रत्नागिरी-१८ कोटी देणे असल्याने जलजीवनची गती मंदावली
जलजीवन मिशन कामाची मंदावली गती
१४३२ पैकी ५३५ योजनाच पूर्ण; शासनाकडे १८ कोटी निधीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ : जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४३२ पाणीयोजना सुरू आहेत. त्यापैकी ५३६ योजना १०० टक्के पूर्ण झाल्या आहेत. ३०७ योजना पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, ६५ योजनांचे काम अजून २५ टक्केवरच अडकले आहे. या योजनेच्या २०२४-२५ मधील भौतिक प्रगतीचा आढावा घेतला असता ३७.५४ टक्केच योजनांची कामे झाली आहेत. ६२.२४ टक्के जलजीवन मिशनमधील योजनांची कामे अपूर्ण आहेत. सुमारे ११५२.८० कोटींची आर्थिक तरतूद या योजनांसाठी केली आहे. त्यापैकी ५९०.१० कोटींचीच कामे झाली आहेत. ७५ आणि १०० टक्के पूर्ण झालेल्या कामांसाठी १८ कोटींची गरज असून, तशी मागणी शासनाकडे केली आहे. ठेकेदारांची देणी मोठ्या प्रमाणात असल्याने जलजीवन मिशन योजनांच्या कामाची गती मंदावली आहे.
राज्यामध्ये २००२ ते ०९ या कालावधीत शिवकालीन पाणी साठवण योजना राबवण्यात आली. या योजनेंतर्गत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या असलेल्या गावांमध्ये पावसाचे पाणी साठवणूक करण्याच्या व स्रोत बळकटीकरणाच्या योजना हाती घेण्यात आल्या. या योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांद्वारे अनेक गावांच्या उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या यशस्वीपणे सोडवण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर केंद्र शासनाद्वारे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत देखील स्रोत बळकटीकरण उपाययोजना हाती घेतली; परंतु २०१८ पासून राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत या योजनांची (शाश्वतता) अंमलबजावणी केंद्र शासनाद्वारे थांबवण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत केंद्र व राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने जलजीवन मिशन कार्यक्रम (२०२०-२४) राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “हर घर नलसे जल” या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तीक नळजोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे.
जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत १ हजार ४३२ योजना राबवण्यात येत आहेत. त्यापैकी आतापर्यंत ५३६ योजना पूर्ण झाल्या आहेत. ७५ ते १०० टक्केदरम्यान असलेल्या ३०७ योजना आहेत. ५० ते ७५ टक्केमध्ये ३१६ योजना, २५ ते ५० टक्केमध्ये १९० योजना आणि ० ते २५ टक्केमध्ये ६५ योजना आहेत. जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांसाठी तरतूद मोठी केली आहे; १०० टक्के पूर्ण झालेल्या ५३६ योजनांसाठी सुमारे १३ कोटी ७६ लाख तर ७५ टक्के पूर्ण झालेल्या ३०७ योजनांना ४ कोटी असे सुमारे १८ कोटी रुपये ठेकेदारांचे देणे बाकी आहे. हे देणे मिळावे यासाठी जिल्हा परिषदेने शासनाला पत्रव्यवहार केला आहे. ठेकेदार आर्थिक अडचणीत असल्याने जलजीवन मिशन योजनांच्या कामाचा जिल्ह्यातील वेग मंदावला आहे.
----------
चौकट...
योजनांची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका ७५ ते १०० टक्के १०० टक्के
चिपळूण ३२ ४२
दापोली ३१ ४५
गुहागर ३१ १०
खेड ५७ ५५
लांजा १४ २४
मंडणगड १८ १९
राजापूर ३८ २३
रत्नागिरी ३३ ३२
संगमेश्वर ६२ ५७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.