‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’
76178
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’
देवगडात वृक्षारोपण; धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ९ ः डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तालुक्यातील श्री सदस्यांकडून येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे तहसीलदार आर. जे. पवार यांनी स्वागत केले. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या अभंगपंक्तीचा दाखला त्यांनी यावेळी दिला.
डॉ. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या तालुक्यातील सदस्यांच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात विविध प्रकारची रोपे लावली. यावेळी प्रतिष्ठानचे तालुक्यातील विविध भागातील शेकडो सदस्य सेवाभावी वृत्तीने या उपक्रमात सहभागी झाले.
श्री. पवार यांनी तहसीलदार पदभार स्वीकारल्यानंतर तहसील इमारत सुशोभीकरणापासून सर्वसामान्य जनतेच्या सोयी-सुविधा व कामकाजात बदल घडवून आणले जात आहेत. कार्यालयाच्या आवारात नैसर्गिक वातावरण तयार करण्याच्या उद्देशाने झाडे लावण्याचे उद्दिष्ट मनात ठेवले होते. या उद्दिष्टाला तालुक्यातील धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांकडून साथ मिळाली. यामुळे श्री. पवार यांनी, ‘सर्व सदस्यांचे आभार मानताना ‘वृक्षवल्लीं’पासून खूप फायदे आहेत. सजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी वृक्षारोपणाकडेच सर्वांनी वळले पाहिजे,’ असे सांगून आभार मानले. यावेळी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे काका राऊत, संजय पराडकर आदी उपस्थित होते.