विजयदुर्ग खाडीवर पूल बांधून दोन जिल्हे जोडा
‘विजयदुर्ग’वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा
कुंभवडे, मुटाट मंडळाची मागणी; मंत्री, आमदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ : तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी या दोन गावांमधून जाणाऱ्या विजयदुर्ग खाडीवर पूल बांधून दोन जिल्हे राज्य महामार्गाने जोडावेत, अशी मागणी अखिल कुंभवडे ग्रामविकास मंडळाने आमदार किरण सामंत यांच्याकडे तर मुटाट पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाने सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.
राजापूर तालुक्यातील कुंभवडे आणि देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी या दोन गावांमधील विजयदुर्ग खाडीवर ५०० फूट लांबीचा पूल बांधण्याची मागणी निवेदनांद्वारे करण्यात आली आहे तसेच हा राज्यरस्ता झाल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनपूरक असा मध्यवर्ती मार्ग सुरळीत केल्यास पर्यटनपूरक गावे एकमेकांशी जोडली गेल्याने कोकणभूमीला कॅलिफोर्निया बनवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या कार्याला चालना मिळेल, अशी मागणी केली आहे. या प्रस्तावित मार्गामुळे राजापूर तालुक्यातील कुंभवडे, तारळ, उपळे, प्रिंदावन, धुमाळवाडी, कार्शिगे, पडवे, सौंदळ, डोंगर, नाणार, घोडेपोई, सागवे, इंगळवाडी, चौके, धनगरवाडी, विलये, राजापूर, जैतापूर, अणसुरे, हातिवले ही गावे तर देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी, मुटाट, मणचे, वाघोटन, सडेवाघोटन, सौंदाळे, बापर्डे, पेंढरी, मालपे, पोंभुर्ले, पाटगाव, गोवळ व फणसगाव अशी गावे जोडली जातील. पर्यायाने परिसरातील अनेक शैक्षणिक संस्था व विकासाधीन प्रकल्प एकमेकांशी जोडले जातील. त्याचवेळी या मार्गामुळे पर्यटनदृष्ट्या तारकर्ली, देवबाग, धामापूर, किल्ले सिंधुदुर्ग, किल्ले देवगड, किल्ले विजयदूर्ग, श्री कुणकेश्वर आदी पर्यटनस्थळे आणि या परिसरातील प्रसिद्ध देवस्थाने पर्यटकांना पाहता येथील. या पुलाला जोडणारे जोडरस्ते सुस्थितीत असल्याने शासनाला केवळ पूल उभारणीचा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे व्यापक जनहित लक्षात घेऊन या प्रस्तावाला त्वरित मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
----
विकासाला चालना
प्रस्तावित पुलासह रस्ता झाल्यास राजापूर, देवगड, कणकवली, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांच्या विकासालाही चालना मिळणार आहे. प्रस्तावित पूल मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण आणि सागरी मार्गावरील आंबेरी या विजयदुर्ग खाडीवरील दोन पुलांच्या मध्यवर्ती भागात असल्याने कोकणातील सर्व उपक्रमांना त्याचा फायदा होईल, असे ग्रामस्थांचे मत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.