पर्यावरण संवर्धनाच्या शाश्वत विकासाचा ध्यास हवा...
rat२२p९.jpg- -
७२२६०
डॉ. प्रशांत परांजपे
इंट्रो
पर्यावरणाच्या शाश्वत विकासासाठी प्रत्येक लहान-थोर नागरिकांनी जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक आहे. कारण आता विनाशाला सुरुवात झाली आहे. हे थांबवायचं असेल तर कचरा ही माझी जबाबदारी, वृक्ष ही माझी जबाबदारी, जमीन आणि पाणी ही पण माझीच जबाबदारी याची जाणीव प्रत्येकानं करून घेणे काळाची गरज आहे. अन्यथा विनाशाची नौका अशीच आपल्याला समुद्राच्या पोटात कधी घेऊन जाईल हे कळणारही नाही....!
- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
--------
पर्यावरण संवर्धनाच्या शाश्वत विकासाचा ध्यास हवा...
पर्यावरणाच्या शाश्वत संवर्धनाचा प्रत्येकाने ध्यास घेणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे शाश्वत संवर्धन म्हणजे काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे. दीर्घकालीन निसर्ग संवर्धनाच्या ज्या योजना केल्या जातात, त्याला आपण शाश्वत संवर्धन असे म्हणतात. उदा. आपल्या पूर्वजांनी आजोबा-पणजोबांनी जी काही वृक्षवल्ली उभी केली होती. रोपटी लावली होती, त्याची फळ आज आपण खात आहोत. त्याच्या सावलीत बसत आहोत. तीनशे ते चारशे वर्षांपूर्वीच्या बकुळीच्या वृक्षांची छाया बघायची असेल, तर आवर्जून सज्जनगडावर जाऊन यावं म्हणजे त्याचे प्रत्यंतर येईल. त्यांनी त्यावेळी दीर्घकालीन उपाययोजना म्हणून वड, पिंपळ, बकुळ, जांभूळ, ऐन, किंजळ अशा अनेक मातृवृक्षांची लागवड केली.
किंबहुना पूर्वी रस्ते तयार झाले, त्या रस्त्यांच्या दुतर्फा वडाची आणि आंब्याची झाडे दिसून येत होती. ते याचेच उदाहरण आहे. सुमारे दीडशे-दोनशे वर्षांपूर्वी किंवा त्याहूनही अधिक काळापूर्वी जी लागवड केली गेली ती २००५ पर्यंत बऱ्यापैकी अस्तित्वात होती. मात्र त्यानंतरच्या काळात मानवाने विकासाच्या नावाखाली ती सपाट्याने कापून टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता ती जवळजवळ अस्तित्वहीन झालेली आहेत. पूर्वी ती लागवड शाश्वतपणा करता केलेली होती. दीर्घकालीन विचार करून ती लागवड झाली होती. परंतु विकासाच्या चुकीच्या संकल्पनांमुळे आपण शाश्वत पर्यावरणावरच कुऱ्हाड मारायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणून आज पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी होऊन पृथ्वी तापू लागली आहे. पृथ्वीवरील तापमान ४५ अंशाच्याही पुढे सरकल्यामुळे अंगाची लाही-लाही होऊ लागली आहे. हरित आच्छादन कमी झाल्यामुळे जमिनीची धूप वाढली, जमिनीची धरण क्षमता संपली, जमिनीत भूगर्भातील पाण्याची पातळी खालावू लागली, निसर्गाचा समतोल ढासळू लागला. ओझोनचा थर कमी होऊ लागला आणि त्याचाच परिणाम म्हणून अवेळी आणि अतोनात असा पाऊस बरसू लागला.
जंगलांची झालेली बेसुमार तोड हे वारंवार दरडी कोसळून आणि भूस्खलन होऊन डोंगर नेस्तनाबूत होण्यास सुरुवात झाल्याचे प्रमुख कारण आहे. या समवेतच जमिनीची धरण क्षमता संपल्यामुळे मुसळधार पडणाऱ्या पावसाचे पाणी हे जमिनीत न जीरता किंबहुना झाडे आणि झुडपे तुटल्यामुळे सुपिक आणि सकस जमीनच शिल्लक न राहिल्यामुळे हे पाणी नदी, नाले यांच्या मार्गे समुद्राला थेट जाऊन मिळत आहे. भूगर्भात पाणी न जाता समुद्राला जाऊन मिळत आहे. पृथ्वीवरील एकूण पाण्याच्या तीन टक्के पाणी गोडं अर्थात पिण्याच्या उपुक्ततेचे आणि उर्वरित ९७ टक्के पाणी हे समुद्राचे खारे पाणी असल्यामुळे आज गोड्या पाण्याचा प्रश्न आ वाचून उभा राहतो आहे कारण हे तीन टक्के पाणी पुरेसं असताना देखील तेही आम्ही दूषित करण्याच्या स्पर्धांचे आयोजनच सुरू केले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे जमिनीची धरण क्षमता वनस्पतींच्या नायनाटामुळे आणि खारफुटीच्या जंगलांची बेसुमार तोड झाल्याने कमी झाली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने समुद्र रोखण्याच्या धूप प्रतिबंधक बंधारा घालण्याच्या पद्धतीमुळे या खारफुटीवर विपरीत परिणाम होतो आहे. खारफुटी नष्ट झाल्यामुळे मानवाने कितीही भराव टाकून समुद्र अडवण्याचा प्रयत्न केला तरी तो निष्फळ ठरत आहे. निरीक्षणानुसार समुद्राने आता जागा सोडून जमिनीचा अर्थात पृथ्वीच्या भूभाग हा गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. ही अत्यंत मानवाच्या विनाशाच्या दिशेने फार प्रभावीपणे सुरू असलेली वाटचाल आहे.
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर ची किनारपट्टी लाभली आहे. त्यातील रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता केळशी ते रत्नागिरी या परिसरातील जी निरीक्षणे नोंदवली गेली आहेत, त्यानुसार खारफुटी नष्ट होणे अनेक ठिकाणी भराव निर्माण होणे आणि त्याच पद्धतीने पाण्याचे प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे समुद्राने आपली जागा सोडल्याचे लक्षात येईल अशी ठिकाणी येथे नोंद करतो आहे. दापोली तालुक्यातील मुरुड किनारा , रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या बंदर अशा अनेक ठिकाणी समुद्राने गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत जमिनीशी जवळीक साधल्याचे लक्षात येतं. यावर्षी देखील मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली आणि सोसाट्याचा वारा आणि बेभान झालेला मुसळधार पाऊस यामुळे किनारपट्टी प्रदेशातील नागरिकांच्या पोटात गोळा निर्माण झाला. कारण समुद्रात अनपेक्षितपणे उंच लाटा उसळू लागून समुद्र, नदी आणि खाडीच्या पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झालेली किनारपट्टीवरील नागरिकांसहित निरीक्षकांच्या देखील ही बाब लक्षात आले.
‘‘अरे बापरे यावर्षी किती पाणी आलं’’ असं म्हणून पाणी ओसरल्यावर नित्यकर्माला लागून आता चालणार नाही. कारण ही विनाशाची नांदी नसून सुरुवात आहे. गावामध्ये शिरलेले पाणी २४ तास किंवा ४८ तास कमी न होणे ही गोष्ट नजरेआड करून चालणार नाही. हे असं का होतं या मागचे कारण काय आणि त्यावर उत्तर काय या गोष्टीचा ऊहापोह होणं आणि त्यादृष्टीने महसूल विभागाने कोणत्याही गोष्टीला संमती देताना सारासार विचार करून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, अशा पद्धतीने कामकाज कसे होईल याकडे कटाक्ष ठेवणे अत्यावश्यक आहे...!
(लेखक शाश्वत पर्यावरण संवर्धन विषयातील डॉक्टरेट पदवीधारक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.