सोशल मीडियावर विसंबून राहू नका, वाचन करा
75731
सोशल मीडियावर विसंबून राहू नका, वाचन करा
तहसीलदार दीक्षांत देशपांडे; कणकवलीत ‘लायन्स’तर्फे गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ७ : विद्यार्थ्यांनी वाचन करणे आवश्यक आहे. जे मिळेल, आवडेल ते वाचा. सोशल मीडियावर फार विश्वास ठेऊ नका. अनेकदा ते ‘फॉरवर्ड’ केलेले असते. केवळ मोबाईल वाचण्यापेक्षा वृत्तपत्र, कथा, कादंबरी आदी साहित्य वाचा. वाचनामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. मिळविलेले यश टिकवून ठेवा. त्यात सातत्य ठेवा, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी येथे केले.
कणकवली नगर वाचनालयाच्या समागृहात कणकवली लायन्स बलब आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात श्री. देशपांडे बोलत होते. व्यासपीठावर येथील लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळे, डॉ. बी. एस. म्हाडेश्वर, सचिव प्रा. दिवाकर मुरकर, माजी अध्यक्ष डॉ. अशोक कदम, उपाध्यक्ष विजय पोवार, महेश काणेकर, खजिनदार डॉ. प्रवीण गोरुले, सदस्य प्रसाद राणे आदी उपस्थित होते.
श्री. देशपांडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात कोकण विभागाचा निकाल अनेक वर्षांपासून सर्वाधिक लागतो आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल जास्त आहे. दहावीचा हा सर्वोत्तम निकाल पुढे कायम ठेवा. २०१२ मध्ये एमपीएससी परीक्षा दिली. मात्र, यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडले नाहीत. २०१४ मध्येही पदरी अपयश आले. २०१६ मध्ये मात्र मला यश प्राप्त झाले. सांगण्यामागचा हेतू एवढाच आहे की, कोणतेही अपयश आले तरी खचून जाऊ नका. प्रयत्न करीत राहा. मोबाईलमध्ये अडकून पडू नका. जेवढे समजतेय तेवढे वाचत राहा. सर्वांत जास्त साहित्य कोकणातील असून त्याचे वाचन करा. वाचनाची सवय लावा. विराट कोहली आवडत असेल तर तो प्रत्येक चेंडू खेळताना किती लक्ष ठेऊन खेळतो, त्याप्रमाणे तुम्ही लक्ष केंद्रीत करा. यावेळी
नूतन सदस्य प्रसाद सत्यवान राणे, नगर वाचनालयाचे कर्मचारी अनिल मुसळे यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमधून विधी चिंदरकर हिने मनोगत व्यक्त केले. प्रा. दिवाकर मुरकर यांनी प्रास्ताविक केले. महेश काणेकर यांनी आभार मानले. दहावी, बारावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
----
इतर मान्यवरांचे मनोगत
डॉ. म्हाडेश्वर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आहाराकडेही लक्ष द्यावे. अभ्यास करताना तुमची प्रकृती उत्तम असेल तर तुम्हाला पुढे यशस्वी होण्यासाठी खडतर प्रवास करता येईल. यासाठी तुमचा फिटनेस महत्त्वाचा आहे.’’ डॉ. प्रवीण बिरमोळे म्हणाले, ‘‘यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन. मात्र, अपयश आले म्हणून निराश होऊ नका. अपयशातून तुम्हाला काय करू नये, हे शिकायला मिळते व त्यातून तुम्ही अधिकाधीक चांगले निर्माण करू शकता. स्वतःला ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडा. तुमचा कल कोठे आहे, त्या क्षेत्रात आवडीने, मेहनतीने काम करा. यश तुमचेच आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.