दळवी, पिंगेंच्या साहित्य सेवेचा आढावा
swt11.jpg
74383
मांद्रे गोवाः ‘साहित्य संगम’ आणि ‘साहित्य प्रेरणा कट्टा’ आयोजित कार्यक्रमात बोलताना विनय सौदागर.
दळवी, पिंगेंच्या साहित्य सेवेचा आढावा
विविध पुस्तकांवर विवेचनः मांद्रे-गोव्यातील कार्यक्रमास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा छपन्नावा तर मांद्रे येथील ‘साहित्य संगम’चा चारशे एकविसावा मासिक कार्यक्रम मधलावाडा, पालये (पेडणे-गोवा) येथे मंडळाचे सदस्य महेंद्र व प्रगती परब यांच्या निवासस्थानी झाला.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध साहित्यिक (कै.) जयवंत दळवी यांचे पुतणे सचिन दळवी, भाचे राजेश नाईक, साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत साहित्यिक विनय सौदागर, कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्य सरोज रेडकर, ‘साहित्य संगम’च्या माजी अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध साहित्यिक पौर्णिमा केरकर, सुभाष शेटगावकर, कार्यवाह गजानन मांद्रेकर आदी उपस्थित होते.
विनय सौदागर यांनी आपल्या भाषणात (कै.) जयवंत दळवी यांच्या समग्र साहित्याचा आढावा घेत त्यांच्या लेखनातील वैशिष्ट्ये अधोरेखित केली. दळवी यांनी गंभीर आणि मिश्किल अशा दोन्ही प्रकाराचे लिखाण केले असले तरी, त्यांनी आपल्या नाटकांमधून समर्थपणे मांडलेल्या ज्येष्ठांच्या आणि मानसिक रुग्णांच्या व्यथा प्रेक्षकांचे प्रबोधन करणाऱ्या असल्याचे सांगितले.
सचिन दळवी आणि राजेश नाईक यांनी ‘कौटुंबिक जयवंत दळवी’ या विषयावर बोलताना दळवी हे कुटुंबामध्ये किंवा आप्तेष्टांमध्ये वावरताना कधीच साहित्यिक म्हणून वावरले नाहीत. घराबाहेर सुद्धा साहित्यिक म्हणून त्यांनी कधीच मिरवले नाही, असे सांगून या संदर्भातल्या काही घटना कथन केल्या. ‘साहित्य संगम’चे कार्यवाह गजानन मांद्रेकर यांनी (कै.) रवींद्र पिंगे यांचे ‘चरित्र आणि साहित्य’ या विषयावर बोलताना त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगून त्यांची शब्दकळा, त्यांनी तयार केलेले नवीन अर्थवाही शब्द, त्यांची मजेशीर वाक्ये, त्यांच्या पुस्तकांची आणि लेखांची शीर्षके या संदर्भात विवेचन करून ‘मासळी भात आणि सोलकढी’ या गाजलेल्या लेखातील निवडक भागाचे वाचन केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मराठी विषयातील एम. ए. ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल ‘साहित्य संगम’ची सदस्य मानसी मांद्रेकर हिचे केरकर यांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. केरकर यांनी समारोपाच्या भाषणात ‘साहित्य संगम’च्या पस्तीस वर्षांच्या अखंडित साहित्य सेवेचा तसेच आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा गौरव करून वाचन संस्कृती वाढीस लावण्याच्या आणि नवीन लेखकांना घडविण्याच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
मंडळाचे अध्यक्ष सुभाष शेटगावकर यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचा परिचय केला. विनय सौदागर यांनी साहित्य प्रेरणा कट्ट्याविषयी माहिती देऊन कट्टयाच्या सदस्यांचा परिचय केला. ‘साहित्य संगम’च्या सदस्यांचा परिचय विष्णुबुवा शेटगावकर यांनी केला. प्रगती परब यांनी आभार मानले. सोनाली परब यांनी सुत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.