नाटेतील नुकसानग्रस्तांना व्यापारी मंडळाची मदत
-rat२p२७.jpg -
२५N७४७६९
राजापूर ः नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत देताना नाटे व्यापारी मंडळाचे पदाधिकारी.
---
नाटेतील नुकसानग्रस्तांना व्यापारी मंडळाची मदत
आगीच्या दुर्घटनेत हानी ; सामाजिक बांधिलकीचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ : चार दिवसांपूर्वी नाटे बाजारपेठेमध्ये झालेल्या आगीच्या दुर्घटनेमध्ये नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना नाटे व्यापारी मंडळाच्या वतीने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. व्यापारी मंडळाने जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे आगीच्या दुर्घटनेमध्ये लाखो रुपयांच्या नुकसानीच्या बसलेल्या झळांवर एकप्रकारे मायेची फुंकर मारली गेली आहे.
चार दिवसांपूर्वी तालुक्यातील नाटे बाजारपेठेतील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. त्यामध्ये आग लागलेल्या इमारतीसह त्या इमारतीमध्ये व्यवसाय सुरू असलेल्या सात व्यापाऱ्यांचे सुमारे २६ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. आगीच्या दुर्घटनेमुळे त्या व्यापाऱ्यांना चांगल्या झळा पोहचल्या होत्या. याची दखल घेत नाटे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष रमेश लांजेकर यांच्या नेतृत्वाखालील व्यापारी मंडळाने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचसोबत अनेकांना मदत करण्याचे आवाहनही केले होते. या आवाहनाला प्रतिसाद मिळताना व्यापाऱ्यांसह समाजातील अनेक दात्यांना आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जोपासली. त्याच्यातून, संकलित झालेला मदत निधी व्यापारी मंडळाचे अध्यक्ष लांजेकर आणि सहकारी पदाधिकारी, व्यापारी यांनी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांकडे सुपूर्द केला. यामध्ये नारायण गोसावी यांना १ लाख रुपये, प्रसाद पाखरे यांना ५५ हजार रुपये, प्रदीप मयेकर यांना २० हजार रुपये, भीम खंडी यांना १० हजार रुपये आणि दिगंबर गिजम यांना ५ हजार रुपये या मदतीचा समावेश आहे.