खड्डेच खड्डे; तरीही प्राधिकरण सुशेगाद
76245
खड्डेच खड्डे; तरीही प्राधिकरण सुशेगाद
करूळ-तळेरे मार्गावरील स्थिती; राजकीय पक्षही चिडीचूप
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. ८ ः विविध कारणांनी काँक्रीटीकरण राहिलेल्या करूळ-तळेरे मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पाच ते सहा ठिकाणी तीन ते चार फुटाचे खड्डे असून तेथून वाहनचालक जीव मुठीत धरून वाहने चालवित आहेत. एकीकडे खड्डेच खड्डे असताना महामार्ग प्रधिकरण सुशेगाद आहे तर राजकीय पक्ष आणि पदाधिकारी चिडीचूप आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.
तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रूंदीकरण, काँक्रीटीकरण आणि मजबुतीकरण दोन-तीन वर्षांपासून सुरू आहे. पहिल्या टप्प्यात कळे ते कोल्हापूर हा १६ किलोमीटर रस्ता मंजुर होता. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यात करूळ घाटरस्त्यांसह कोकिसरे घंगाळेवाडी ते नाधवडे इथंपर्यंतचा रस्ता झाला. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात करूळ ते कोकिसरे नारकरवाडी आणि नाधवडे ते तळेरे या रस्त्याचे काम मंजूर झाले. तळेरे-वैभववाडी हा ३३ किलोमीटर रस्ता असून या रस्त्यापैकी दीड दोन किलोमीटर रस्ता विविध कारणांमुळे काँक्रीटीकरण झालेला नाही. यातील पाच ते सहा ठिकाणे सध्या वाहनचालकांची डोकेदुखी झालेली आहेत. यामध्ये करूळ पुलानजीक, एडगाव येथील हॉटेल विराजनजीक, शांतीनदी पुल, कोकिसरे घंगाळेवाडी, हॉटेल पामबीच आणि तळेरे पुल यासह अन्य काही ठिकाणांचा समावेश आहे. येथील रस्त्यावरून वाहन चालविताना वाहन चालकांना जीव मुठीत धरून चालवावा लागत आहे. येथे एसटी बस, आराम बस कलंडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या खड्ड्यातून जाण्यावाचून कोणताही पर्याय नसल्यामुळे वाहनचालक त्रस्त आहेत. इतक्या दुरावस्थेनंतर देखील राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण सुशेगाद आहेत. खड्डे बुजविणे किंवा तो मार्ग सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना या मार्गावर होताना दिसत नाहीत. संपूर्ण ठिकाणी प्रचंड चिखल आणि तीन ते चार फुट उंचीचे खड्डे असे चित्र आहे. मात्र, अशी दुरावस्था असली तरी कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्याविरोधात आवाज उठविताना दिसत नाहीत. एरव्ही मोर्चा, आंदोलन करणारे पदाधिकारी मूग गिळुन गप्प का० असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जात आहे.
-------------
कोट
तळेरे-वैभववाडी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गाने प्रवास म्हणजे अपघाताला निमत्रंण अशी स्थिती आहे. मोठ्या अपघातानंतर महामार्ग प्रधिकरणला जाग येणार आहे का० या रस्त्याची तत्काळ दुरूस्ती करणे आवश्यक आहे.
- शरद नारकर, निवृत्त शिक्षक, वैभववाडी
--------------
कोट
तळेरे-गगनबावडा महामार्गावरील रस्ता दुरूस्ती केली होती. परंतु, पावसामुळे रस्ता पुन्हा खराब झाला आहे. येत्या चार दिवसांत या मार्गाची दुरूस्ती पुर्ण करण्यात येईल.
- पवन पाटील, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण, सिंधुदुर्ग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.