सिंधुदुर्गवासीयांनो, ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अभिप्राय नोंदवा

सिंधुदुर्गवासीयांनो, ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अभिप्राय नोंदवा

Published on

सिंधुदुर्गवासीयांनो, ‘स्वच्छ सर्वेक्षण’मध्ये अभिप्राय नोंदवा

रवींद्र खेबुडकरांचे आवाहन; स्वच्छ भारत मिशनअंतर्गत उपक्रम

ओरोस, ता. ८ ः स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा २ अंतर्गत केंद्रातर्फे स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ अंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांनी अभिप्राय नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ (एसएसजी-२०२५) हे ॲप डाउनलोड करून अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केले.

केंद्राने २०१८ पासून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण ही ग्रामपंचायतींची पडताळणी मोहीम सुरू केली आहे. या सर्वेक्षणातून ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, तसेच राज्य यामध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे, स्वच्छतेची व्याप्ती वाढविणे, तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर बांधलेल्या स्वच्छता सुविधांचा शाश्वत वापर करणे हा प्रमुख उद्देश आहे. राज्यातील ग्रामीण भागात ॲकॅडमी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या केंद्र पुरस्कृत त्रयस्थ यंत्रणेकडून गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नमुना निवड पद्धतीने गावांची निवड करून ॲपच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. यामध्ये कुटुंबस्तर आणि गावातील सार्वजनिक ठिकाणांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावरील प्लास्टिक संकलन केंद्र, मैला गाळ व्यवस्थापन या प्रकल्पांची पाहणी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबांना भेटी देणे, गावातील सार्वजनिक ठिकाणांना भेटी देणे, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत या संस्थात्मक ठिकाणी भेटी देणे, सार्वजनिक शौचालय पाहणी, स्वच्छता संदेश यांची पाहणी, तसेच गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनांची माहिती घेऊन फोटो जिओ टॅग केले जाणार आहेत. गावांमध्ये कुटुंबांच्या भेटीवेळी घरातील स्वच्छतेच्या सुविधांची स्थिती वैयक्तिक शौचालयाचा वापर, हात धुण्याच्या सवयी तसेच ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण व त्यासाठीची सुविधा शिवाय सांडपाणी व्यवस्थापनाचे केलेले काम आदींबाबत माहिती घेतली जाणार आहे.
-----------------
असे होणार गुणांकन
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ साठी एक हजार गुणांकन केले जाणार आहे. यात ऑनलाईन प्रणालीवरील प्रगती २४० गुण, गावातील प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षण ५४०, जिल्हा व तालुकास्तरावरील प्रकल्प थेट निरीक्षणासाठी १२०, ग्रामस्थांच्या प्रतिसादासाठी १०० अशा एकूण १००० गुणांच्या आधारे ग्रामपंचायत, जिल्हा, राज्यांचे मूल्यांकन होणार आहे. केंद्राच्या ऑनलाईन प्रणालीवरील उपलब्ध माहितीचे यामध्ये जिल्हानिहाय मूल्यांकन होईल. नमुना पद्धतीने निवडलेल्या गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी व निरीक्षणाद्वारे मोबाईल ॲपवर माहिती भरली जाईल.
-------------
कोट
जिल्हा आणि तालुकास्तरावर उभारलेले गोबरधन प्रकल्प, प्लास्टिक संकलन केंद्र, मैला गाळ व्यवस्थापन केंद्रांची पाहणी होईल. नागरिकांचा अभिप्राय मोबाईल ॲपच्या माध्यमातून व प्रत्यक्ष गावातील भेटीवेळी अशा दोन टप्प्यात घेतला जाईल.
- विशाल तनपुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणी व स्वच्छता विभाग
--------------
जिल्हावासीयांनी गुगल पे स्टोअरवरून स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०२५ (एसएसजी-२०२५) हे ॲप डाउनलोड करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करून अभिप्राय द्यावा. त्यामुळे जिल्हाला गुणांकन मिळणार आहे, तरी जिल्ह्याला स्वच्छता क्षेत्रात अग्रस्थानी ठेवण्यासाठी जिल्हावासीयांनी अभिप्राय नोंदवावा.
- रवींद्र खेबुडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com