१५ दिवसानंतर चिपळूण-कराड वाहतूक सुरू
-rat२p३७.jpg-
२५N७४७९०
चिपळूण ः चिपळूण-कऱ्हाड मार्गावरील घाटरस्ता बंद असल्यामुळे पाटणमध्ये उभे केलेले अवजड वाहतुकीचे ट्रक आणि टँकर वाहतूक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने सोडले जात आहेत.
----
चिपळूण-कऱ्हाड वाहतूक अखेर सुरू
एसटी, खासगी वाहतुकीस फटका; मार्ग धोकादायकच
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २ ः कुंभार्ली घाटातून चिपळूण-कऱ्हाडमार्गे आजपासून एसटीची वाहतूक सुरू झाली. तब्बल पंधरा दिवसानंतर हा मार्ग सुरू झाल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे; मात्र पाटण तालुक्यातील रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. वाजेगाव व शिरळदरम्यान तयार केलेला मातीचा रस्ता अतिवृष्टीत वाहून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे हा मार्ग अजूनही धोकादायकच मानला जात आहे.
गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६च्या रूंदीकरणाचे काम सुरू असताना पाटण तालुक्यात वाजेगाव व शिरळ या ठिकाणी अतिवृष्टीने १६ जूनला पर्यायी मार्ग वाहून गेला. त्यामुळे मुख्य रस्त्यावर तात्पुरती दुरुस्ती करून हा रस्ता २७ जूनपासून हलक्या वाहनांना खुला करण्यात आला; मात्र, पावसाचे वाढलेले प्रमाण व साचत असलेल्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने येथून जड वाहने सोडण्यात येत नव्हती. या रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी २७ जूनपर्यंत कालावधी लागणार असल्याने हा रस्ता २७ जून रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते; मात्र पूर्णक्षमतेने वाहतूक सुरू करण्यासाठी बांधकाम विभागाला १ जुलैपर्यंतचा कालावधी घ्यावा लागला. वाहनचालक आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावरील हलक्या वाहनांची वाहतूक २७ जूनपासून सुरू करण्यात आली होती. तसेच चिपळूण आगारातील एसटीची वाहतूक केवळ कोयनेपर्यंत सुरू होती तर काही फेऱ्या साखरपामार्गे सोडल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांना जास्त भुर्दंड सहन करावा लागत होता. १ जुलैला सायंकाळी वाजेगाव व शिरळ येथील मार्गावरून अवजड वाहतूक सुरू करून चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर २ जुलैपासून एसटीसह इतर खासगी वाहने सुरळीत सुरू करण्यात आली आहेत.
मागील पंधरा दिवस पुणे मार्गावरील खासगी प्रवासी वाहतूक थांबली होती. पुणे, मिरजसह पश्चिम महाराष्ट्रात औषधोपचारासाठी जाणारे प्रवासी हलकी वाहने भाड्याने घेऊन तर कधी स्वतःचे वाहन घेऊन जात होते. १ जुलैला रात्री चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने लागली होती. कुंभार्ली घाटातून वाहतूक सुरू झाल्याचे प्रवाशांना माहिती नव्हते; मात्र आज पहाटेपासून खासगी वाहतुकीला प्रतिसाद मिळू लागला आहे तसेच या मार्गावरील हलक्या वाहनांची संख्याही वाढली.
---
चिपळूण-बेळगाव एसटी धावली
आज सकाळी चिपळूण आगारातून चिपळूण-बेळगाव ही पहिली एसटी धावली. त्यानंतर सर्व फेऱ्या सुरू झाल्या. चिपळूण-पाटण-कऱ्हाड मार्ग सुरू झाल्याचे समजल्यानंतर आज सकाळपासून या मार्गावरील अवजड वाहतूकही सुरू झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून या मार्गे होणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूकही सुरू झाली आहे.
कोट
चिपळूण आगारातून पश्चिम महाराष्ट्रात एसटीच्या ३४ फेऱ्या धावतात. त्यातून एका दिवसात एसटीचा सुमारे चार लाखांचा व्यवसाय होता. मागील पंधरा दिवस हा मार्ग बंद होता. त्यामुळे एसटीचा अंदाजे ६० लाखांचा व्यवसाय बुडाला आहे. तो भरून काढण्यासाठी एसटीला कसरत करावी लागणार आहे. आजपासून एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू झाल्या आहेत. चिपळूण आगारात नव्या बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे चांगली सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न करू.
--दीपक चव्हाण, आगारप्रमुख, चिपळूण