-संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयासमोरील मोरीला तडे
-rat२p१६.jpg -
२५N७४७२४
संगमेश्वर ः ग्रामीण रुग्णालयासमोर महामार्गाच्या मोरीला गेलेले तडे.
----
संगमेश्वर रुग्णालयासमोरील मोरीला तडे
रस्त्याला धोका ; चौकशीची मागणी
संगमेश्वर, ता. २ ः संगमेश्वरमध्ये सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात ठेकेदाराकडून होत असलेल्या निकृष्ट कामाचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ग्रामीण रुग्णालयासमोर छोट्या मोरीसाठी जे मजबुतीकरण करण्यात आले आहे त्या स्लॅबलाच तडे गेले आहेत.
सध्या या तड्यांमधून पावसाचे पाणी झिरपत असून, त्यामुळे भिंत अधिकच कमजोर होत आहे. ही रचना कोसळल्यास त्या लगतचा महामार्ग रस्ता जो आधीच नादुरुस्त असून, तात्पुरत्या डागडुजीवर तग धरून आहे. तो आता पुन्हा खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही.
कुरधुंडा, आरवली आणि शास्त्रीपूल परिसरातही अशा प्रकारचे तडे जाण्याची, रस्ता खचण्याची आणि भिंती ढासळण्याची मालिका सुरूच आहे. विशेष म्हणजे या सर्व घटना मॉन्सूनच्या पहिल्याच सरींमध्ये उघड झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, ठेकेदार आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
ठेकेदार फक्त वरवरची मलमपट्टी करून जबाबदारी झटकतो आहे. तडे गेलेल्या ठिकाणी सिमेंटचं लेपन करून फोटो काढले जातात; पण अंतर्गत दोष दडवले जात आहेत. या प्रकारांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाईची मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळांची पाहणी करून बांधकामाची सखोल तपासणी करावी आणि संभाव्य धोका ओळखून तांत्रिक समितीमार्फत उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.