रत्नागिरी - आंबा बागायतदारांवर आत्महत्या करण्याची वेळ
आंबा बागायतदारांची १०० टक्के कर्जमाफीची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; पावसामुळे बागांचे प्रचंड नुकसान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ ः जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरवातीपासून पडलेल्या पावसामुळे आंबा बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे बागायतदार हवालदिल झाले असून, सरकारने मदत करावी अशी मागणी आंबा बागायतदारांनी केली आहे. हे निवदेन जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे. जर सरकारने यावर्षी १०० टक्के कर्जमाफी केली नाही तर रत्नागिरीतील बागायतदारांना सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ येईल, असा इशारा बागायतदारांनी दिला.
रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्था, कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते सहकारी संस्था, पावस परिसर आंबा उत्पादक संस्था, आडिवरे मंगलमूर्ती संघ व करबुडे रवळनाथ संघ यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आंबा नुकसान भरपाई मिळावी, यासाठी निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्यावतीने प्रकाश साळवी यांनी निवेदन देताना अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे पावसाने केलेल्या हानीकारक नुकसानीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले ७५ टक्केपेक्षा अधिक आंबा उत्पादन पावसामुळे नष्ट झाले. सुरवातीला तुरळक आंबा बाजारात गेला आणि त्या वेळी शेतकऱ्यांचा हंगाम जोरात सुरू झाल्यामुळे आंबा तोडणीही वेगाने केली गेली. त्या वेळी आकस्मिक आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले. फवारणी, खते, राखण व गुरखे, मजुरी, खोके यासाठी केलेला खर्चही शेतकऱ्यांना उभा करणे अशक्य झाले आहे. आता बँकांचे कर्ज कसे फेडावे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे शंभर टक्के कर्ज माफ करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देताना संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, सचिव प्रकाश साळवी, खजिनदार टी. एस. घवाळी, दत्ता तांबे, सुनील नवले, शेखर घोसाळे, महिंद्रा आंब्रे, किरण तोडणकर, सुरेंद्र घुडे, अशोक भाटकर आदी उपस्थित होते.
चौकट
परिणामकारक कीटकनाशके द्या
आंबाबागांमध्ये वापरली जाणारी कीटकनाशके आणि खते शेतकऱ्यांना सवलतीत मिळावी, अशी बागायतदारांची मागणी आहे. बाजारात मिळणारी कीटकनाशके प्रभावी ठरत नसल्याने होणारा खर्च वाया जातो. त्यासाठी सरकारने परिणामकारक कीटकनाशके उपलब्ध करून दिली पाहिजेत, असे बागायतदारांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.