसनकार्य सुधारणे : प्राणायामामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसनप्रणाली सुधारते.
* उत्तम झोप : योगामुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो, ज्यामुळे चांगली झोप लागते.
* रोगप्रतिकारशक्ती वाढवणे: नियमित योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि विविध आजारांपासून बचाव होतो.
* वजन व्यवस्थापन : काही योगासने वजन कमी करण्यास आणि नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
* वेदना कमी करणे : पाठदुखी, मानदुखीसारख्या समस्यांमध्ये योग उपयुक्त ठरू शकतो.
* पचन सुधारणे : काही आसने पचनसंस्थेला चालना देतात आणि पचन सुधारतात.
* हृदयाचे आरोग्य : योग रक्ताभिसरण सुधारतो आणि हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करतो.
* मासिक पाळीमध्ये होणारा त्रास कमी होतो, थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुधारते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.