दोडामार्ग तालुका वर्धापन दिन विशेष

दोडामार्ग तालुका वर्धापन दिन विशेष

Published on

पुरवणी डोके ः दोडामार्ग तालुका वर्धापन दिन विशेष

swt2611.jpg
73259
दोडामार्ग तालुक्यात असलेले मनमोहक तिलारी धरण
swt2612.jpg
73260
वर्षा पर्यटनाची उधळण करणारा दोडामार्ग तालुक्यातील मांगेली धबधबा.


विकासाची गगनभरारी

लीड
सव्वीशी पार केलेला दोडामार्ग तालुका विस्तीर्ण पंख पसरवत विकासात्मक गगनभरारी घेत आहे. चहूबाजूंनी विविधांगी बदल घडत असून विकासगंगेच्या लाटा वाहताना दिसत आहेत. तालुक्याच्या ठिकाणाहून काही मोजक्याच अंतरावर झालेल्या आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळामुळे तालुक्याच्या प्रगतीला वेग आला आहे. तालुक्यात होऊ घातलेल्या प्रकल्पांना व पर्यटनस्थळांना जलदगती देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली तर गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या त्रिवेणी संगमावर वसलेला दोडामार्ग तालुका सुजलाम्‌ सुफलाम’ होण्याचे स्वप्न आता दृष्टिपथात आले आहे.
- संदेश देसाई
.................
अखंड तालुका असलेल्या सावंतवाडीचे विभाजन करून दोडामार्ग तालुक्याची नवनिर्मिती करण्यात आली. दोडामार्ग तालुक्याचे जन्मदाते तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी २६ जून १९९९ ला दोडामार्ग तालुका घोषित केला आणि सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात वसलेल्या या अतिदुर्गम भागाला नव्या रूपाने ओळख निर्माण झाली. तालुक्याच्या धर्तीवर प्रशासकीय आस्थापने स्थापन झाल्याने दोडामार्ग तालुका विकासाच्या प्रक्रियेत गुंतला. ‘मूल म्हणजे मातीचा गोळा, जसा आकार द्यावा तशी मूर्ती घडते’ या उक्तीप्रमाणे नव्याने जन्म झालेल्या तालुक्याला घडविण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले. दोडामार्गच्या या मातीत अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तिमत्त्वे घडली आणि त्यांच्या दूरदृष्टीतून तालुक्याच्या विकासाची वाट मोकळी झाली.
दोडामार्ग हा महाराष्ट्राच्या कोकण प्रांतातील शेवटचा तालुका असून महत्त्वाच्या दोन राज्यांना जोडण्याची भूमिका त्याने निभावली आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेले गोवा राज्य व कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेले कर्नाटक राज्य यांच्याशी त्याने महाराष्ट्राची मित्रत्वाची नाळ जोडून आपल्या सर्वांगीण विकासाचे ध्येय गाठण्यास चालना दिली. तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बसस्थानक आदी आस्थापने कार्यरत झाली. मुख्यालयातून चार दिशांना गेलेले प्रमुख रस्ते अवजड वाहतुकीसाठी दळणवळणाचे साधन बनले आणि कसई दोडामार्ग व साटेली-भेडशी या दोन्ही बाजारपेठांना वेगळे स्वरूप प्राप्त झाले. कर्नाटक व गोवा अशी होणारी वाहतूक या बाजारपेठांच्या जडणघडणीसाठी पूरक ठरली.
दोडामार्ग तालुक्याची खऱ्या अर्थाने ओळख झाली ती गोवा व महाराष्ट्राच्या संयुक्त धरण प्रकल्पामुळे. गोव्याच्या घशाला कोरड पडल्याने गोवा सरकारने महाराष्ट्र राज्याकडे पाण्याची मागणी केली. यातून तिलारी आंतरराज्य प्रकल्प उदयास आला आणि गोव्याची तहान क्षमली. तिलारीच्या निसर्गरम्य परिसरात आठ गाव विस्थापित करून धरण प्रकल्प उभारण्यात आला. प्रकल्प बाधितांनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलने, उपोषणे अशाप्रकारचे लढे उभारले. त्यावेळी राज्यातील सामाजिक बड्या हस्तीनी प्रकल्प बाधितांचे नेतृत्व केले होते. या लढ्यातून झालेला संघर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. या प्रकल्पामुळे देशाच्या नकाशावर दोडामार्ग तालुका झळकू लागला आणि पर्यटनाला व तालुक्याच्या भौगोलिक विकासाला पूरक चालना मिळाली.
तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर तालुक्यातील कृषी क्षेत्रात बदल घडले. मुबलक पाण्यामुळे विविध फळांची बागायती व शेतीला बहर आला. येथील कृषी क्षेत्रात अजूनही लाक्षणिक बदल होताना दिसत आहेत. आधुनिक भातशेतीबरोबरच केळी, सुपारी, नारळ, काजू याप्रकारे उत्पन्न देणाऱ्या अनेक पिकांच्या बागायती फुलविल्या जात आहेत. काजू पिकाला लोकांनी प्रथमस्थान दिल्याने काजू हे तालुक्याचे मुख्य पीक झाले आहे. जगात सर्वोत्कृष्ट चवीचा काजू म्हणून दोडामार्गच्या काजूची गणना केली जाते. तालुक्यात आता रोजगार देणारे काजू कारखाने उभारले जात आहेत. त्याचबरोबर बोंडावर प्रक्रिया करणारा कारखाना आल्यास त्यातून अजूनही रोजगार निर्मिती होऊ शकते.
......................
संघर्ष आणि आनंदोत्सव
सावंतवाडी तालुक्याचा दक्षिण भाग असलेला दोडामार्ग भौगोलिक दृष्ट्या डोंगराळ व अतिदुर्गम होता. त्यामुळे मूलभूत विकासापासून कोसो दूर होता. रस्ता, वीज आदी सुविधांपासून वंचित असलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी स्वतंत्र तालुका निर्मितीची मागणी करण्यात आली. १९७० च्या दशकात या भागातील समाजसुधारकांनी स्वतंत्र तालुका निर्मितीच्या अनुषंगाने पाठपुरावा सुरू केला. स्वतंत्र तालुक्याची मुहूर्तमेढ रोवली ती श्री. वल्लेकर गुरुजींनी. त्यांच्या या मागणीला सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाला. श्री. वल्लेकर यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून तत्कालीन खासदार मधू दंडवते, माजी मंत्री (कै.) भाई सावंत, माजी आमदार (कै). शिवरामराजे भोसले यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा चालू ठेवला. त्यांच्या पश्चात दोडामार्गचे माजी सरपंच (कै.) ज्ञानेश्वर गांवकर यांनी प्रतिनिधित्व करत तालुका निर्माण संघर्ष समितीची स्थापना करून पूर्ण ताकदीनिशी लढा चालू ठेवला. लोकशाही हक्काचा वापर करून तालुका निर्मितीची मागणी आक्रमक पद्धतीने शासन दरबारी मांडली. या मागणीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली १९९५ नंतर. त्यावेळी राज्यात प्रथमच सत्तांतर होऊन सेना-भाजप युतीचे शासन सत्तेवर आले. त्या शासनात प्रथमच मंत्री बनलेले जिल्ह्याचे सुपुत्र नारायण राणे यांनी दोडामार्ग तालुका निर्मितीसाठी सकारात्मक प्रयत्न सुरू केले. श्री. राणे यांच्याकडे राज्याचे महसूलमंत्री पद होते. त्याच पदाचा वापर करत त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विशेष प्रयत्न करून स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याची मंजुरी मिळविली. सुदैवाने ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्या निमित्ताने त्यांचा दोडामार्ग येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
२७ जून १९९९ ला पार पडलेल्या त्या कार्यक्रमात तालुकावासियांसाठी विशेष भेट म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वतंत्र दोडामार्ग तालुक्याची निर्मिती घोषणा केली. या घोषणेने तालुकावासियांचा आनंद द्विगुणित झाला.

चौकट
लक्षवेधी नैसर्गिक, धार्मिक स्थळे
दोडामार्ग तालुका डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसल्याने निसर्गाची मुक्त हस्ते उधळण होत आहे. येथे नैसर्गिक व धार्मिक पर्यटनस्थळे दृष्टिक्षेपात आल्याने तालुक्याचे पर्यटन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. तिलारी धरण व तेथील डोळे दिपवून टाकणारे निसर्गसौंदर्य, राज्यातील सर्वात छोटा विद्युत प्रकल्प असलेला मेढे उन्नैयी बंधारा, मांगेली धबधबा, पांडवकालीन नागनाथ तीर्थक्षेत्र, भक्तीसागरात लोटणारा कसईनाथ डोंगर, इतिहासाची साक्ष देणारा हनुमंतगड आणि दैवत्वाची अनुभूती करून देणारी धार्मिक स्थळे हे दोडामार्ग तालुक्याने परिधान केलेले भरझरी वस्त्रालंकार भूषण आहेत. या पर्यटन स्थळांमुळे तालुक्याच्या मुखकमलावर सौंदर्याचे स्मित हास्य झळकत आहे. हे स्मित हास्य टिकून ठेवण्यासाठी पर्यटन स्थळांचे सौंदर्य अबाधित ठेवण्याचे कार्य प्रामुख्याने झाले पाहिजे. यासाठी सामाजिक व राजकीय व्यक्तींनी जबाबदारीने काम करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

चौकट
आरोग्य व्यवस्था सुधारतेय
ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा कारभार असलेल्या दोडामार्ग तालुक्याच्या आरोग्य यंत्रणेत सुधारणा व्हावी, यासाठी लोकांच्या मागणीवरून येथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. तत्कालीन मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी तालुका ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून देत भव्य इमारतीसाठी भरघोस निधी मंजूर करून दिला. या भव्य इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच संपूर्ण सोयी-सुविधांयुक्त असे सुसज्ज रुग्णालय तालुकावासियांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहे. काही कालावधीतच सक्षम आरोग्य यंत्रणा उभी राहणार असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
..........................
चौकट
रोजगार देणाऱ्या उद्योगांची प्रतीक्षा
स्वतंत्र दोडामार्ग तालुका निर्मिती होऊन २६ वर्षे लोटली तरी रोजगाराभिमुख उद्योग व्यवसायाची उणीव कायम आहे. तालुक्यातील हजारो युवक-युवती कामासाठी गोवा, मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी ठिकाणी धाव घेत आहेत. आडाळी येथे सातशे एकर जागेत होऊ घातलेल्या एमआयडीसीत अद्याप एकही कारखाना प्रस्थापित झाला नाही. काही राजकीय नेत्यांनी या ठिकाणी मोठमोठे उद्योग व्यवसाय आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले; परंतु त्याला हवेतसे यश मिळाले नाही. काही उद्योजकांनी एमआयडीसी जागेत येऊन सर्व्हे देखील केले, भूखंड वाटप करण्यात आले; मात्र उद्योगाची पायाभरणी अद्याप झालेली नाही. येथील पायाभूत सुविधांची पूर्तता झाली असून आता उद्योग उभारण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मंजुरीत असलेला राष्ट्रीय वनौषधी प्रकल्पासाठी ५० एकरचा भूखंड एमआयडीसीने जिल्हाधिकाऱ्यांकडे हस्तांतरित केला आहे; पण त्यासाठी अद्याप कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. अशा प्रकारे अन्य प्रकल्प येथे उदयास आल्यास स्थानिक तरुणांचा रोजगाराचा प्रश्न कायमचा सुटेल आणि तालुक्याचे अर्थशास्त्र उच्चांक गाठेल, यात शंका नाही. तालुक्यात माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व अन्य कौशल्य शिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत. या भूमीतील उच्चबुद्यांक असलेले विद्यार्थी विविध क्षेत्रात अग्रस्थानी राहून प्रतिनिधित्व करीत आहेत.

चौकट
लोकप्रतिनिधींकडून मोलाचे प्रयत्न
नगरपंचायत स्थापनेनंतर दोडामार्ग शहराच्या मुखवट्यात अनेक बदल होत गेले. नगर विकासासाठी नगरपंचायतीला मिळणाऱ्या पूरक निधीमुळे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या लोप पावल्या. बाजारपेठ विस्तीर्ण झाल्याने व्यापारी शहर म्हणून झपाट्याने विकसित होत आहे. त्याचप्रमाणे या नगराचा नव्याने प्रारूप आराखडा नियोजित झाल्याने याहीपुढे नगराची रचना देखील विस्तीर्ण होणार असून अकल्पित बदल घडताना दिसणार आहेत. येथील स्थानिक लोकप्रतिनिधी ‘सुंदरनगर’ म्हणून नावलौकिक मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. 

चौकट
जमिनी अबाधित ठेवणे गरजेचे
पर्यटनदृष्ट्या सक्षम बनलेल्या दोडामार्ग तालुक्यात दिल्ली लॉबीचे जाळे पसरत आहे. मोपा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे दोडामार्ग तालुक्यातील जमिनीच़ा आवक वाढला आहे. स्वस्त दरात मिळणाऱ्या जमिनीत दिल्ली लॉबी आपले पाय घट्ट रोवताना दिसत आहे. याचे दुष्परिणाम भविष्यात येथील स्थानिक मूळ जमीनमालकांना भोगावे लागतील. ज्या जमिनी आपण कवडीमोल दराने विकत आहोत, त्याच जमिनीत आपल्यालाच दीन-दुबळ्यासारखे राबण्याची परिस्थिती ओढवणार, यात शंका नाही. त्यामुळे भविष्याचे चित्र पाहिल्यास स्थानिकांनी आपल्या जमिनी परप्रांतीयांच्या घशात न घालता त्या अबाधित ठेवणे अत्यावश्‍यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com