६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त
कृषी महाविद्यालयात कार्यक्रम

६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कृषी महाविद्यालयात कार्यक्रम

Published on

६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त
कृषी महाविद्यालयात कार्यक्रम
दापोली ः येथील कृषी महाविद्यालयाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून, त्या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिषद दालनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. संजय भावे, माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष चव्हाण, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. मकरंद जोशी, उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राकेश गजभिये, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत शहारे, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. रमेश कुणकेरकर उपस्थित होते. या सोहळ्यात गेल्या ६० वर्षांतील महाविद्यालयाच्या वाटचालीतील स्मृतींना उजाळा देण्यासाठी डॉ. सुभाष चव्हाण यांना आमंत्रित केले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी स्थापनेपासून आजपर्यंतचा इतिहास गोष्टी स्वरूपात सर्वांसमोर मांडला. या वेळी कृषी महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले तसेच डॉ. प्रवीण झगडे यांनी विस्तार उपक्रमांच्या छायाचित्रांचे सादरीकरण केले.

विद्यार्थ्यांनी घेतला भातलावणीचा आनंद
रत्नागिरी ः शहरातील माळनाका येथील शिर्के प्रशालेच्या ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलातील पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पानवल येथील शेतकरी चैतन्य मुळ्ये यांच्या शेतात भातलावणीचा आनंद घेतला. या वेळी शेतकरी मुळ्ये यांनी विद्यार्थ्यांना भातशेतीमधील दाढ काढणे व लावणी करणे यांची प्रात्यक्षिके दाखविली. शेतामध्ये लावणी केल्यानंतर ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे फवारणी यांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. कल्पवृक्ष म्हणजे नारळाच्या माध्यमातून नवनवीन वस्तू निर्मिती केली जाते, याची माहिती देताना मुळ्ये यांनी झावळांच्या माध्यमातून दैनंदिन स्वच्छतेसाठी लागणारी केरसुणी बांधणीचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनी पानवल येथे धबधब्यात भिजण्याचा आनंद घेतला. या वेळी गुरुकुलामधील अध्यापकवृंद गौरव पिलणकर, सागर रसाळ, गिरिजा करकरे यांनी लावणी व वर्षा सहलीचे उत्तम नियोजन केले, तर गुरूकुल प्रमुख किरण सनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम उत्साहात झाला.

आंबडस येथील शिक्षण परिषदेत
शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार
चिपळूण : खेड तालुक्यातील २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील जून २०२५ची शिक्षण परिषद न्यू इंग्लिश स्कूल, आंबडस (ता. खेड) येथे घेण्यात आली. या परिषदेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत उपस्थित होते. तसेच नासा-इस्रो, प्रज्ञाशोध, नवोदय विद्यालय प्रवेशपरीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पहिली नवीन अभ्यासक्रम, पायाभूत शिक्षण या विषयावर शाळा साखरचौकीची येथील शिक्षक रूपेश उतेकर यांनी मार्गदर्शन केले. केंद्र संसाधन गटस्थापना यावर मुख्याध्यापक संगीता वागरे यांनी मार्गदर्शन केले तर मुख्याध्यापक विजय साखरे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेविषयी माहिती दिली.

देवधामापूर सप्रेवाडी शाळेत रंगला
‘चला बळीराजा समजून घेऊ’ महोत्सव
साखरपा : शेतकऱ्याचे कष्ट आणि जीवन समजून देण्यासाठी देवधामापूर शाळेतील शिक्षकांनी ‘चला बळीराजा समजून घेऊया’ महोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांना भातलावणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. कोकणातील कृषी संस्कृती आणि त्यातील बैलजोडीचे महत्त्व यावर माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांच्या कष्टाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी, या उद्देशाने देवधामापूर सप्रेवाडी शाळेचे शिक्षक सतीश वाकसे यांनी मुख्याध्यापक अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी भातलावणीचे प्रात्यक्षिक आयोजित केले होते. या विद्यार्थ्यानी वाडीतील एका शेतात जाऊन स्वत: चारसूत्री भातलावणी केली. लागवडीची शास्त्रोक्त माहिती कृषी विभागाचे मंडळ अधिकारी कांबळे, सहायक रवींद्र यादव, पोपट खंडागळे, सहायक कृषी अधिकारी निशिगंधा डांगे, सुवर्णा वाकसे, अमृतसागर, श्वेता वेले, कोमल सुर्वे, ज्योती सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शेतात भातपीक लावणी केली. या वेळी सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते उपस्थित होते.

किरबेट येथील पुलाचे काम अपूर्ण
साखरपा ः किरबेट येथील एका पुलाचे काम गेले काही महिने अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना वाहतुकीसाठी त्रास होत आहे. त्यामुळे हा पूल तातडीने पूर्ण करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. किरबेट गावात जाणारा एक पूल गेले काही महिने अर्धवट अवस्थेत आहे. नव्याने बांधण्यासाठी म्हणून पुलाचे काम सुरू झाले; पण गेले काही महिने ते अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे किरबेट बौद्धवाडी, सुतारवाडी तसेच देवडे येथील गवळीवाडी, बौद्धवाडी, रोहिदासवाडी अशा पाच वाड्यांच्या वाहतुकीवर पूर्णतः परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यावरून वाहतूक करणार्‍या ग्रामस्थांना सध्या वाडीत आणि घरी जाण्यासाठी चक्क पायवाटेचा उपयोग करावा लागत आहे. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, नोकरदारवर्ग यांची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब ग्रामस्थ हर्षद पांचाळ यांनी आमदार किरण सामंत आणि सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवरूख यांच्या निदर्शनास आणून दिली. तसे निवेदनही पांचाळ यांनी दिले आहे. हा अपूर्ण अवस्थेतील ब्रीज तत्काळ बांधून पूर्ण करावा, अशी मागणी पांचाळ यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com