अलोरेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा संकुल उभारा
आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारा
सुरजराव शिंदे ः खासदार राणे यांना साकडे, अलोरेत शासकीय जागा उपलब्ध
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २५ ः तालुक्यातील अलोरे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी आवश्यक तेवढी शासकीय जागा उपलब्ध आहे. त्यामुळे कोकणातील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारावे, अशी मागणी शिरगांव येथील सुरजराव शिंदे व ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली. त्यानुसार खासदार राणे यांनी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यासाठी आयुक्तांना नावीन्यपूर्ण अथवा क्रीडासुविधा निर्मिती योजनेमधून प्रस्ताव सादर करा, अशी सूचना केली आहे.
खासदार राणे यांना दिलेल्या निवेदनानुसार, चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागात अनेक मातब्बर खेळाडूंनी देशात नावलौकिक मिळवला आहे. येणारी पुढची पिढी त्यांचा वारसा जोपासत आहे. सध्याची परिस्थिती व खेळात वापरले जाणारे प्रगत तंत्रज्ञान तसेच अत्याधुनिक साधने यामुळे तेथील युवक मागे पडत आहे. त्यांना कबड्डी, क्रिकेट वगळता इतर खेळात अपुऱ्या साधनांमुळे सहभाग घेता येत नाही. अलोरे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल झाल्यास चिपळूण तालुक्याला लागून पश्चिम महाराष्ट्र असल्याने क्रीडा संकुलाचा फायदा दोन्ही प्रदेशाला होईल. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागून बेरोजगारी आटोक्यात आणता येईल. गेली अनेक वर्षे तेथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा आवश्यक तो मोबदला मिळाला नसून, प्रकल्पग्रस्त म्हणून क्रीडा विभागात नोकऱ्यांमध्ये समाधानकारक संधी स्थानिकांना मिळेल. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प चिपळूण तालुक्यापासून काही अंतरावर असल्याने पर्यटनाच्यादृष्टीने त्याचा फायदा क्रीडा स्पर्धेदरम्यान येणाऱ्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू आणि प्रेक्षक यांना होईल. इनडोअर व आउटडोअर राष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक सुविधांचे क्रीडा संकुल उभारल्याने खेळाडूंना अनेक पायाभूत सुविधा मिळण्यास आवश्यक ती मदत होईल.
कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत सातारा सिंचन मंडळाच्या कोयना विभागातील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन उपविभाग अलोरे येथे जमीन उपलब्ध आहे. या विभागात कोयना व कोळकेवाडी जलविद्युत प्रकल्प असल्याकारणाने भविष्यात वीज आणि पाणी याची कमतरता भासणार नाही. चिपळूण तालुक्यात अत्याधुनिक सुविधांचे इनडोअर व आउटडोअर पद्धतीचे शासकीय क्रीडा संकुल नाही. त्यामुळे येथील स्थानिक खेळाडूंना मार्गदर्शन मिळत नाहीत तसेच सुविधांचाही अभावच आहे. क्रीडाक्षेत्रात प्रगती करण्यासाठी सुविधा मिळाल्या तर त्याचा निश्चितच फायदा होईल, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या खेळांसाठी सुविधा हव्यात
क्रीडांगणामध्ये स्वीमिंग पूल (ऑलिम्पिक ५० x २१ मी.), बॅडमिंटन कोर्ट (५ लाकडी कोर्ट ), स्क्वॅश कोर्ट (४ लाकडी कोर्ट), धावण्याचा ट्रॅक (४०० मीटर), रायफल आणि पिस्तूल शूटिंग रेंज (१० मीटर), टेबलटेनिस हॉल (३ टेबल), लॉन टेनिस कोर्ट, जिम्नॅस्टिक्स हॉल, जिम्नॅशियम हॉल, धनुर्विद्या फील्ड, स्केटिंग रिंक, बास्केटबॉल कोर्ट, फुटबॉल मैदान, क्रिकेट मैदान, क्रिकेट नेट (६), बॉक्स क्रिकेट, कबड्डीचे मैदान, लहान मुलांसाठी प्ले ग्रुप आदी अनेक पायाभूत सुविधांचा लाभ देण्यास मदत होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.