आयुर्वेदातून आजार होऊ नये यासाठीची जीवनशैली
लोगो-----------आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक
(२७ जून टुडे ४)
‘आरोग्य धनसंपदा’ असे सांगणारी भारतीय संस्कृती आरोग्याला आयुष्याची मूलभूत संपत्ती मानते. या आरोग्यसंपन्न जीवनासाठी आयुर्वेद हा हजारो वर्षांपासून वेळेच्या कसोटीवर खरा उतरलेला आणि परंपरागत व वैज्ञानिक चिकित्सापद्धतीचा अमूल्य ठेवा आहे. अथर्ववेदाचे उपांग असणारा आयुर्वेद म्हणजे ‘आयुषो वेदः आयुर्वेद:’ अर्थात् जीवनशैली, आहार, विचार, औषधोपचार आणि आरोग्यरक्षण यांचे एकत्रित ज्ञान आहे.
- rat१०p४.jpg-
25N76585
- डॉ. नचिकेत दीक्षित
दीक्षित आयुर्वेद चिकित्सालय, रावतळे, चिपळूण.
----
आजार होऊ नये यासाठीची
आयुर्वेदातून जीवनशैली
‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं, आतुरस्य विकार प्रशमनं’ हा आयुर्वेदाचा मुलभूत सिद्धांत आहे म्हणजेच, जो स्वस्थ आहे त्याचे स्वास्थ्य जपणे आणि जो आजारी आहे त्याच्या रोगाचे निवारण समर्पक औषधी चिकित्सा अथवा पंचकर्म उपचार या द्वारे करणे हे आयुर्वेदाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यामुळे आयुर्वेद हा केवळ आजार झाल्यावर उपचार करणारी पद्धत नाही तर तो आजार होऊ नये म्हणून सजग राहण्याची शास्त्रशुद्ध जीवनशैली शिकवतो.
‘रोगस्तु दोषवैषम्यं दोषसाम्यं अरोगता’ या आयुर्वेदातील वाक्याचा अर्थ असा आहे की, रोग म्हणजे शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे असंतुलन होय आणि जेव्हा हे दोष संतुलित असतात तेव्हा आपले आरोग्य चांगले राहते. हे दोष योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी आणि योग्य स्वरूपात कार्य करत असतील तर मनुष्य निरोगी राहतो; पण त्यांच्यात बिघाड झाला म्हणजेच ते वाढले, कमी झाले किंवा चुकीच्या ठिकाणी गती प्राप्त झाली तर रोग निर्माण होतो म्हणूनच आयुर्वेद उपचार करताना दोषांचे संतुलन साधणे हे मुख्य उद्दिष्ट असते. संतुलित आहारविहार, दिनचर्या आणि पंचकर्मामुळे हे संतुलन टिकवता येते.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे मानसिक तणाव, असंतुलित आहार, झोपेचा अभाव आणि व्यायामाची कमतरता यामुळे विविध जीवनशैलीजन्य आजार उद्भवत आहेत. अशा परिस्थितीत आयुर्वेद हा नक्कीच शाश्वत मार्गदर्शक ठरतो. दिनचर्या, ऋतुचर्या, संतुलित आहार, योग व प्राणायाम यांच्या माध्यमातून आयुर्वेद शारीरिक व मानसिक समतोल साधतो. योगदिनाच्या निमित्ताने जनमानसात योग व आयुर्वेदाविषयी निर्माण होणारी जागरूकता ही नक्कीच आशादायक आहे.
रसायन चिकित्सा हा आयुर्वेदातील एक अत्यंत प्रभावी आणि सखोल विषय आहे. शरीरातील रसधातूचे परिपक्व पोषण करून त्याची गुणवत्ता सुधारणे व त्रिदोष व सप्तधातूंचा समतोल साधणे, हा त्याचा मूळ उद्देश आहे. शरीराचे सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी औषधस्वरूप रसायन ज्या द्वारे दीर्घायुष्य, उत्तम स्मृती, तेज आणि रोगप्रतिकारक शक्ती प्राप्त होऊ शकते व मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी प्राणायाम, योग व त्या अनुषंगाने विशिष्ट औषधी द्रव्यांची जोड उपयुक्त ठरते. रसायन चिकित्सा ‘जराव्याधीप्रशमन’ म्हणजेच वृद्धावस्थेच्या त्रासांवर तर उपयुक्त आहेतच; पण तरुण अवस्थेतही आयुष्याच्या गुणवत्तेसाठी त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेदातील शरीरशुद्धीची अत्यंत शास्त्रशुद्ध व वैज्ञानिक प्रक्रिया आहे. नियमित पंचकर्मामुळे शरीरातील दोषांचे संतुलन साधले जाते. त्वचा, पचनसंस्था, मेंदू आणि मनसुद्धा ताजेतवाने राहते. वसंतऋतुत वमन कफदोषासाठी, शरद ऋतुत विरेचन पित्तदोषासाठी, वर्षा ऋतुत (पावसाळ्याच्या सुरुवातीला) बस्ती वातदोषासाठी हितकर ठरते तसेच नस्य व रक्तमोक्षण याचाही आजाराच्या अनुषंगाने वैद्यांच्या योग्य सल्ल्याने उपयोग करून घेता येऊ शकतो. या पाच मुख्य क्रिया शरीरातील साचलेले विकृत दोष व मल यांचे शरीराबाहेर काढून आरोग्य प्रदान करतात. पंचकर्म केवळ आजारावरच नव्हे तर आरोग्यवृद्धीसाठीही उपयुक्त आहे.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेदाची भूमिका फार मोठी आहे. दिनचर्या, ऋतुचर्या, आहारविहार, योग, ध्यान यांचे पालन करून आपण आजार होण्यापूर्वीच त्यांचे मूळ उखडून टाकू शकतो. औषधनिर्मितीची गुणवत्ता ही आयुर्वेदाच्या प्रभावीतेचा कणा आहे. सुयोग्य द्रव्यनिवड, पारंपरिक संशोधन, योग्य प्रमाणात संस्कार आणि शुद्धता यामुळे औषधांचा परिणाम ठोस होतो. आजच्या काळात यांत्रिक उत्पादनामुळे अनेकदा औषधांची गुणवत्ताही गमावली जाते. त्यामुळे उत्तम परिणामासाठी गुणवत्ताधारित आणि शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेली औषधे निवडणे अत्यावश्यक आहे.
आयुर्वेद केवळ उपचार नव्हे तर आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग आहे. तो विज्ञान आहे, संस्कृती आहे आणि स्वशरीराशी सुसंवादाचा दृष्टिकोन आहे. आयुर्वेदाचा सल्ला शक्यतो योग्य मान्यताप्राप्त वैद्यांकडूनच घ्यावा कारण, चुकीचे मार्गदर्शन करणारे विविध मेसेज, पोस्ट, अपूर्ण माहितीच्या आधारे केलेले उपचार हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.