प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आरोप
swt421.jpg
75326
दोडामार्ग ः गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना निवेदन देताना कोलझर सरपंच सुजल गवस, सोबत गणेशप्रसाद गवस व अन्य. (छायाचित्र ः संदेश देसाई)
प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे आरोप
कोलझर सरपंच सुजल गवसः संबंधितांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. ४ः ग्रामपंचायत कारभारात मनमानी कारभार अथवा भ्रष्टाचारासारखा कोणताही प्रकार केलेला नाही. मला बदनाम करण्यासाठी उपसरपंच व काही सदस्य माझ्यावर नाहक आरोप करीत आहेत. खोटी माहिती पुढे करून सरपंच म्हणून माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कोलझर सरपंच सुजल गवस यांनी आज गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत यांना दिले.
कोलझर ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच गवस यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा गैरवापर करत बेकायदेशीररीत्या दाखला देणे, नळपाणी योजनेचे साहित्य भंगारात विक्री करून आर्थिक गैरव्यवहार करणे, ग्रामपंचायतमध्ये शिपाई भरती बेकायदेशीर करणे आदी आरोप करत त्यांना अपात्र करण्यात यावे, या मागणीसाठी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर कोलझर उपसरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी उपोषण केले होते.
याप्रकरणी सरपंच गवस व अनेक ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर करत सर्व आरोप खोडून काढले आहेत. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, तालुका संघटक गोपाळ गावस, तिलकांचन गवस, रत्नकांत कर्पे, सूर्यकांत गवस, बबलू पांगम, विलास सावंत, प्रिया देसाई, उर्मिला देसाई, यशवंत शिरवलकर, बाबाजी नांगरे, जयवंत देसाई, विशाखा गवस, आकांक्षा गवस, अंकिता गवस उपस्थित होते.
ग्रामपंचायत कर्मचारी पद भरतीबाबत ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ६१ नुसार दिलेल्या अधिकारानुसार व कर्मचारी सेवेच्या अटीशर्ती, नियम १९६० मधील तरतुदीचे पालन करण्यात येऊन तब्बल चार मासिक सभेत बहुमताने चर्चा करून व छाननीत पात्र ठरल्याने श्रद्धा उल्हास देसाई यांची मासिक सभेत शिपाई म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि, चार विरुद्ध तीन अशा मताने नियुक्ती आदेश देण्यात आलेला असून बहुमताने झालेला ठराव उपसरपंच, सदस्य यांना मान्य नसेल तर त्यांची कृती ग्रामपंचायत कायद्याच्या विरुद्ध असून त्यांच्यावर कलम ३९ च्या उपक्रम १ अंतर्गत अपात्रतेची कार्यवाही प्रास्ताविक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी सरपंच, ग्रामस्थ व उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.
चौकट
‘तो’ दाखला वस्तुस्थितीला धरूनच
सरपंच म्हणून मी एका व्यक्तीला एका क्षेत्रामध्ये कोणत्याही स्वरुपाची इमारत नसल्याबाबत दाखला दिला असून गावचे प्रथम नागरिक म्हणून वस्तूस्थितीची पहाणी करुन दाखला देण्यात आलेला आहे. आणि त्या खरेदी खताला माझे पती साक्षीदार आहेत, असे उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांचे म्हणणे आहे. परंतु, कायद्यानुसार कोणताही व्यक्ती हा जमीन विक्री करणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार होऊ शकतो आणि माझे पती त्या खरेदीखताला साक्षीदार झाले म्हणून माझा त्यांचाशी संबंध सोडला जात आहे. हे चुकीचे आहे आणि मी दिलेला दाखला हा वस्तुस्थिती पाहून दिलेला आहे. त्यामुळे त्या दाखल्याबाबत उपसरपंच व सदस्य यांच्याकडून करण्यात येणारा आरोप चुकीचा आहे.
चौकट
साहित्य विक्रीत गैरव्यवहार नाही
आर्थिक गैरव्यवहार केलेल्या आरोपाबाबत नळपाणी योजनेचे साहित्य-विक्री करण्याचा ठराव हा मी पदावर येण्यापूर्वीच्या सरपंच व कार्यकारी यांनी केलेला आहे आणि त्यानुसार ग्रामपंचायतीचे सचिव यांच्यावर पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार सचिव यांनी कार्यवाही करून नळ योजनेचे साहित्य विक्री केलेले आहेत. विक्रीतून आलेली रक्कम ग्रामपंचायत खात्यावर भरणा केली आहे. साहित्य-विक्रीचे मुल्यांकन देखील घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे साहित्य विक्रीतून कोणताही आर्थिक गैरव्यवहार करण्यात आलेला नाही. उपसरपंच व सदस्य हे विनाकारण ग्रामपंचायतीची बदनामी करत असून ते करत असलेले कृत्य व बदनामी ही कायद्याला धरून नाही. त्यामुळे त्यांचावर ग्रामपंचायत अधिनियमनुसार अपात्रतेची कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.