आता ग्रामपंचायतीतच मिळणार उत्पन्न, जात, डोमिसाईल दाखले!
आता ग्रामपंचायतीतच मिळणार उत्पन्न, जात, डोमिसाईल दाखले!
कलमठमधून श्रीगणेशा; कणकवली तालुक्यात ६४ गावांमध्ये ‘महा-ई-सेवा केंद्र’
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ८ ः जात प्रमाणपत्र, वय व अधिवास, उत्पन्न आदी दाखल्यांसाठी पूर्वी तालुका ठिकाणच्या तहसील कार्यालयामध्ये नागरिकांना हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, कणकवली तालुक्यातील ग्रामस्थांना आता हे सर्व दाखले आणि इतर ५९२ सेवा आपल्या ग्रामपंचायतीतून मिळणार आहेत. ‘महा ई-सेवा केंद्र’ या उपक्रमांतर्गत ही महत्त्वाची सुविधा सर्व ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, या सुविधेची औपचारिक सुरुवात कलमठ ग्रामपंचायतीमध्ये नुकतीच पालकमंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सध्या ३८ प्रशासकीय विभागांच्या १०३४ सेवा अधिसूचित असून, यातील ५९२ सेवा ऑनलाईन आहेत. यापूर्वी नागरिकांना या सेवांसाठी तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्र किंवा खासगी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ गाठावे लागत होते. त्यासाठी वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान, ग्रामपंचायतींमधील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित होती. मात्र, या केंद्रांमध्ये केवळ ग्रामविकास विभागाच्या सात सेवा दिल्या जात होत्या. मात्र, आता त्यांना महाआयटी मंडळाशी जोडण्याची प्रक्रिया राज्य शासनाने सुरू केली असून, सर्व ५९२ सेवा ग्रामपंचायत पातळीवरच उपलब्ध झाल्या आहेत. यात कणकवली तालुक्याने आघाडी घेतली आहे. तालुक्यातील एकूण ६४ ग्रामपंचायतींपैकी ६० ग्रामपंचायतींमध्ये ही सेवा सुरू झाली आहे, तर उर्वरित चार ग्रामपंचायतींमध्ये पुढील तीन ते चार दिवसांत ही सेवा सुरू होईल, अशी माहिती गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे यांच्या संकल्पनेतून आणि पालकमंत्री नीतेश राणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाआयटी महामंडळाशी समन्वय साधून ही सेवा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध केली आहे. त्याअनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. तसेच डाटा ऑपरेटरचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
आता गाव पातळीवरच सर्व सेवा आणि दाखल्यांची उपलब्धता होणार असल्याने ग्रामस्थांचा वेळ, खर्च आणि प्रवास वाचणार आहे. सर्व ग्रामपंचायतींना स्वतंत्र मोबाईल क्रमांक दिले आहेत.
----------
ग्रामपंचायतीच्या नावे युजर आयडी
यापूर्वी ग्रामपंचायतीला दिलेले ‘आपलं सेवा केंद्रा’चे युजर आयडी हे खासगी ऑपरेटरच्या नावाने होते. या ऑपरेटरांनी काम बंद केले अथवा नोकरी सोडल्यानंतर ग्रामपंचायतींना आपलं सरकार केंद्रातून सेवा देताना अडचणी येत होत्या. मात्र, आता ग्रामपंचायतींच्या नावे युजर आयडी दिले आहेत. त्यामुळे ऑपरेटरने काम सोडले, तरी ग्रामसेवकांच्या माध्यमातून ही सेवा सुरू राहणार आहे.
-------------
कोट
पूर्वी ग्रामपंचायतींच्या आपलं सरकार सेवा केंद्रामध्ये ठराविकच सेवा उपलब्ध होत्या. मात्र, आता तालुक्याच्या ठिकाणच्या सेतू सुविधा केंद्राप्रमाणेच सर्व सुविधा आणि दाखल्यांची उपलब्धता ग्रामपंचायत पातळीवरील आपलं सेवा सरकार केंद्राच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्चदेखील वाचणार आहे.
- अरुण चव्हाण, गटविकास अधिकारी, कणकवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.