भास्कर जाधवांच्या मनात नेमके चाललंय तरी काय?

भास्कर जाधवांच्या मनात नेमके चाललंय तरी काय?

Published on

rat24p29.jpg-
72795
आमदार भास्कर जाधव
----------
भास्कर जाधवांची चलबिचल संभ्रमात टाकणारी
पक्षावर नाराजी; अधिवेशनाच्या तोंडावर भावनिक वक्तव्याने कल्लोळ
मुझफ्फर खानः सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे कोकणातील नेते आणि एकमेव आमदार भास्कर जाधव पक्षनेतृत्वावर वारंवार नाराजी दाखवत आहेत. दुसरीकडे ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे गुणगान गात आहेत; मात्र ठाकरेंची साथ सोडणार नाही, असे ठामपणे सांगतानाच त्यांनी निवृत्तीचेही संकेत दिले आहेत. त्यामुळे वादळात ज्याप्रमाणे वाऱ्याची दिशा समजत नाही तसेच भास्कर जाधव यांच्या राजकीय वाटचालीची दिशा समजेनाशी झाली आहे. पावसाळी अधिवेशन जवळ येत असतानाच आमदार जाधव यांच्याकडून होत असलेल्या भावनिक वक्तव्यांमुळे त्यांच्या मनात नेमके चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चिपळूणमधून शिवसेनेच्या तिकिटावर दोनवेळा निवडून आलेले भास्कर जाधव तिसऱ्यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादीत गेले. २००९च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना ११ खात्याचे मंत्री केले. अडीच वर्षानंतर त्यांचे मंत्रिपद गेले, तेव्हा शिवसेनेच्या काही नेत्यांनी भास्कर जाधव यांच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर म्हणून शरद पवारांनी त्यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले. त्यानंतर कामगार खात्याचे मंत्रिपदही दिले. शरद पवार यांनी भास्कर जाधव यांचे वजन वाढवल्यानंतर शिवसेनेला त्यांचे महत्व समजले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद आणि पक्षात सन्मान देण्याचा शब्द दिल्यानंतर जाधव पुन्हा शिवसेनेत परतले; मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जाधवांना मंत्रिपद नाकारण्यात आले. त्यामागे शरद पवार होते, अशी चर्चा रंगली होती. मंत्रिपद नसताना भास्कर जाधव मागील पाच वर्ष भाजपवर आक्रमकपणे प्रहार करत आहेत. पक्ष फुटल्यानंतरही ते ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहिले. आता विरोधी पक्षनेता होण्याची इच्छा दर्शवली आहे; मात्र महाविकास आघाडीत शिवसेनेकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपद देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत झाले आहे.
भास्कर जाधव यांच्या नावाला महाविकास आघाडीत एकमत आहे; मात्र ठाकरेंच्या जवळचे काही नेते त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यावर घोषणा होईल, असे वाटले होते; मात्र तसे झाले नाही. आता पावसाळी अधिवेशन जवळ आले आहे. त्यामुळे भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते पदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी तिसऱ्या क्रमाकांवर भाषण केले. त्या वेळी त्यांच्यात कुठेही नाराजी दिसली नाही; मात्र, या घटनेला दोन दिवस उलटताच जाधव यांनी शिवसैनिकांचा मेळावा घेतला. त्यात त्यांनी मन मोकळं केलं. मला काम करण्याची संधी कमी मिळते याचा अर्थ माझ्यात काहीतरी दोष आहे, असे सांगत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली तसेच पक्षातील विरोधकांना सौम्य शब्दात इशाराही दिला. एका मुलाखतीवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही त्यांनी कौतुक केले आणि राजकीय निवृत्तीचे संकेत देताना त्यांनी सर्वांनाच भावनिक करण्याचा प्रयत्न केला. किमान जाता जाता मला हे पद मिळावे, अशी त्यांची या मागील भावना असावी आणि त्यासाठी शरद पवार हे महत्वाची भूमिका बजावू शकतात असे त्यांना वाटत असावे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत भास्कर जाधव यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यावरून एकमत झाले आहे. आता भाजपने निर्णय घ्यायचा आहे. जाधवांना विरोधी पक्षनेतेपद दिल्यानंतर नक्की कोणाची अडचण होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आहेत. त्या भाजपला जिंकायच्या आहेत. शिवसेनेकडे हे पद गेल्यानंतर निश्चितच शिवसेनेची ताकद वाढणार आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणही बदलणार आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात नक्की काय होईल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
-----------
चौकट १
आताच राजकारण सोडण्याची उपरती का?
आमदार भास्कर जाधव यांनी पागनाका येथील संपर्क कार्यालयाचे नूतनीकरण केले. त्यावर त्यांच्यासह त्यांचे दोन पुत्र, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आणि मशाल हे चिन्ह आहे. त्यामुळे भास्कर जाधव सध्यातरी ठाकरेंची साथ सोडणार नाहीत, हे स्पष्ट होते; मात्र मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे ती बदलणार नाही. असे सांगत त्यांनी सध्या इतर कोणत्याही पक्षात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. सगळे काही सुरळीत सुरू असताना जाधव यांनी थांबण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना आताच राजकारण सोडण्याची उपरती का आली? याची जोरात चर्चा रंगली आहे.
---
कोट
मी एकवेळ जिल्हा परिषद, एकवेळ विधान परिषद आणि सातवेळा विधानसभेची निवडणूक लढवली. प्रत्येकवेळी संघर्ष केला. त्यामुळे सहजासहजी हार मानणारा कार्यकर्ता मी नाही; मात्र आणखी किती दिवस संघर्ष करू, याचाही विचार करण्याची आज गरज आहे. मी पक्षात कोणावरही नाराज नाही. स्पष्ट बोलण्याची माझी पहिल्यापासून सवय आहे. माझ्या बोलण्याने काही दुखावतात. आगामी निवडणुकीत शिवसेनेला यश प्राप्त करून देण्यासाठी मी पुन्हा एकदा झटणार आहे.
- भास्कर जाधव, शिवसेना नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com