अवकाळीने अर्थार्जनाचे गणित बिघडले
76199
76200
अवकाळीने अर्थार्जनाचे गणित बिघडले
गावठी भाज्यांची उलाढाल; पाऊस लवकर आल्याने उत्पादनात घट
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ८ ः यंदा वेळेआधी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या अर्थार्जनाचे गणित बिघडले. पावसाळ्यात गावठी भाज्यांची मोठी उलाढाल होते. मात्र, यंदा सुरूवातीलाच झालेल्या जोरदार पावसाने पेरलेले भाजी बियाणे वाहून गेल्याने ग्रामीण भागांत भाज्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात विविध ठिकाणी गावठी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. भेंडे, गवार, वाली यासह दोडकी, पडवळ, मुळाभाजी, पालेभाज्या आदी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. शिवाय काकडी, चिबुड, भोपळे यांचीही लागवड केली जाते. तसेच गावठी मिरची पिकवली जाते. या उत्पादनातून ग्रामीण भागातील कुटुंबाना मोठा आर्थिक हातभार लागत असतो. ग्रामीण भागात पिकवलेली भाजी शहरात विक्रीला जाणली जाते. शहरात अशा भाज्यांना मोठी मागणी असते. आठवडी बाजाराबरोबरच अन्य दिवशीही भाज्या विक्रीस येतात. तसेच ग्रामीण भागातील कुटुंबाना पालेभाज्या खाण्यास उपलब्ध होत असल्याने त्यांचाही दैनंदिन खर्च कमी होत असतो. साधारण मे महिन्याच्या अखेरीस भाजी बियाणे पेरले जाते.
अधूनमधून वळवाच्या पावसासह बियाणे रूजून येऊन जूनच्या मध्यापर्यंत बऱ्यापैकी भाजी बाजारात उपलब्ध होत असे. मात्र, यंदा पावसाने शेतकऱ्यांचे सर्वच नियोजन बिघडवले. ग्रामीण भागात नेहमीच्या प्रथेप्रमाणे भाजी बियाणे पेरणी झाली. मात्र, अपेक्षेपेक्षा झालेल्या जोराच्या पावसाने सारेच बियाणे नाहीसे झाले. वेळेआधी अवकाळीची जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने काही भागात बियाणे वाहून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पहिल्या टप्यातील भाजी उत्पादन बाजारात आलेच नाही. आता जून महिना उलटून श्रावण महिना जवळ आला तरी अजूनही बाजारात गावठी भाज्यांची म्हणावी तशी आवक काही दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात मुळा, पालेभाजी येते. मात्र, अजूनही काकडी, चिबुड, दोडकी, पडवळ आदी भाज्या मुबलक प्रमाणात दिसत नाहीत. त्यामुळे खवयांची मोठी पंचाईत तर झालीच; मात्र, ग्रामीण भागांतील कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटल्याचे चित्र आहे. बाजारातील घाटमाथ्यावरील भाज्यांपेक्षा गावठी भाज्यांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा भाज्यांचे उत्पादन नसल्याने ग्रामीण भागातील कुटुंबाचे नियोजन कोलमडले आहे. पावसाळ्यात गावठी भाज्यांचे मोठी उलाढाल असते. मात्र, यंदा पावसाने सर्वांनाच धक्का दिला.
............................
किडरोगाचाही प्रादुर्भाव
ग्रामीण भागांत काही प्रमाणात चिबूडाचे उत्पादन होत असताना त्याला फळमाशांनी बेजार केले आहे. काकडी, चिबुड यावर वाढत्या किडरोगाचा प्रादुर्भाव असल्याने झालेले उत्पादनही वाया जात असल्याचे शेतकरी सांगतात. हापूस आंब्यावर असलेली फळमाशी आता अन्य भाजीपाला उत्पादनानांही लक्ष्य करीत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे कठीण बनले आहे. पालेभाज्यांवरही किडरोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. मात्र, त्यावर फवारणी करणे शक्य नसल्याने त्यातही नुकसान होते.
.............................
दुबार पेरणी
श्रावण महिन्यात विविध सण असतात. शिवाय अनेकांचे उपवास असतात. तसेच पुढे गणेशोत्सव असल्याने यावेळी गावठी भाज्यांना मोठी मागणी असते. मात्र, यंदा पावसामुळे सर्व गणित कोलमडून पडले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दुबार भाजी बियाणे पेरावे लागले आहे. अति पावसाने भाज्यांचे बियाणे कुजूनही गेले आहे. त्यामुळे काहींनी पुन्हा भाजी बियाणे पेरले आहे.
..........................
हॉटेल्समध्ये तुटवडा
ग्रामीण भागांत उत्पादित होणारी भाजी शहरातील विविध हॉटेल व्यावसायिक खरेदी करतात. त्यांना पडवळ, दोडकी, काकडी, भोपळा यासह पालेभाज्यांची आवश्यकता असते. मात्र, यंदा हॉटेल व्यावसायिकांनाही पुरेशी गावठी भाजी उपलब्ध होताना दिसत नाही. तसेच शेतकऱ्यांनाही यापासून मिळणारे उत्पन्नही अपेक्षेपेक्षा कमी झाले आहे.
................................
रानभाज्यांनाही मागणी
गावठी भाज्यांचे उत्पादन सेंद्रीय असते. त्यावर फारशी कोणतीही फवारणी नसते. कारण उत्पादन मर्यादित असल्याने फवारणीचा खर्चही परवडणारा नसतो. अशावेळी नैसर्गिक पद्धतीने भाज्यांचे उत्पादन घेतले जात असल्याने खवयांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही निर्धोक ठरते. विषमुक्त भाजीपाला असल्याने मानवी आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. मात्र, काहीवेळा बाजारी बियाणे असल्यास गावठी भाज्यांच्या चवीत काहीसा फरक पडतो. सध्या बाजारात फोडशी, टायकुळा, कुरडू, भारंगी आदी राजभाज्याही विक्रीस येतात. तसेच शेगुलाच्या पाल्याची भाजी, अळू आदी भाजीही विक्रीस येत असल्याने त्यालाही मागणी असते. प्राथमिक शाळांमधून रानभाज्यांचा बाजार भरवला जातो. ग्रामीण भागात अळूवडी करण्यासाठी आवश्यक असलेली पानेही शहरात विकली जातात. त्यामुळे पावसाळ्यात एकूणच ग्रामीण भागातील भाज्यांची मोठी उलाढाल होते.
.............................
कोट
76198
अवकाळी पावसामुळे यंदा गावठी भाजी उत्पादनाला मोठा फटका बसला. बियाण्यांवर बराच खर्च करून तसेच पावसामुळे चारवेळा बियाणे पेरूनही अपेक्षित भाजी मिळाली नाही. अतिवृष्टीमुळे बियाणे वाहून जाण्याचा प्रकार घडला. वेळेआधी पाऊस आल्याने भाजी उत्पादन म्हणावे तसे झाले नाही. आता हळूहळू पालेभाजी, भेंडे तयार होऊ लागले आहेत. भाजी उत्पादन उशिराने बाजारात येईल.
- कल्याणी अदम, जामसंडे
............................
दृष्टिक्षेपात
- यंदा १५ मेपासून पावसाला सुरूवात
- २२ मे पासून सलग काही दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी
- वळवाच्या पावसाला जोडूनच मॉन्सून सक्रीय
- जूनअखेरपर्यंत तालुक्यात १३१० मिलीमीटर इतका पाऊस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.