उड्डाणपुलाखालीच वाहनांचे तळ
-rat२p३६.jpg-
P२५N७४७८९
राजापूर ः महामार्गावरील उड्डाणपुलाखाली उभी असलेली वाहने.
---
उड्डाणपुलाखालीच वाहनांचे तळ
पर्यायी मार्गावर अडचण ; प्रशासनाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २ : मुंबई-गोवा महामार्गावरील उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाखालून आजूबाजूच्या गावांसाठी काढण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि काही ठिकाणचे बोगदे हे गेले काही महिने वाहनांसाठी पार्किंग झोन बनले आहेत. बऱ्याचवेळा तेथे प्रदीर्घकाळ उभ्या असलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे तेथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळे ठरत असून, त्यातून अपघातांचा धोका वाढत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील येरडव फाटा, ओणी बाजारपेठ, राजापूर पेट्रोलपंप परिसर, हातिवले आदी ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्याखालून आजूबाजूच्या गावांकडे दैनंदिन रहदारीसाठी कायमस्वरूपी मार्ग काढण्यात आले आहेत; मात्र त्या पुलांखाली बऱ्याचवेळा अनेक वाहने पार्क केली जात असून, त्यामुळे वाहनांची मोठी गर्दी तेथे पाहायला मिळते. यामध्ये ओणीमधील पाचल, येरडव फाट्यावर डंपर, ट्र्क यांसह सर्व प्रकारची वाहने प्रदीर्घ काळ पार्क केलेली असतात. वाहनांच्या दुरुस्तीचा व्यवसायदेखील येथे सुरू करण्यात आला आहे. बऱ्याचवेळा तर काही मोठी वाहने तर एका रेषेत उभी असतात. त्यामुळे महामार्गावरून किंवा आजूबाजूच्या परिसरातून आलेल्या वाहनांना अडथळा होत आहे. अशीच स्थिती राजापूर पेट्रोलपंपाजवळच्या उड्डाणपुलाखाली पाहावयास मिळते. या ठिकाणीही प्रदीर्घ काळ वाहने उभी असतात. केवळ उड्डाणपूलच नव्हे तर पादचाऱ्यांसाठी काढण्यात आलेल्या बोगद्यांचा वापर दुचाकी गाड्या पार्किंगसाठी केला जात आहे. त्यामुळे तेथून वाट काढत जाताना पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. या विरोधात कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.