-विठ्ठल आवडी प्रेमभावो
संतांचे संगती---------लोगो
(१२ जून टुडे ३)
समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या चंद्रभागा तीरावर वसलेल्या पांडुरंगांच्या आषाढी वारीची लगबग आता सुरू झाली आहे. अनेक संतांच्या पादुका घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी पंढरीकडे मार्गस्थ झाले आहेत. या आषाढी वारीच्या निमित्ताने आपण भगवान श्री पांडुरंगाच्या रूपाचे आणि महिम्याचे चिंतन करूया.
-rat२५p१५.jpg -
- धनंजय चितळे
------
विठ्ठल आवडी प्रेमभावो
आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, या संत श्री नामदेव महाराजांच्या वचनाप्रमाणे पंढरपूर हे खूप प्राचीन तीर्थक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी श्री भगवंतांचे अस्तित्व पाण्यात असते त्या ठिकाणाला तीर्थ म्हणतात. उदाहरणार्थ, राजस्थानमधील पुष्कर होय तर ज्या ठिकाणी हे अस्तित्व जमिनीवर असते त्याला क्षेत्र असे म्हणतात. उदाहरणार्थ गुजरात राज्यातील श्रीक्षेत्र गिरनार. जेव्हा श्री भगवंतांचे अस्तित्व दोन्ही ठिकाणी असते तेव्हा त्याला तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. म्हणूनच संत श्री एकनाथ महाराज तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल असे म्हणतात.
पंढरपूरच्या पांडुरंगाचे वर्णन करणारे अनेक अभंग संतांनी लिहिले आहेत. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज म्हणतात,
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
तर ज्या वेळी माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हे रूप पाहिले त्या वेळी ते भावविभोर होऊन आपल्या भगिनीला मुक्ताबाईंना म्हणाले,
रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी
तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर
विटेवर दोन्ही हात कटीवर घेऊन आपल्या चरणांकडे लक्ष ठेवून उभे असलेले श्री विठ्ठल काय सुचवतात, याबद्दल भगवद् पूज्यपाद श्री आद्य शंकराचार्य म्हणतात की, जणू पांडुरंग सांगतात की, जो कोणी माझ्या चरणाशी आला आणि माझ्या नामात रंगला त्याला हा भवसागर कंबरेइतकाच खोल आहे त्यात तो भक्त बुडणार नाही. जगद्गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात,
वाट पाहे उभा भेटीसी आवडी
कृपाळू तातडी उताविळ
अर्थात, ज्याप्रमाणे शाळेतून आपलं मुल अजून कसे आले नाही याची काळजी करत आई उभी असते त्याप्रमाणेच आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहता पाहता ते माझे भक्त अजून का आले नाहीत, अशा विचाराने देवांनी आपले हात कंबरेवरती घेतले आहेत. ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, एखादे काम पूर्ण झाल्यावर त्या कामाकडे कौतुकाने पाहताना ज्याप्रमाणे आपण आपले हात कंबरेवर घेतो त्याचप्रमाणे आपल्याकडे आलेल्या भक्ताकडे पाहताना भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपांडुरंगांनी आपले हात कटीवर ठेवले आहेत. परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे म्हणतात, तिरूपतीला अर्थब्रह्म आहे, जगन्नाथपुरीला अन्नब्रह्म आहे आणि पंढरपूरला भक्तीब्रह्म आहे. भक्तांच्या ओढीने श्री पांडुरंग विटेवर वाट पाहत उभे आहेत. याचे कारण सांगताना ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात की, ही मातीची वीट नाही तर प्रपंचाची वीट आल्याशिवाय पांडुरंग भेटत नाही, हे दाखवणारी ती वीट आहे. वाचकहो, आपण देवांचे दर्शन घेतो म्हणजे नुसती मूर्ती पाहतो, त्या रूपाचं चिंतन करतो का? त्याच्या त्या रूपातून आपण काय बोध घ्यायचा याचा विचार कधी करतो का? वारी जशी बहिरंगाची असते तशी अंतरंगात घडणारीही असते. आपल्या परंपरांचा विचार करून त्यांचे माहात्म्य समजून घेणे आणि श्रीभगवंतांच्या नामाची आठवण ठेवत अनुसंधानात राहाणे ही अंतरंगवारी होय. पुढील लेखात आणखी काही चिंतन करूया.
(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.