पाऊस आणि आदिम बियाणी

पाऊस आणि आदिम बियाणी

Published on

rat23p17.jpg-
72493
कुणाल अणेराव

जपूया बीज वारसा---------लोगो

इंट्रो
तांदूळ हे एक महत्त्वाचे पीक असून, पृथ्वीवरील प्रत्येक तिसरा माणूस भातावर जगतो आहे. जगातील ९० टक्के भात हा आशियात पिकवला जातो आणि आशियातच खाल्ला जातो. आशिया खंडातील सर्व लोकांच्या दैनंदिन आहारात भात हा एक घटक असतो तर ७५ टक्के भारतातील लोकांच्या आहारात भात हा असतोच. टरफलासह असलेल्या तांदळाला साळ अथवा धान म्हटले जाते तर टरफलविरहित दाण्याला तांदूळ आणि शिजवलेल्या तांदळाला भात म्हणतात. तरीही प्रादेशिकतेनुसार यामध्ये फरक पडू शकतो.
-----
पाऊस आणि आदिम बियाणी

इसके बिना ना होय दिवाली, इसके बिन ना होवे पूजा!
भूनकर खिले, उबलकर निखरे, है दुनिया मे कोई दुजा?
याचे उत्तर आहे तांदूळ किंवा भात! पावसाळा आला की, कोकणातील माणसाला वेध लागतात ते भातशेतीचे. शहरात कामानिमित्त गेलेला कोकणातील चाकरमानी भात-लावणीसाठी आवर्जून गावाला येतो. भात हे जगातील काही आदीम धान्यांपैकी एक धान्य असून, जगात सर्वत्र पिकवला जातो. भाताच्या एक लाखाहून अधिक प्रजाती आहेत ज्या सर्व मूलत: एकाच प्रकारच्या प्रजातीपासून तयार झालेले आहेत. तांदळाचे शास्त्रीय नाव ओरायझा सॅटिवा असून, Gramineae कुळातील जंगली गवतापासून तांदूळ तयार झाले, असे मानले जाते. या मुख्य प्रजातीच्या इंडिका (indica) आणि जापनिज (Japanica) अशा दोन मुख्य प्रजाती आहेत. इ. स. वि. सन. पूर्व ७००० म्हणजेच आजपासून ९ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये यांगत्से नदीच्या खोऱ्यात तांदळाची लागवड केली जात होती, असे पुरावे मिळाले आहेत. त्यापुढे आलेल्या कांस्ययुगात चीनने तांदळाचे भरघोस उत्पन्न घेऊन उत्तम अर्थव्यवस्था आणि मोठे साम्राज्य उभारले.
भारतात तांदळाचा उगम हा गंगेच्या खोऱ्यात साधारण ख्रिस्तपूर्व साडेचार ते पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजेच आजपासून सुमारे साडेसहा ते सात हजार वर्षांपूर्वी झाला. ती तांदळाची ओरायझा निवारा ही प्रजाती होती. पुढे यमुना, सरस्वती, सिंधू, ब्रह्मपुत्र, महानदी, नर्मदा, तापी, गोदावरीसारख्या नद्यांच्या खोऱ्यात तांदळाची लागवड होत गेली. पुढील दीड हजार वर्षांत संपूर्ण भारतीय उपखंडात तांदळाच्या विविध आकार, रंग, चवीच्या तांदळाच्या प्रजाती तयार झाल्या. जगातील सर्व प्राचीन संस्कृतींमध्ये तांदूळ हे भरभराटीचे, समृद्धीचे व वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. भारतीय संस्कृतीमध्येही तांदूळ अथवा भात याला मानाचे स्थान आहे. पूजा, विवाहसारखे शुभ कार्य पार पाडताना तांदळाच्या अक्षता वापरल्या जातात. बाळाचे उष्टावण हे बाळाला भात भरवून केले जाते तर अंत्यविधी करताना पिंडदान म्हणून भात वापरला जातो. सवाष्ण बाईची ओटी तांदळाने भरली जाते. अनेक राज्यांमध्ये रांगोळी किंवा अल्पना काढण्यासाठी तांदळाचे पीठ वापरले जाते. महाभारतामध्ये अश्वत्थामा दूध मागत असताना त्याला तांदळाचे पीठ पाण्यात मिसळून दूध म्हणून दिले होते तर सुदामाने तांदळापासून बनलेले पोहे आपला मित्र कृष्णासाठी भेट म्हणून आणले होते. लक्ष्मीपूजनासाठी साळीच्या लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मराठीत तर शितावरून भाताची परीक्षा, शिजेपर्यंत दम धरवतो निवेपर्यंत नाही. तांदळातल्या खड्यासारखे बाजूला करणे, धुतल्या तांदळासारखा स्वच्छ यासारखे वाक्प्रचार आणि म्हणी सहज रूळल्या आहेत.
भारतीय वैदिक वाङ्मयात (इ. स. पू. २५००–५००) यज्ञांच्या संदर्भात तांदळाचे विविध उपयोग आणि प्रकार याचा उल्लेख असून, शेतीच्या प्रक्रियेचे वर्णन आहे. महाभारत (इ. स. पू. ३००), चरकसंहिता (इ. स. दुसरे शतक), सुश्रुतसंहिता (काळ अनिश्चित) या ग्रंथात तांदळाच्या काही प्रकारांचे वर्णन दिलेले आहे. आयुर्वेदाने बहुतेक सर्व रोगांमध्ये तांदूळ हा पथ्यकारक म्हणून सांगितला आहे.
तांदूळ उत्पादनात चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, व्हिएतनाम आणि थायलंड हे देश क्रमाने आघाडीवर आहेत. भारताने २०२१-२२ या वर्षामध्ये दीडशे देशांमध्ये तांदूळ निर्यात केले. जगात तांदळावर संशोधन करणारी पहिली संस्था जपानच्या टोक्योमध्ये १८८६ मध्ये सुरू करण्यात आली होती. भारतात १९४६ मध्ये ओदिशामधील कटक येथे तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आले. भारतात समुद्राच्या पाण्याने खारवलेली जमीन असो की, हिमालयाच्या १० हजार फुटावरही भात पिकवला आणि खाल्ला जातो. भातशेती आणि स्थानिक बियाणांबद्दल अधिक जाणून घेऊया पुढील भागात.

(लेखक शेतकरी असून, आदिम बियाणी संवर्धन करत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com