पृथ्वीला मोकळा श्वास घेऊ द्या....!

पृथ्वीला मोकळा श्वास घेऊ द्या....!

Published on

rat6p17.jpg-

डॉ. प्रशांत परांजपे

इंट्रो

निसर्गातील छोट्याशा शेवाळीच्या उदाहरणावरून किंवा अभ्यासावरून आपल्या लक्षात येईल की, छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठं काम उभे राहू शकते. याबाबत निसर्ग आपल्याला मार्गदर्शन सतत करत असतो. त्याकडे जाणिवेने लक्ष देणे आणि पर्यावरण संवर्धन करणे गरजेचे आहे.

- डॉ. प्रशांत परांजपे, दापोली
-------------

पृथ्वीला मोकळा श्वास घेऊ द्या....!

विकेंद्रीकरण पद्धतीने निसर्ग संवर्धन करता येतं, हे निसर्गच आपल्याला शिकवतो; पण निसर्ग नक्की काय शिकवतो, हे डोळसपणे पाहायला शिकले पाहिजे. निसर्ग वाचायचा म्हणजे नक्की काय करायचे0 हे पाहावे लागेल. आपल्याला नक्की काय करायचं आहे किंवा करता येईल याकडे आपण जाणिवेने लक्ष देणे आवश्यक आहे. उदा. कचरा समस्या ही जागतिक प्रश्न म्हणून उभी राहिली आहे; मात्र कोणत्याही प्रश्नाच्या डोक्यावर उभे राहिले की, चहूबाजूने उत्तरं दिसतात असे आमचे ठाम मत आहे. आपण प्रत्येकाने विकेंद्रीकीकरण पद्धतीने कचऱ्याच्या प्रश्नाकडे पाहिलं तर हा प्रश्न नसून एक सोपे उत्तर आहे, हे लक्षात येईल.
एक कुटुंब प्रतिदिन अधिकाधिक ५० ते १०० ग्रॅम अविघटनशील कचरा करते म्हणजे ३० दिवसात अर्थात एका महिन्यात एका कुटुंबाकडून जास्तीत जास्त दोन ते तीन किलो अविघटनशील कचरा तयार होतो. हे कचऱ्याचे प्रमाण वर्षातून दोन किंवा तीनवेळाच ज्या वेळेला सण, उत्सव, समारंभ असतात त्यापूर्वी आणि नंतर वाढलेले दिसून येते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला तीन किलो विघटनशील कचऱ्याचे काय करायचं, असा प्रश्न पडणे गरजेचे नाही. कारण, या प्रश्नाच्या आपण डोक्यावर उभे राहिलो तर आपल्याला समोर दिसून येतं की, हा विघटनशील कचरा आपण घरीच चार ठिकाणी स्वतंत्रपणे वर्गीकरण करून ठेवला तर अनेक संस्था आणि पुनर्वापर प्रकल्पाचे प्रतिनिधी हे सहज ते संकलन करून त्याचा शंभर टक्के विनियोग करू शकतात; मात्र सद्यःस्थितीत तसे न होता एका कायद्याने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये आम्ही कोथिंबिरीची जुडी, शिल्लक राहिलेले अन्न, अंड्याची टरफले, घरातील गेलेला बल्ब, एक्स-रेची फिल्म असा सर्वच कचरा एकत्र टाकतो, त्या पिशवीला गाठ मारतो आणि ती कचराकुंडीत भिरकावून देतो. यामुळे मी स्वच्छता केली, असा आविर्भाव जरी आणला असला तरीही मी आमच्या घरातील कचरा हा कचराकुंडीत नेऊन त्या ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्यास कारणीभूत झालो आहे, याची जाणीव होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ओल्या कचऱ्याचे काय करायचं, असाही प्रश्न प्रत्येक नागरिक बेंबीच्या देठापासून ओरडून प्रशासनाच्या नावे बोटे मोडत राहतो. प्रसंगी प्रशासनासमवेत भांडण करतो. मात्र इथेही तीच मात्रा लागू पडते. ओल्या कचऱ्याचं करायचं काय, या प्रश्नाच्या डोक्यावर उभे राहिलं की, पटकन आपल्या लक्षात येतं की, अरे ज्याला आपण कचरा म्हणतो आहोत तो कचरा नसून सेंद्रिय खताचे ते रॉ मटेरियल आहे किंवा कच्चामाल आहे. त्यालाच आपण फेकून द्यायला सज्ज झालो आहोत. किंबहुना फेकून देत आहोत. या ओल्या कचऱ्याला थोडीशी शिस्तीमध्ये आपल्याकडे असलेल्या कमी खोलीच्या आणि जास्त लांबीच्या खड्ड्यामध्ये, एखाद्या चौकोनी किंवा आयताकृती कोणत्याही भांड्यामध्ये टाकायला सुरवात केली, त्याला रोजच्या रोज ढवळणी केली आणि कल्चरचा वापर केला तर घरच्या घरी आपण दर महिन्याला आपल्या किचन वेस्टपासून उत्तम प्रकारचे खत तयार करू शकतो. खड्डा करायचा नाही, कचरा ढवळायला कोणाला वेळ आहे अशा नकारात्मक प्रश्नाचेही उत्तर आहे. याकरिता अनेक कंपन्या या घरच्या घरी खत तयार करून देणारी युनिट तयार करत असतात. रत्नागिरी जिल्ह्यातही अशा कंपन्या कार्यरत आहेत आणि त्या माध्यमातून विकेंद्रीकीकरणाच्या पद्धतीने वर्षाला हजारो टन कचऱ्याचे विघटन हे झालेलं दिसून आलं आहे.
निसर्गचक्राचा अभ्यास केला तर निसर्गतः जी वस्तू तयार होते हे सगळे रित्या ती पुन्हा निसर्ग सामावून घेतो आणि ही गोष्ट आपण प्राथमिक शाळेत शिकलो आहोत; मात्र काळाच्या ओघात त्याचा विसर पडला आहे. उदाहरणार्थ, झाडाच्या पडलेल्या फांद्या किंवा पाने ही त्याचं खत म्हणून जमिनीत मुरून पुन्हा त्याला नवसंजीवनी देत असतात; मात्र हा पालापाचोळा किंवा पडलेल्या फांद्या या आपण उचलतो आणि त्याला काडी लावून त्याची राख करतो. त्यामुळे निसर्गचक्र बिघडते. ज्या पद्धतीने निसर्गाने स्वतःचे एक चक्र निर्माण केले आहे त्याच पद्धतीने आपण निर्माण केलेली जी घनवस्तू आहे, त्या वस्तूला ही तिच्या वापरानंतर एक घर हे तयार झालेले असते. मात्र त्या वस्तू घरी वापरून झालेल्या वस्तूला पाठवण्याची जबाबदारी ही आपण जबाबदारीने घेणे तितकेच महत्त्वाचे आहे तरच या घनकचऱ्याचे चक्रही अलगद पूर्ण होऊन निसर्गसाखळी जी तुटत आहे ती पुन्हा जोडली जाऊ शकते.
कचरा समस्या निर्माण केली गेल्यामुळे आणि निसर्गावर अनन्वित असे अत्याचार नेमाने सुरू असल्यामुळे जलप्रदूषण, जमीन प्रदूषण, निसर्ग प्रदूषण, जंगल प्रदूषण, वायूप्रदूषण यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि विकास म्हणजे सपाटीकरण आणि काँक्रिटीकरण या चुकीच्या संकल्पनेमुळे हरित आच्छादने कमी होऊ लागली. शेतीसाठी बेसुमार रासायनिक खताचा वापर झाल्यामुळे जमिनीचा कस कमी होऊ लागला आणि दुसरीकडे हरित आच्छादन जाऊन सिमेंट आणि जागोजागी प्लास्टिक कचऱ्याने जमीन आच्छादली गेली. यामुळे जमीन निकष झाली. निसर्गचक्रातील शेवाळ, रान, झुडूपवर्गीय झाडे नष्ट होऊ लागली आणि विकासाच्या, स्वच्छतेच्या नावाखाली निसर्गातील ही साखळी आपण नष्ट करू लागलो; मात्र निसर्गातील छोट्याशा शेवाळीच्या उदाहरणावरून किंवा अभ्यासावरून आपल्या लक्षात येईल की, छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं काम उभं राहू शकते. याबाबत निसर्ग आपल्याला मार्गदर्शन सतत करत असतो. त्याकडे जाणीवेने लक्ष देणे आणि त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
कोणतेही रोपटे लावल्यानंतर झाडं मोठी व्हायला दशकं लागतात; पण निसर्गातील शेवाळ हा प्रकार अतिशय कमी कालावधीत जमीन आणि मोठ्या झाडांवरही आपले अस्तित्व दर्शवू लागतो. शेवाळवाढीकरिता विशिष्ट प्रकारची जमीन असणे आवश्यक नाही किंबहुना कोणत्याही जमिनीची गरज न पडता अगदी शांतपणे आणि वेगाने शेवाळ वाढू लागते आणि आपले निसर्गातील समतोल राखण्याचे काम करत राहते. हे झाडांपेक्षा ४ पट जास्त दराने प्रती चौ. मी. कार्बन डायऑक्साईड शोषतं. ही शेवाळे दगडी भिंती, छप्परं, फूटपाथ आणि काँक्रिटवरसुद्धा सहज उगवतं; पण दुर्दैवाने, बरेच लोक याला केवळ घाण समजतात आणि ॲसिड टाकून घासून काढून टाकतात.
प्रत्यक्षात पाहिलं तर शेवाळ ही निसर्गाने दिलेली हवा स्वच्छ करणारी यंत्रणा, कार्बन शोषण करणारा स्रोत आणि शहरी भागात थंडी देणारी थर आहे. हे हवेतून CO₂ शोषतं, पृष्ठभागाचं तापमान ३०°C पर्यंत कमी करतं, हवेतील धूळ आणि प्रदूषण शोषून घेतं, मातीची धूप थांबवतं आणि पावसाचं पाणी साठवून ठेवतं जिथे दुसरी कोणतीही वनस्पती जगू शकत नाही तिथेही हे जगतं. जेव्हा आपण भिंतींवरून किंवा फूटपाथवरून शेवाळ काढून टाकतो तेव्हा आपण निसर्गाच्या एक अत्यंत प्रभावी; पण दुर्लक्षित उपायाला नष्ट करत असतो. ही छोटीशी हिरवळ आपल्या शहरांना आणि पृथ्वीला उष्णतेपासून वाचवण्याचं काम करते. त्यामुळे शेवाळाला तसंच वाढू द्या. पृथ्वीला मोकळा श्वास घेऊ द्या.

(लेखक शाश्वत पर्यावरण विकास या विषयातील डॉक्टरेट पदवीधारक आहेत.)
-------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com