अजूनही विकसनशील ‘व्यावसायिक स्वास्थ्य’

अजूनही विकसनशील ‘व्यावसायिक स्वास्थ्य’

Published on

लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(२० जून टुडे ४)

बहुतेक सगळ्यांनाच वैद्यकीय शास्त्राविषयी हल्ली चांगल्यापैकी माहिती असते. विशेषतः व्हॉट्सअॅप विद्यापिठामुळे. त्यात आवडते विषय म्हणजे रक्तदाब, हृदयविकार, मेदवृद्धी, मधुमेह, मेंदूचे आजार, स्मृतिभ्रंश, वेगवेगळ्या शस्त्रक्रिया. विशेषतः सांधे बदलणे, डोळ्यातील भिंग बदलणे, काही अवयव बदलणे इत्यादी. याबरोबरच बहुतेकांना आपण जे दैनंदिन जीवनासाठी काम करतो मग ते कार्यालयात असो, कारखान्यात असो, एखाद्या वाहनात असो; पण या नेहमी होणाऱ्या कार्यप्रणालीमुळे किंवा त्यामधील वातावरणामुळे आपणासही काही आजार उद्भवू शकतो. त्याविषयी आपल्याला कोणतीच माहिती नसते आणि या विषयावर काम करणारे वैद्यकीय व्यावसायिक म्हणजेच व्यावसायिक स्वास्थ्य तज्ज्ञ होय..!

- rat२६p१.jpg -
P25N73210
- डॉ. मिलिंद गोखले
---
अजूनही विकसनशील ‘व्यावसायिक स्वास्थ्य’
भारतात अजूनही असे व्यावसायिक पुरेशा प्रमाणात नाहीत किंबहुना त्यांची जेवढी गरज आहे, त्याच्या २५ टक्केच असे अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक भारतात आहेत. ही कमतरता असण्याची कारणे अनेक असली तरीही आज आपल्याला जाणून घ्यावयाचे आहे. ते या विषयाचे महत्त्व, आवाका व्याप्ती, होणारे परिणाम आदींची. रुग्ण म्हणून जेव्हा व्यक्ती एखाद्या डॉक्टरकडे जाते तेव्हा केसपेपर करतानाच त्यात नाव, पत्ता, वय याबरोबरच एक कॉलम असतो की, तुमचा व्यवसाय काय? अर्थातच, त्याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही आणि नेहमीच्या परिस्थितीत डॉक्टरही आजाराप्रमाणे उपचार करून मोकळे होतात. व्यावसायिक स्वास्थ्य तज्ज्ञाचा कामाचा भाग खरा येथूनच सुरू होतो. आपणास सर्वसाधारणपणे असे व्यावसायिक स्वास्थ्य तज्ज्ञ हे कारखान्यामध्ये काम करताना दिसतात. विशेषतः रासायनिक कारखाने किंवा जिथे धोकादायक कार्यप्रणाली वापरल्या जातात तिथेच. कारण, अशा ठिकाणी कायद्याचे बंधन आहे की, व्यावसायिक स्वास्थ्य तज्ज्ञ उपलब्ध असावा.
ढोबळमानाने सांगावयाचे झाले तर एखादा पदार्थ किंवा वस्तू जी आपण दैनंदिन जीवनात वापरतो ती जिथे खूप मोठ्या प्रमाणावर तयार होते. तिथे त्या वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया यामध्ये सतत आठ तास या गोष्टींच्या सान्निध्यात राहिल्यामुळे काम करणाऱ्या कामगारांच्या विविध शारीरिक प्रक्रियांवर बरे- वाईट परिणाम होत असतात आणि त्या परिणामांचा त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो.
हे आजार उद्भवण्यापूर्वीच नियंत्रित केले नाहीत तर सहसा त्यांच्यावर आजार बरा करणारे उपचार केले जाऊ शकत नाहीत आणि म्हणून व्यावसायिक स्वास्थ्यविषयक आजारात रोगप्रतिबंधनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच कारखान्यात काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची काम सुरू करण्यापूर्वीच संपूर्ण वैद्यकीय तपासणी ही अनिवार्य असते. त्यामध्ये काही दोष नसेल किंवा दुरुस्त होण्याजोगा दोष असेल तरच व्यावसायिक स्वास्थ्य तज्ज्ञ त्याला कामासाठी योग्य म्हणून फिटनेस सर्टिफिकेट देतात. त्यानंतरही कायद्यातील तरतुदीनुसार दर तीन-सहा किंवा बारा महिन्यांनी त्या प्रत्येक कामगाराची सविस्तर वैद्यकीय तपासणी रक्त आणि लघवीच्या चाचण्यासह सर्टिफाइड सर्जन असणाऱ्या डॉक्टरकडून केली जाते आणि ते रिपोर्ट्स केवळ कामगाराला आणि फॅक्टरीला दिले जातात. असे नव्हे तर ते फॅक्टरी इन्स्पेक्टर यांनाही कळवले जातात. त्या चाचण्यांमुळे एखादा व्यावसायिक आजार उद्भवणार असेल तर वेळेत समजते आणि त्याच्यावर उपचार करता येतात. म्हणून काम करताना साहजिकच वेगवेगळे धोके आणि वेगवेगळ्या पदार्थांचा होणारा वापर यामुळे आजारांची शक्यता असते.
भौतिक धोके हे तापमान, दाब, कंपने, गोंगाट इत्यादी अनेक प्रकारचे असतात तर रासायनिक पदार्थ हे घन, द्रव किंवा वायू अशा ज्या अवस्थेमध्ये असतील त्यानुसार शरीराच्या विविध भागांवरती दुष्परिणाम करतात. उदाहरणार्थ, अॅसिड्स, अल्कलीज आणि सॉल्वन्ट्स. एक्स-रे, किरणोत्सर्ग, जड धातू हे आणखी आरोग्यास जास्त अपायकारक असणारे घटक होत. अशा पदार्थांचा शरीरामध्ये प्रवेश कसा होतो हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्वचेवाटे, श्वसनावाटे किंवा तोंडावाटे आणि क्वचित प्रसंगी इंजेक्शनद्वारा हे विषारी पदार्थ शरीरामध्ये प्रवेश करतात आणि प्रामुख्याने लिव्हर किडनी यांच्यावरती आघात करतात. काही रसायने मेंदू, मज्जासंस्था, स्नायू, हृदय इत्यादी अवयवांवरतीही दुष्परिणाम करतात. असे होणारे दुष्परिणाम हे एकावेळी खूप जास्त प्रमाणात ते रसायन शरीरात गेल्यामुळे होतात. ज्यामध्ये लक्षणे खूपच तीव्र असतात किंवा एकावेळी खूप कमी; पण असे खूप महिने चालू राहिल्यामुळे अनेक अवयवांवरती सतत दुष्परिणाम होत राहतात. त्याचे जाणवणे हे कालांतराने होते आणि अर्थातच हे अपरिवर्तनीय स्तरावर पोहोचलेले असते. त्यामुळे होणारे शरीराचे नुकसान हे कमालीचे असते आणि न भरून येणारे असते. असे रसायन शरीरात गेल्यानंतर त्याचे पृथक्करणदेखील होते आणि त्यामुळे अशा रसायनाची किंवा त्यापासून तयार झालेल्या दुसऱ्या पदार्थाची पातळी किती आहे हे समजणे फार महत्त्वाचे असते आणि त्यासाठी खूप वेगळ्या प्रकारच्या प्रयोगशाळा आधुनिक उपकरणांसह लागतात आणि त्यामध्येच अशा चाचण्या होऊ शकतात. मगच आपण खात्रीलायकपणे सांगू शकतो की, कामगारांमध्ये झालेले नुकसान किंवा अपाय हा तो वापरत असलेल्या रसायनामुळेच आहे. अशा प्रकारचे झालेले तात्पुरते किंवा स्थायी स्वरूपाचे दुष्परिणाम किंवा अपंगत्व हे कारखानदाराकडून नुकसान भरपाईस पात्र ठरते आणि त्यासाठी सर्टिफाइंग सर्जन आणि वैद्यकीय समिती खरोखर किती प्रमाणात नुकसान झाले आहे किंवा अपंगत्व आले आहे. मग ते अवयवांचे असो किंवा डोळे, कान इत्यादींचे असो...ठरवते...!
माझी पत्नी सुनंदा आणि माझे एक प्रकारे हे भाग्यच की रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्याप्रथम व्यावसायिक स्वास्थ्य तज्ज्ञ आम्ही झालो. विशेषतः लोटे परशुराम औद्योगिक परिसरात विविध कारखान्यात काम करण्याची संधीदेखील मिळाली आणि हा विषय इतर डॉक्टर मंडळीच काय; परंतु गैर वैद्यकीय व्यक्ती आणि समुहांपर्यंत पोहोचवण्याचेसुद्धा थोडेफार काम आम्हाला करता आले. काही कारणांमुळे तातडीची वैद्यकीय मदत लागली तर आजही एका छत्राखाली अशा प्रकारची व्यावसायिक तज्ज्ञाची सेवा रत्नागिरीमध्ये मिळणे तितके सोपे नाही. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे अनास्था आणि अनभिज्ञता. याबाबत आणखी एक गोष्ट नमूद करायला हवी की, अशा प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या जेवढ्या कारखान्यात काम करणाऱ्या व्यक्तीच्या घेतल्या जातात त्याचप्रमाणे या कारखान्याच्या परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांच्याही आरोग्याची निदान वार्षिक तपासणी होत राहिली तर त्यांनाही अशा कुठल्या आजाराने ग्रासले नाहीना, हे लवकर समजेल आणि त्याच्यावर उपचार होऊ शकतील...!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com