‘सैनिक नागरी’तर्फे
वृक्षारोपण संकल्प

‘सैनिक नागरी’तर्फे वृक्षारोपण संकल्प

Published on

कट्टा येथे उद्या
कवी संमेलन
सिंधुदुर्गनगरी ः महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गतर्फे जिल्हास्तरीय मराठी कवी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. कट्टा (ता. मालवण) येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय (मामा माडये हॉल) येथे रविवारी (ता.६) दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत हे संमेलन होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, कवी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य विठ्ठल कदम यांचे हस्ते उद्‍घाटन होईल. संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री श्रीमती संध्या तांबे असतील. संमेलनाचे प्रमुख अतिथी लेखक, कवी, रंगकर्मी व रंगभूमी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य विजय चव्हाण असणार आहेत. निमंत्रित कवी म्हणून मधुकर मातोंडकर, श्रीमती सरिता पवार-चव्हाण, मनोहर सरमळकर, अमर पवार, प्रगती पाताडे, दिलीप चव्हाण, सतीश चव्हाण उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे संयोजक जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे असून संयोजन समितीत जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, साहित्य व सांस्कृतिक समिती प्रमुख सुरेश पवार, कणकवली तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, पी. बी. चव्हाण, उदय शिरोडकर, सुहास मोचेमाडकर यांचा समावेश आहे.
-----
‘सैनिक नागरी’तर्फे
वृक्षारोपण संकल्प
सावंतवाडी ः सहकार मंत्रालय भारत सरकारचा स्थापना दिवस हा ३० जुन २०२५ ते ०६ जुलै २०२५ पर्यंत सहकार सप्ताह म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील अग्रणी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे पूर्ण जिल्हाभरात वृक्ष लागवड कार्यक्रम घेण्यात येणार आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातील वनसंपदा हीच खऱ्या अर्थाने जिल्ह्याची धनसंपदा आहे. निसर्गाची निगा राखुन त्याला अबाधित राखणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे. याच सामाजिक बांधीलकीतून व सहकार सप्ताह याचा दुहेरी संगम साधून संस्थेमार्फत आपल्या जिल्ह्याभरात ज्या-ज्या ठिकाणी शाखा आहेत, त्या शाखांच्या जवळच्या शाळांच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. त्यासाठी शाखेच्या नजिकचे मुख्य बोर्डाचे संचालक, शाखेचे शाखाध्यक्ष, शाखा संचालक व कर्मचारी उपस्थित राहून वृक्षारोपण करतील, अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर व मुख्यकार्यकारी अधिकारी सुनिल राऊळ यांनी दिली.
-----
ईआर-१ विवरणपत्रासाठी
३१ जुलैपर्यंत आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाचे मनुष्यबळाचे जून २०२५ ला संपलेल्या तिमाहीचे ईआर-१ हे विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत ऑनलाईन भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भै. गो. येरमे यांनी केले आहे. सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा १९५९ अन्वये कलम ५ मधील तरतुदीनुसार शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ईआर-१ विवरणपत्र प्रत्येक तिमाही संपल्यावर ३० दिवसांच्या आत सादर करणे आस्थापनेस बंधनकारक आहे. जून २०२५ ला संपलेल्या तिमाहीचे विवरणपत्र, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन भरावे. ज्या उद्योजक, आस्थापनांना ऑनलाईनद्वारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
--------------
उत्कृष्ट लघु उद्योजकांना
पुरस्कारासाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतुने जिल्हास्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना १९८५ पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत २०२४ च्या पुरस्कारांसाठी पात्र सुक्ष्म व लघु उद्योजकांनी ३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, अधिकाधिक अर्ज प्राप्त होऊन जास्तीत जास्त उद्योजकांना या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचीसंधी प्राप्त व्हावी, याकरिता आता अर्ज सादर करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. या योजने अंतर्गत प्रथम पुरस्कार विजेत्यास रोख १५ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय १० हजार व सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन समारंभपूर्वक गौरविण्यात येते. अटी अशा ः अर्जदार या जिल्ह्यातील १ जानेवारी २०२१ किंवा त्यापुर्वीचा स्थायी लघु उद्योग नोंदणीकृत, पार्ट-२ ज्ञापन स्वीकृतीधारक घटक असावा. मागील दोन वर्षे सलग उत्पादनात असावा. कोणत्याही बँकेचा अथवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अर्जदार घटक यापूर्वी राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय अथवा जिल्हा पुरस्कार मिळालेला नसावा. निर्याताभिमुख घटक, महिला उद्योजक, मागासवर्गीय उद्योजक यांना प्राधान्य.
--------------
पाळणेकोंड धरण
‘ओव्हरफ्लो’
सावंतवाडी ः शहराला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी येथील पाळणेकोंड धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. यावर्षी दोन जुलैलाच हे धरण तुडुंब भरले असून याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. पालिकेच्या मालकीचे असलेले पाळणेकोंड धरण हे सावंतवाडी शहरासाठी वरदान आहे. दरवर्षी मेच्या अखेरपर्यंत या धरणामध्ये पाणीसाठा शिल्लक राहतो. एकूणच शहरातील नागरिकांची तहान या धरणावरच भागवली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com