-पक्ष सोडणाऱ्यांच्या व्यथा समजून घ्या
पक्ष सोडणाऱ्यांच्या व्यथा समजून घ्या
भास्कर जाधव ः नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांच्या बैठकीत पक्षावर नाराजी व्यक्त केली. पक्षातील नेते आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जातात हे नेतृत्वाला समजत नाही का, असा प्रश्न उपस्थित करत पदाधिकारी पक्ष का सोडत आहेत हे समजून घ्यायला हवे. त्यांच्या व्यथा अडचणी असतील तर त्या पक्षनेतृत्वाने सोडवायला हव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला.
चिपळूण येथे पक्षाचे जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जाधव बोलत होते. या बैठकीत त्यांनी पहिल्या फळीतील नेत्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले, निवडणुकीत उमेदवाराला एबी फॉर्म देताना मला विचारात घेण्यात आले नाही. विधानसभा निवडणुकीत माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी होती; पण तिथल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले हे मला सांगण्यात आले नाही. ते कोणी दिले? कसे दिले? याची माझ्याकडे काहीच माहिती नव्हती. ज्या भागाची जबाबदारी आहे तिथल्या गोष्टी मला समजायला हव्यात, असे जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. पक्षातील लोक फुटून जात असताना आपल्या नेत्यांना पत्ता कसा लागत नाही? लोक पक्ष का सोडत आहेत हे समजून घ्यायला हवे. त्यांच्या व्यथा अडचणी असतील तर त्या सोडवायला हव्यात, असा सल्ला जाधव यांनी दिला आहे.
ते म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मला कधीही वेळ घ्यावी लागत नाही. कधीही मला गेटवर एक सेकंदही थांबवले जात नाही. माझी गाडी पाहिल्यानंतर सर्व सुरक्षारक्षक ओळखतात. त्या वेळी एक सेकंदही न थांबता माझी गाडी थेट आत पाठवली जाते. मी माझी शिस्त पाळतो; पण मी गेटवर उभा राहतो, चेक करा म्हणून सांगतो कारण, माझ्या नेत्याची सुरक्षाव्यवस्था मला महत्त्वाची आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मला बोलवायला पाहिजे, असे काहीही नाही. मला वाटेल तेव्हा मी कधीही जाऊ शकतो.
---
कोट
भास्कर जाधव यांची नाराजी आमच्या कानावर आलेली नाही. निवडणुकीच्या उमेदवारांबाबत उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जातो. यात इतर नेत्यांचाही सहभाग असतो. जाधव नाराज असतील तर उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतील. उद्धव ठाकरेंचा दरवाजा त्यांना कायम खुला आहे.
- विनायक राऊत, सचिव, शिवसेना
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.