सावर्डे-शाहिस्तेखानावरील चढाई पहिले सर्जिकल स्ट्राईक

सावर्डे-शाहिस्तेखानावरील चढाई पहिले सर्जिकल स्ट्राईक

Published on

शाहिस्तेखानावरील चढाई
पहिले सर्जिकल स्ट्राईक
पांडुरंग बलकवडे; विठ्ठलराव जोशी ट्रस्टतर्फे कला कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २३ : शाहिस्तेखानावर केलेली चढाई हा जगातील पहिला सर्जिकल स्ट्राईक होता. पोर्तुगीजांकडून जहाजबांधणीचे तंत्र शिकून महाराजांनी आरमार दलाची उभारणी केली म्हणूनच शिवाजी महाराजांना भारतीय आरमाराचे जनक म्हणतात तसेच त्यांची ‘गनिमी कावा’ ही युद्धनीती आजही प्रभावी आहे, असे इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी शिवचरित्राचे सार आणि शिवचरित्रातून घ्यावयाची प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन कराताना विद्यार्थ्यांना विविध दाखले देऊन पटवून दिले.
सावर्डे येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज् ट्रस्टच्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित कला कार्यशाळेत ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच प्रेरणादायी आणि समृद्ध अनुभव देणाऱ्या या कार्यशाळेत इतिहास, परंपरा व राष्ट्रभक्ती यांच्या मूळ गाभ्याचे नातं प्रसिद्ध कलाकारांनी मांडले. कार्यशाळेच्या सुरवातीला आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी पोवाडा सादर केला. महाराष्ट्राला लाभलेल्या शाहिरी परंपरेविषयी माहिती सांगत त्यांनी पोवाड्याच्या ज्ञानेश्वरीतील उल्लेखापासून प्रथा, परंपरा व प्रकार यांची माहिती मावळे यांनी दिली. चांगल्या विद्यार्थ्यांची लक्षणे सांगणारा स्वरचित, रंजक फटका हा काव्यप्रकार सहकाऱ्यांसह सादर करत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार व जय जय महाराष्ट्र माझा या गीतांचे गायन शिकवले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारा पोवाडा शाहीर मावळे यांनी गाऊन प्रेक्षकांची मने सद्गदित केली. विख्यात लेखिका, निवेदिका व कलाकार सायली जोशी यांनी स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ यांचे प्रेरणादायी व नेतृत्वक्षम व्यक्तीमत्त्व विद्यार्थ्यांसमोर ''जिजाऊ-एकपात्री बहुरूपी नाट्याविष्कार'' या सादरीकरणातून केले. या प्रयोगात जिजाऊंच्या जीवनातील विविध टप्पे, बालपण, लग्न, शिवबांचा जन्म व संगोपन, स्वराज्याचे स्वप्न, धर्मनिष्ठा, राजकीय निर्णय क्षमतेसह त्यागमयी जीवन प्रभावीपणे साकारण्यात आले. प्रत्येक प्रसंगात वेगवेगळी वेशभूषा, आवाजात उतार-चढाव, चेहऱ्यावरील हावभाव आणि संवादफेक यांच्या सहाय्याने जिजाऊंचे खंबीर नेतृत्व, करारी बाणा, धाडसी वृत्ती आदी स्वभावाचे विविध पैलू उभे करण्यात आले. त्यांच्या कार्यातून संघर्ष, धैर्य आणि यशाची शिकवण विद्यार्थ्यांना देण्यात आली.
बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ''वंदे मातरम् १५०'' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वंदे मातरम् विषयाचे गाढे अभ्यासक मिलिंद सबनीस लिखित आणि प्रसाद कुलकर्णी दिग्दर्शित ''वंदे मातरम् १५०'' कार्यक्रमाचे अभिवाचन अभिषेक खेडकर, पल्लवी भालेकर, प्रदीप फाटक यांनी केले. या कार्यक्रमात वंदे मातरम् गीताचा संपूर्ण इतिहास रंजक पद्धतीने मांडला गेला. सोबत पूरक म्हणून दृकश्राव्य माध्यमाद्वारे अनेक दुर्मिळ ऑडिओ, व्हिडिओ विद्यार्थ्यांना पाहावयास मिळाले. यात रवींद्रनाथ टागोर यांनी १९०५ मध्ये स्वतः गायलेले वंदे मातरम् ऐकता आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com