कडक बंदोबस्त असतानाही राजापुरात घरफोडी
७५७८७
कडक बंदोबस्त असूनही राजापुरात घरफोडी
१२ लाख ८० हजारांचा ऐवज पळविला : श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांची मदत
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ : आषाढी एकादशी आणि मोहरम या निमित्ताने गेले दोन दिवस राजापूर शहरात कडक बंदोबस्त असूनही शनिवारी (ता. ५) सायंकाळी लॅविश अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी १२ लाख ८० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञांना पाचारण केल्याचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष भामुद्रे यांचा लॅविश या निवासी संकुलामध्ये फ्लॅट आहे. बुलढाणा येथील मूळ रहिवासी असलेले भामुद्रे कुटुंबीय गेली अनेक वर्षे राजापूर येथे वास्तव्याला आहेत. त्यांचा आठवडा बाजारात फळ विक्रीचा व्यवसाय आहे. ते शनिवारी सायंकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यांची पत्नी व मुलेही घराबाहेर होती. सायंकाळी ६.३० वाजता ते घरी आले असता त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. घरातील कपाट विस्कटलेल्या अवस्थेत होते. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक अमित यादव, पोलिस उपनिरीक्षक श्री. उबाळे, श्री. शेख यांच्यासह अन्य सहकारी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर चोरीच्या ठिकाणासह चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा पंचनामा केला. त्यामध्ये नऊ लाख रोकड आणि तीन लाख ८० हजारांचे दागिने असा एकूण १२ लाख ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. माईनकर यांनीही चोरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दिवसाढवळ्या चोरी झाल्याने यामध्ये स्थानिक माहितगाराचा हात असण्याची शक्यता वर्तविली आहे. पेट्रोलपंपासमोरील बिल्डींगमध्येही चोरट्यांनी हात मारण्याचा प्रयत्न केला होता. तिथे फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे त्यांना हात हलवत परतावे लागल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. त्या प्रकाराबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झालेली नाही. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकासह ठसेतज्ज्ञांना पोलिसांनी पाचारण केले होते. मात्र, श्वानपथकाला यश आलेले नाही.
पोलिसांपुढे आव्हान
गेल्या महिन्यात मुंबई-गोवा महामार्गावर तालुक्यातील कोंड्ये तर्फ सौंदळ येथे चोरट्यांनी चार घरांत चोरी केली होती. त्यानंतर आषाढी एकादशीनिमित्त शहरात पोलिस बंदोबस्त असतानाही चोरट्यांनी घरफोडी केल्यामुळे राजापूरच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या चोऱ्यांचा उलगडा करीत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.