‘त्या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्डा
73138
‘त्या’ प्रसिद्ध पर्यटनस्थळी जुगार अड्डा
रुपेश राऊळांचा आरोप ः सुत्रधार शोधा, अन्यथा आमचा हिसका दाखवू
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ ः तालुक्यातील प्रसिद्ध अशा पर्यटनस्थळी पर्यटकांसमोर जुगार चालविण्याचा प्रकार काही परजिल्ह्यातील लोकांकडून सुरू असून या सर्वांमागचा सूत्रधार कोण? असा प्रश्न ठाकरे शिवसेनेचे विधानसभा अध्यक्ष रुपेश राऊळ यांनी आज पत्रकार परिषदेतून केला. पोलिसांनी यावर कारवाई करावी; अन्यथा असे कृत्य करणाऱ्यांना जाग्यावर येऊन आम्ही फटके देऊ असा इशाराही त्यांनी दिला.
श्री. राऊळ यांनी आज येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, विनोद ठाकूर, अशोक धुरी, प्रशांत बुगडे आदी उपस्थित होते. श्री. राऊळ म्हणाले, ‘‘तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या एका ठिकाणी मंगळवारी (ता.२४) असंख्य पर्यटक दाखल झाले होते. त्या पर्यटकांसमोर परप्रांतीय लोकांकडून जुगार खेळला जात होता. या संदर्भात ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कानावर ही बाब घातली. मी या संदर्भात पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांचे लक्ष वेधले. त्यांनी तत्काळ या प्रकारावर कारवाई केली. मात्र, त्या परिसरातील बीट अंमलदार व पोलिसांकडून अशा प्रकारावर कारवाई का होत नाही? हा मुख्य प्रश्न आहे. मी मुद्दामून या पर्यटनस्थळाचे नाव जाहीर करत नाही कारण तालुक्यातील हे स्थळ पर्यटकांच्या नजरेत बदनाम होऊ नये. मात्र, जुगार चालवणाऱ्या लोकांकडून जाणून-बुजून हे स्थळ बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. या पर्यटनस्थळाच्या परिसरात असलेल्या स्टॉल वजा टपरीमध्ये हा प्रकार सुरू असतो. मुख्यत्व परप्रांतीय लोकांकडून ही मस्ती सुरू आहे. या पर्यटनस्थळी जुगार अड्डा चालू असताना तेथील पोलिस नेमके काय करतात? कोणाच्या वरदहस्ताने तो अड्डा मुख्य पर्यटनस्थळी चालू आहे? हा प्रश्न असून हे प्रकार आम्ही सहन करणार नाही. असा प्रकार पुन्हा तिथे घडला तर पहिले फटके लावू, नंतर पोलिस ठाणे गाठू. परजिल्ह्यातील लोक जुगार लावून मस्ती करत असतील तर त्यांना शिवसैनिक सोडणार नाहीत. दुसरीकडे ज्या स्टॉल धारकाच्या जागेत हा प्रकार सुरू आहे त्यांनीही असे प्रकार त्या ठिकाणी होऊ नये याची खबरदारी घ्यावी; अन्यथा उद्या सुक्याबरोबर ओलंही जळणार असून प्रसंगी स्टॉलच्या बाबतीतही आम्हाला आवाज उठवावा लागेल. अवैध धंद्याविरोधात एकीकडे पालकमंत्र्यांनी कारवाईचा इशारा दिला होता, मग त्यांच्या जिल्ह्यात असे प्रकार सुरू असताना नेमके ते गप्प का? पालकमंत्री अशा पोलिसांवर कारवाई करणार का?’’
----------------
महावितरणचा कारभार ढासळतोय
महावितरणचा कारभार दिवसेंदिवस ढासळत आहे. या गंभीर प्रश्नाकडे सरकारचे लक्ष नाही. अधिक्षक अभियंत्यांना आम्ही घेरले तेव्हा ते निरूत्तर होते. कंत्राटी पद्धतीने वायरमन भरले जात आहेत ही चुकीची पद्धत आहे. कंत्राटी काम कधीही चांगल्याप्रकारे होणार नाही. सावंतवाडी शहरात चार-चार तास लाईट जाते हा प्रकार दुर्दैवी आहे. वेंगुर्ले शहरात मे महिन्यात तीन दिवस लाईट नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागात काय परिस्थिती असेल याचा विचार करावा, असे मत श्री. राऊळ यांनी व्यक्त केले.
---------------
भ्रष्टाचारामुळेच ‘सिंधुरत्न’ला स्थगिती
चांदा ते बांदा योजनेनंतर सुरू केलेली सिंधुरत्न योजना शासनाकडून गुंडाळली आहे. फडणवीस सरकारकडून आमदार दीपक केसरकर यांना ही चपराक आहे. जनतेसाठी असलेल्या या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यात श्री. केसरकर अपयशी ठरले आहेत. या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचे लक्षात आल्याने त्याला स्थगिती देत सरकारकडून अहवाल मागविल्याचा आरोप श्री. राऊळ यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

