मंडणगड-सर्वाधिक तापमानाचे गरमकुंड पुरामुळे धोक्यात
rat23p10.jpg
72463
मंडणगड ः भारजा नदीला आलेल्या पुरात गरम पाण्याचे कुंड पाण्याखाली गेले आहे.
--------------
सर्वाधिक तापमानाचे गरम कुंड पुरामुळे धोक्यात
उन्हवरेतील अनमोल खजिना; भारजा नदीच्या पुरामुळे वारंवार पाण्यात
दृष्टिक्षेपात...
* हानी होऊन झऱ्यांना धोका
* तापमान ७० ते ८० अंश
* नदी टेकडी तोडून सरकतेय कुंडाकडे
* संवर्धन होणे गरजेचे
सचिन माळीः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २३ः तालुक्यातील सर्वांत लांब आणि विविध आविष्कार सामावलेली नदी अशी ओळख असणाऱ्या भारजा नदीच्या डाव्या तीरावर महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारे गरम पाण्याचे कुंड आहे. वैविध्यतेने नटलेल्या उन्हवरेच्या भूमीत निसर्गाचा हा अनमोल खजिना दडलेला आहे; मात्र हा नैसर्गिक आविष्कार नदीला वारंवार येणाऱ्या पुरामुळे धोक्यात आला आहे. गरम पाण्याचे जलकुंड, महादेवाचे स्थान पाण्यात बुडून जात असून, प्रवाहात त्याचे नुकसान होत आहे.
मूळ स्रोत असणारे कुंड डाव्या बाजूला आहे. येथील पाण्याचे तापमान ७० ते ८० अंश असून, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमानाचे कुंड असा याचा लौकिक आहे. वाफेची धग दुरूनही जाणवते. याच कुंडातले पाणी एका चरातून दुसऱ्या कुंडात नेले आहे. तेथे तापमान कमी होत असल्याने तेथे स्नानाचा आनंद उपभोगता येतो. गंधकमिश्रित असणारे कुंडातील पाण्याने स्नान केल्यास त्वचेचे विकार व वाताचे विकार बरे होतात. मुख्य कुंडातून स्रवणारे गरम पाणी आसपासच्या सुमारे एक एकर परिसरात पसरत असल्याने गरम चिखलयुक्त पट्टा दिसून येतो. गरम कुंडाचे पाणी जेथे नदीला मिळते अशा गरम पाण्यातही शंख-शिंपले, मासे, जलचर फिरताना पाहायला मिळतात.
चौकट
विकेंड डेस्टिनेशन
स्थानिक श्रद्धाळूंसह पर्यटकांना खुणावणारे हे गरम पाण्याचे कुंड आहे. महाशिवरात्रीला पहाटे या कुंडातील गरम पाण्याने आंघोळ करण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. नैसर्गिक चमत्काराचा अनुभव देणारे क दर्जा मिळालेले हे स्थळ सर्वांना आकर्षित करत असून, विकेंड डेस्टिनेशन ठरले आहे.
चौकट
नदीपासून संरक्षणासाठी हवी संरक्षक भिंत
पावसाळ्यात नदीला वारंवार पूर येत असल्याने पुराचे पाणी या कुंडाच्या वरून वाहते. हे कुंड नदीच्या बाजूला वाळूच्या टेकडीवर आहे. नदी दरवर्षी हळूहळू ती टेकडी तोडून कुंडाकडे सरकत आहे. त्यामुळे कुंडातील पाण्याचे झरे हे काही प्रमाणात नदीत प्रवाहित होऊ लागले आहेत. त्यामुळे कुंडातून वाहणारे पाणी कमी होऊ लागले आहे. हे सगळं थांबवण्यासाठी कुंडाच्या भोवती नदीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधणे गरजेचे आहे तसेच अन्य उपाययोजना करून संवर्धित करणे गरजेचे आहे अन्यथा येथील गरम पाण्याच्या झऱ्याचा प्रवाह बदलला तर निसर्गाचा हा अनमोल खजिना लुप्त होण्याची शक्यता आहे.
चौकट
ग्रामस्थांच्या पाठपुराव्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
येथील कुंडाचे संरक्षण व्हावे यासाठी येथील ग्रामस्थ पाठपुरावा करत असून, सातत्याने मागणी करत आहेत; मात्र त्यांच्या मागणीकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करत आहेत. येथे पर्यटनवाढीच्यादृष्टीने ठोस पावले उचलली जात नाहीत. तालुक्यातील पर्यटनस्थळांपैकी हे ठिकाण महत्वपूर्ण असल्याने त्याचे जतन संरक्षण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
चौकट
पक्षी निरीक्षणासाठी उत्तम जागा
भारजा नदीच्या डाव्या तीरावरील कुंडाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या मंदिरात चंडिका, मुकाटा, वळजाई देवी स्थानापन्न आहेत. नदीकाठाने व लगतच्या डोंगरी भागात भरपूर झाडी आहे. नदीच्या काठाने तामणाची असंख्य झाडे असून, सुंदर जांभळ्या फुलांची उधळण बघून डोळे सुखावतात. ज्यांना पक्षी निरीक्षणाची आवड आहे त्यांच्यासाठी ही जागा आदर्श आहे.
चौकट
डोंगराच्या कुशीतील निसर्गरम्य ठिकाण
गरम पाण्याचे कुंड जांभा दगडाने बांधलेले भरभक्कम असून, जवळच पिंडी व शेजारी सावली देण्यास सदैव सज्ज असलेला महाकाय आम्रवृक्ष आहे. डोंगराच्या कुशीत घनदाट जंगलात वसलेले सर्वांत निसर्गरम्य उन्हेरे असे याचे वर्णन करता येईल. पहाटे दुरूनच जमिनीतून वाफा बाहेर पडत असल्याचे अपूर्व दृश्य दिसते.
महाशिवरात्रीला मोठी गर्दी
महाशिवरात्रीला परिसरातील उन्हवरे, तोंडली, आंबवणेखुर्द, वडवली, कोन्हवली, आतले, पाले, पाचरळ, वेरळ, पालवणी, ताम्हाणे गावे व तालुक्यातून श्रद्धावान मोठ्या संख्येने पहाटे तीन वाजल्यापासूनच आंघोळीसाठी हजेरी लावतात. या दिवशी मंदिर परिसरात मोठा बाजार भरतो. पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन परिसराचा अधिक नियोजनपूर्वक विकास होणे गरजेचे आहे.
कोट
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २०२३ मध्ये पाहणी करून अहवाल सादर केला गेला. तरी या गोष्टीकडे गांभीर्याने बघून योग्य ती कार्यवाही होणे गरजेचे आहे. नाहीतर आपल्या तालुक्याची ओळख असलेले निसर्गाचे वरदान लाभलेले हे गरम पाण्याचे कुंड केव्हाही लुप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- रमण दळवी, ग्रामस्थ
कोट
मंडणगड तालुक्याला नैसर्गिक अशी अनेक पर्यटनस्थळ लाभली आहेत. त्या पर्यटनासाठी पर्यटन हंगामानुसार भेट देत असतात. गरम पाण्याचे कुंड हे महत्वाचे स्थळ असून, हा अनमोल ठेवा कायमस्वरूपी सुरक्षित राहावा यासाठी त्या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे. अतिशय निसर्गरम्य ठिकाण असून त्यातून तालुक्याचे पर्यटन फुलत आहे.
- समीर पारधी, ग्रामस्थ
-----
कोट
भूस्खलनमुळे पुराच्या पाण्यात दरवर्षी कुंडाजवळील मातीची धूप होत आहे. याठिकाणी संरक्षित भिंत व्हावी म्हणून सार्वजनिक विभागाकडून पाहणी, अंदाजपत्रके झाली. मात्र कृतीत काही अजूनही उतरलेले नाही. ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. हे स्थळ अबाधित ठेवण्यासाठी सतर्कतेने याठिकाणी उपाययोजना होणे अत्यावश्यक आहेत. गरम पाण्याचे कुंडाकडे जाणारा मुख्य रस्ता आणि पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी ही आग्रही मागणी आहे.
- उदय जोशी, सरपंच, उन्हवरे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.