पद्मविभूषण बाळासाहेब खेर यांचे स्मारक करण्याची मागणी

पद्मविभूषण बाळासाहेब खेर यांचे स्मारक करण्याची मागणी

Published on

-rat३p३.jpg-
२५N७४९५२
कै. बाळासाहेब खेर
----
बाळासाहेब खेर यांचे स्मारक उभारा
स्मारक समिती; मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : रत्नागिरीचे सुपुत्र आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री, पहिल्या पद्मविभूषण पुरस्काराचे मानकरी (कै.) बाळासाहेब खेर यांनी केलेले विविध क्षेत्रातील अफाट कार्य पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आदर्शवत ठरणारे आहे. त्यांचे कार्य व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणारे व समृद्ध करणारे असे आहे. ते रत्नागिरीचे रत्न होते; परंतु आजपर्यंत रत्नागिरीमध्ये त्यांचे यथोचित स्मारक आजही उभे राहिलेले नाही. हे स्मारक उभे व्हावे, अशी मागणी स्मारक समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन राज्याचे उद्योग, मराठी भाषामंत्री उदय सामंत यांच्याकडे नुकतेच देण्यात आले.
पालकमंत्र्यांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेऊ, असे आश्वस्त केले आहे. ब्रिटिशकालीन बॉम्बे प्रांताचे (ज्यामध्ये महाराष्ट्र व गुजरात यांचा समावेश होता.) ते १९३७ ते १९३९ असे दोन वर्षे पहिले (पंतप्रधान) मुख्यमंत्री होते. याच काळात बाळासाहेब खेर शिक्षणमंत्री होते. बाळासाहेबांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. महात्मा गांधीजींचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहाच्या सविनय कायदेभंगाच्या मोहिमेतील सहभागामुळे त्यांना १३ महिन्यांचा कारावास झाला. १९४२च्या चलेजाव आंदोलनात सहभाग असल्याने त्यांना दोन वर्षे सश्रम कारावासही भोगावा लागला.
त्यांनी शालेय शिक्षणात शारीरिक शिक्षण विषय सक्तीचा केला. भारतातील एकमेव महिला विद्यापीठाला (एसएनडीटी) कायदेशीर शासकीय मान्यता दिली तसेच ते स्वातंत्र्यापूर्वी मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री व स्वातंत्र्यानंतरही पाच वर्षे पहिले मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री व गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष होते. स्मारक समितीमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ, कोषाध्यक्ष सुरेश पावसकर, माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये, माजी आमदार बाळ माने, श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्टचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गीते व ट्रस्टचे अध्यक्ष संदीप ढवळ, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, अॅड. राजशेखर मलुष्टे, सतीश कामत, मकरंद पटवर्धन यांचा समावेश आहे.

प्रशासकीय इमारतीला नाव द्यावे
बाळासाहेब खेर यांनी कोकणचे गांधी (कै.) अप्पासाहेब पटवर्धन यांच्या सल्ल्यानुसार, रत्नागिरीतील आपल्या मालमत्तेचा आपल्या आईच्या नावे ट्रस्ट करून त्यामार्फत सर्वोदय छात्रालयाची स्थापना केली. सामाजिक, शैक्षणिक कार्यात एकही ठपका नसलेले खेर सर्वांना आदर्शवत आहेत. त्यांच्या या कार्याची स्मृती राहण्यासाठी रत्नागिरीत सध्या बांधकाम सुरू असलेल्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव द्यावे व पूर्णाकृती पुतळा त्याच आवारात उभारून कायमस्वरूपी स्मारक उभे करावे, अशी सूचनाही या निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com