टाळ मृदंगांचा ठेका, विठुनामाचा गजर

टाळ मृदंगांचा ठेका, विठुनामाचा गजर

Published on

75515

टाळ-मृदंगाचा ठेका, विठूनामाचा गजर

आषाढी वारीचा उत्साह; शाळांमध्ये वृक्षदिंडी, आजही विविध कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ५ ः शिवडाव (ता. कणकवली) माध्यमिक विद्यालयात आषाढी वारीच्या निमित्ताने वृक्षदिंडी आणि अभंगवाणी कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी रिंगण करून विठूनामाचा गजर केला. अंश तेली या विद्यार्थ्याने विठूरायाची आणि किमया सरंगले हिने रुक्मिणीची साकारलेली वेशभूषा लक्षवेधी ठरली. दरम्यान, जिल्ह्यात उद्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने (ता.६) विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीच्या अध्यक्षा भाग्यरेखा दळवी होत्‍या. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या मैदानामध्ये आषाढी वारीनिमित्त रिंगण करून विठूनामाचा गजर आणि अभंग गायन केले. त्‍यानंतर शाळेपासून ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत वृक्षदिंडी काढली. तसेच ग्रामपंचायत आवारात वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. सर्व मुली नऊवारी साडी, तर सर्व मुले पांढरा कुर्ता आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून सहभागी झाले.
रिंगण सोहळ्यात सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये रिंगण पूर्ण केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी फुगड्या घालत, विठूनामाचा जयघोष करून आनंद व्यक्त केला. ‘अभंगवाणी’मध्ये अंश तेली, हर्ष लाड, श्रीतेज गावकर, रिया गावकर, तनुज गावकर, श्रद्धा पवार, धनश्री शिरवडेकर, गौरी सावंत, सान्वी घाडीगावकर, रूपल वर्दम, नेहल शिवडावकर, रमिला कुमारी, पूर्वा गावकर, हर्षाली लाड, श्रेयस जाधव, सेजल शिवडावकर यांनी आपल्या अभंगातून शालेय वाद्यवृंदाच्या साथीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सहाय्यक शिक्षक स्वप्नील तांबे यांनी आपल्या सुरेल आवाजातून दोन अभंग सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. मुख्याध्यापक मुकेश पवार यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. के. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. धनश्री शिरवडेकर व प्रांजना गावकर यांनी सूत्रसंचालन केले. रिया गावकर हिने आभार मानले.
--------
कट्टा येथे आज धार्मिक कार्यक्रम
कट्टा ः आषाढी एकादशीनिमित्त कट्टा येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात उद्या (ता. ६) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात पहाटे ५.३० वाजता काकड आरती आणि विठ्ठलाची महापूजा, सकाळी ७ पासून तीर्थप्रसाद, दुपारी ११ वाजता भिवतादेवी भजन मंडळ नांदोस, दुपारी ३ वाजता देवी भराडी भजन मंडळ गुरामवाडी यांची भजने, सायंकाळी ४ वाजता कट्टा बाजारपेठ येथील महिलांचा हरिपाठ, ६ वाजता बालगोपाळ मंडळ, आचरा वरची चावडी यांचे देखाव्यासह दिंडी भजन होणार आहे.
..........................
देवबागला आज आषाढी सोहळा
मालवण ः देवबाग येथील श्री देव विठ्ठल मंदिरात १० जुलैपर्यंत हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. उद्या (ता. ६) आषाढी एकादशी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. काकड आरती, नित्यपूजा, देवदर्शन व ओटी भरणे, वारकरी भजने, भांजी (देवबाग), भाटकर (देवबाग) व तारी (तारकर्ली) यांचे दिंडीचे श्री देव विठ्ठल-रखुमाई मंदिरात आगमन, ग्रामस्थांचे वारकरी भजन, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
---
तारामुंबरी येथे आषाढी उत्सव
देवगड ः येथील तारामुंबरीमधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात उद्या (ता.६) आषाढी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.७) उत्सवाची सांगता होईल. कार्यक्रम असे ः पहाटे ४.३० वाजता पूजा, ५ ते ६.३० काकड आरती, ९ वाजता घटस्थापना व हरिनामाचा गजर, दुपारी ३.३० वाजता हरिपाठ (जीवन विद्या ज्ञान साधना केंद्र देवगड), सायंकाळी ५.३० वाजता गुणाजी कोयंडे यांचे भजन, ७ वाजता सांजआरती, नंतर स्थानिक भजने, सोमवारी (ता.६) पहाटे ५ वाजता काकड आरती, दुपारी १२ वाजता श्रींच्या नैवेद्याने सांगता होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com